20 March 2019

News Flash

मार्क्‍सनंतरचा मार्क्‍सवाद!

कार्ल मार्क्‍सने अनेक ग्रंथ लिहून साम्यवादी विचारांची मांडणी केली.

|| डॉ. अशोक चौसाळकर

कार्ल मार्क्‍सने अनेक ग्रंथ लिहून साम्यवादी विचारांची मांडणी केली. त्याने त्याचे ग्रंथ त्याची मातृभाषा असलेल्या जर्मन भाषेत लिहिले. त्याची सुरुवातीची पुस्तके इंग्रजी भाषेत भाषांतरित झालेली नव्हती. त्यातील एक महत्त्वाचे पुस्तक होते- ‘द इकॉनॉमिक अ‍ॅण्ड फिलॉसॉफिक मॅन्यूस्क्रिप्ट्स ऑफ १८४४’! या पुस्तकात हेगेलच्या तत्त्वज्ञानावर टीका करत असताना मार्क्‍सने आपल्या विचारांची मांडणी केली आहे. प्रख्यात सामाजिक मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम याने त्याचे इंग्रजीत भाषांतर करून त्याला विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. फ्रॉमच्या पुस्तकाचे नाव आहे- ‘मार्क्‍सिस्ट कन्सेप्ट ऑफ मॅन’! फ्रॉमच्या मते, हे पुस्तक लिहिताना मार्क्‍स हेगेलवादाच्या प्रभावाखाली होता. मार्क्‍सने या पुस्तकात परात्मभावाचा सिद्धान्त मांडला. या पुस्तकाच्या भाषांतरानंतर पश्चिमेकडील देशांमध्ये मार्क्‍सवादाची नव्याने चिकित्सा होण्यास सुरुवात झाली. या पुस्तकाचा नवमार्क्‍सवादी विचारांवर मोठय़ा प्रमाणात प्रभाव पडला.

युरोप आणि अमेरिकेमध्ये नवमार्क्‍सवादी विचार १९६० नंतर मोठय़ा प्रमाणात मांडण्यात येऊ लागले. या नवमार्क्‍सवादी विचारांची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. एक म्हणजे, हे विचारवंत मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाचे विश्लेषण लेनिनच्या विवेचनाच्या संदर्भात करत नाहीत. मार्क्‍सचे लेनिनवादी विश्लेषण त्यांना मान्य नाही. त्याचप्रमाणे मार्क्‍सचा साथीदार फ्रेड्रिक एंजल्स याचे विचारही तपासून घेतले पाहिजेत, असे त्यांचे मत होते. दुसरी बाब म्हणजे, सोव्हिएत रशिया आणि चीनमध्ये मार्क्‍सवादाची जी मांडणी करण्यात येते ती कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत मांडणी मानण्यात येते. ही मांडणी मार्क्‍स, एंजल्स, लेनिन, स्टॅलिन आणि माओ त्से तुंग यांच्या विचारांच्या अनुरोधाने करण्यात येते. मात्र आपण कम्युनिस्ट असूनही ही मांडणी मान्य करीत नाही, असे नवमार्क्‍सवादी म्हणतात. तिसरे म्हणजे, त्यांच्या मते, मार्क्‍सला विकसित अशा भांडवलशाही देशामध्ये साम्यवादी क्रांती होईल असे वाटत होते. परंतु ही समाजवादी क्रांती रशिया आणि चीनसारख्या मागासलेल्या देशांमध्ये झाली. त्यामुळे या क्रांत्यांचा उद्देश समाजवादी समाज स्थापन करणे हा नसून तेथे भांडवली शक्तींचा विकास करणे हा आहे. या देशांतील मागास सांस्कृतिक आणि राजकीय परंपरांचा प्रभाव तेथील राज्यव्यवस्थेवर पडलेला आहे, त्यामुळे या राज्यव्यवस्थांना आदर्श समाजवादी व्यवस्था म्हणून मान्यता देता येत नाही.

नवमार्क्‍सवादी विचारवंतांनी मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना स्वातंत्र्य आणि माणसाचे मानुषत्व उत्तरोत्तर विकसित करण्यावर भर दिलेला होता. त्यांच्या मते, मार्क्‍सवाद हे निसर्गाच्या नियमांच्या आधारावर चालणारे शास्त्र नसून ते मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे मार्क्‍सच्या हेगेलप्रणीत विरोधविकासवादाची नव्याने मांडणी केली पाहिजे : माणूस हा निसर्गशक्तींच्या उद्दिष्टांची पूर्ती करणारा नसून तो आपल्या श्रमाच्या साहाय्याने इतिहासाची निर्मिती करणारा सर्जनशील जीव आहे.

नवमार्क्‍सवादाची मांडणी वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांत काम करणाऱ्या विचारवंतांनी केली. त्यात प्रख्यात इटालियन विचारवंत अंतोनिओ ग्रामसी यास अनेक जण नवमार्क्‍सवादाचे जनक मानतात. तसे पाहिले तर ग्रामसी हा इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता आणि मार्क्‍सवाद, लेनिनवादाचा पुरस्कर्ता होता. फॅसिस्टांच्या तुरुंगात असताना त्याने जवळजवळ २२०० पृष्ठांच्या टिपा वेगवेगळ्या विषयांवर लिहिल्या. त्याच्या मृत्यूनंतर या ‘द प्रिझन नोटबुक्स्’ प्रकाशित झाल्या. ग्रामसीच्या या पुस्तकाने क्रांती केली. त्याने मांडलेले मुद्दे असे: पहिला मुद्दा धुरीणत्वाचा. धुरीणत्व हे ज्याप्रमाणे बळाच्या आधारावर स्थापन केले जाते त्याचप्रमाणे ते वैचारिक आणि सांस्कृतिक प्रभावाच्या आधारावरही स्थापन केले जाते. त्यामुळे कामगारवर्गाने सशस्त्र क्रांतीबरोबरच वैचारिक क्षेत्रामध्येही आपले धुरीणत्व प्रस्थापित केले पाहिजे. लेनिनने ज्या प्रकारची क्रांती रशियामध्ये केली त्या प्रकारची क्रांती युरोपातील देशांमध्ये करता येणार नाही. कारण या देशांमध्ये ‘नागरी समाजा’ची तटबंदी बळकट आहे आणि ही तटबंदी भेदावयाची असेल तर कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विषयांवरचे सामाजिक लढे उभे करावे लागतील. त्याच्या मते, वेगवेगळ्या राज्यांतील भांडवलदार वर्ग ‘पॅसिव्ह रिव्होल्यूशन’चे धोरण अंगीकारून. कामगारवर्गाच्या काही मागण्या स्वीकारतात आणि त्यांची अंमलबजावणी करून त्यांचा लढा बोथट करतात. तसेच, मॅकियाव्हलीची संकल्पना वापरून ग्रामसी असे म्हणतो की, आधुनिक काळात कम्युनिस्ट पक्ष हाच ‘मॉडर्न प्रिन्स’ आहे आणि समाजवादी राज्यसंस्था स्थापन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये ग्रामसी आणि त्याचे ‘द प्रिझन नोटबुक्स्’ हे पुस्तक यावर फार मोठय़ा प्रमाणात लिखाण झालेले आहे.

जर्मनीमधील फ्रँकफर्ट या शहरामध्ये १९२३ साली ‘फ्रँकफर्ट स्कूल ऑफ क्रिटिकल थेअरी’ या संस्थेची स्थापना झाली. या स्कूलमधील सर्वच विचारवंत हे मार्क्‍सवादी होते व त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी प्रत्येक विषयाबाबत चिकित्सक दृष्टी स्वीकारली. थिओडर अ‍ॅडोर्नो, मॅक्स हॉर्कहायमर, वॉल्टर बेंजामिन, एरिक फ्रॉम, हर्बर्ट मॉक्र्यूज आणि युर्गेन हेबरमास या विचारवंतांनी फ्रँकफर्ट स्कूलचा विचार विकसित केला. अस्तित्ववाद,  फ्रॉईडचा मनोविश्लेषणवाद यांचाही त्यांच्या विचारावर प्रभाव पडला. जर्मनीमध्ये हिटलरची राजवट स्थापन झाल्यानंतर या विचारवंतांची ससेहोलपट झाली व स्कूलचे काम बंद पडले. बहुतेक तत्त्वज्ञ हे ज्यू असल्यामुळे त्यांना परागंदा व्हावे लागले. हे विचारवंत प्रत्यक्षार्थवाद, निसर्गविज्ञानवाद आणि अनुभववाद यांच्या विरोधात होते. त्यांच्या मते, तत्त्वज्ञानाचा उद्देश मानवी प्रज्ञेची मुक्ती साध्य करणे हा आहे. सध्याची संस्कृती ही पूर्णत: रोगग्रस्त अशी संस्कृती असून तिच्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे गोडवे गात मानवी मूल्यांचा बळी दिला जात आहे. या व्यवस्थेत केवळ कामगारांचेच वस्तुभवन होत नसून समाजातील सर्वच घटकांचे वस्तुभवन होत आहे. त्यातून परात्मभाव निर्माण होतो. हॉर्कहायमरच्या मते, फ्रँकफर्ट स्कूल कामगारांच्या मुक्तीशी बांधील आहे. परंतु केवळ कामगारवर्ग आणि कम्युनिस्ट पक्ष बदलाचे काम एकहाती करू शकतील असे वाटत नाही. सध्याच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या जागी स्त्री व पुरुष यांना स्वातंत्र्य देणारा, समाजातील परात्मभाव दूर करणारा व माणसांच्या विकासाच्या असंख्य शक्यतांना मूर्तरूप देणारा नवा समाज त्यांना घडवायचा आहे. तर हेबरमासच्या मते, भांडवलशाही समाज आणि नोकरशाही समाजवादी समाज यांच्यापासून आपण मुक्त होणे गरजेचे आहे.

या स्कूलच्या विचारवंतांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यात हॉर्कहायमर आणि अ‍ॅडोर्नो यांनी संयुक्तपणे लिहिलेले ‘डायलेक्टिक ऑफ एनलायटन्मेंट’, अ‍ॅडोर्नोचे ‘निगेटिव्ह डायलेक्टिक्स’, एरिक फ्रॉमची ‘फीअर ऑफ फ्रीडम’ आणि ‘द सेन सोसायटी’ ही पुस्तके आणि कार्ल विटफोगेल याचे ‘ओरिएंटल डेस्पोटिझम’ या पुस्तकांचा उल्लेख करता येईल.

हर्बर्ट माक्र्युज या तत्त्वज्ञाने आपल्या कामाची सुरुवात फ्रँकफर्ट स्कूलमध्ये केली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. माक्र्युजने आपले तत्त्वज्ञान हेगेल आणि फ्रॉईड यांची वाट पुसत विकसित केले. १९६०च्या दशकात युरोपमध्ये जी नवी डावी चळवळ झाली तिचा मार्गदर्शक विचारवंत म्हणून माक्र्युजला मान्यता मिळाली. माक्र्युजची गाजलेली पुस्तके म्हणजे- ‘रिझन अ‍ॅण्ड रिव्होल्यूशन’, ‘एरॉस अ‍ॅण्ड सिव्हिलायझेशन’ आणि ‘वन-डायमेन्शनल मॅन’!

‘रिझन अ‍ॅण्ड रिव्होल्यूशन’ या ग्रंथात माक्र्युजने हेगेलचे तत्त्वज्ञान व सामाजिक सिद्धान्ताचा उदय याविषयी सखोल मांडणी केली आहे. त्याच्या मते, हेगेल हा फॅसिझम किंवा नाझीझमचा पुरस्कर्ता नव्हता, तर अनेक बाबतीत तो मार्क्‍सचा पूर्वसुरी होता. हेगेलने मानवी प्रज्ञेच्या विकासावर भर दिला. आपल्या प्रज्ञेच्या आत्मप्रत्ययातूनच खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य आणि सुखाकडे जाऊ शकतो. इतिहासाच्या विविध अवस्थांच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेणे हे प्रज्ञेचे कर्तव्य असते. त्याच्या मते, आधुनिक भांडवलशाही समाजात माणूस आपल्या व्यक्तिमत्त्वातील अनेक परिमाणांना पारखा झाला. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या वापरामुळे लोकांचे राहणीमान वाढले, पण त्यांचे स्वातंत्र्य आणि संस्कृती संपली. आपल्या ‘एरॉस अ‍ॅण्ड सिव्हिलायझेशन’ या पुस्तकात माक्र्युजने आधुनिक संस्कृती माणसाची सहजप्रेरणा असलेली कामभावना दडपून निर्माण झालेली आहे, असे मत मांडले. सध्याच्या विषम भांडवली समाजात माणसाला सहजप्रेरणांचे दमन करून पोट भरण्यासाठी जाचक कष्ट करावे लागतात. मानवी स्वातंत्र्यासाठी, परात्मभाव दूर करण्यासाठी सहज प्रेरणांचे दमन थांबले पाहिजे. माक्र्युजच्या मते, अमेरिकेतील भांडवलशाही समाज आणि सोव्हिएत रशियातील तथाकथित समाजवादी समाज हे माणसाचे दमन करणारे समाज आहेत व त्यापासून मुक्ती हवी असेल तर तिसऱ्या जगातील मागास जनता, स्त्रिया आणि असंघटित कामगार यांची आघाडी बनवणे आवश्यक आहे. कारण हे समाजच व्यवस्थेने संकटग्रस्त केलेले आहेत व म्हणूनच क्रांतिकारक आहेत.

फ्रेंच मार्क्‍सवादी विचारवंत लुईस आल्थुजर याने मार्क्‍सचा हेगेली वारसा नाकारला. त्याने त्याच्या ‘फॉर मार्क्‍स’ या पुस्तकात मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाची फेरमांडणी केली आणि ‘लेनिन अ‍ॅण्ड फिलॉसॉफी’ या पुस्तकात लेनिनच्या तत्त्वज्ञानाची द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या संदर्भात मांडणी केली.

दक्षिण अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञांनी या खंडातील देशांचा आर्थिक विकास हा एक प्रकारे न्यून विकास आहे, असे प्रतिपादन केले. त्यातूनच अमेरिकी साम्राज्यवादाचे हितसंवर्धन करणारी परावलंबी राज्यव्यवस्था तिसऱ्या जगातील अनेक देशामंध्ये कशी निर्माण झाली, याची मार्क्‍सवादी दृष्टिकोनातून मांडणी केली. या संदर्भात समीर अमिन यांचे ‘अनइक्वल डेव्हलपमेंट’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

नवमार्क्‍सवादाचा विचार हा मानवी परात्मता व विषमता दूर करून मानवी स्वातंत्र्याची क्षितिजे व्यापक करणारा विचार आहे. तो समजून घ्यायचा तर हे नवमार्क्‍सवाद्यांचे ग्रंथ वाचायला हवेत.

First Published on May 5, 2018 2:33 am

Web Title: loksatta book review 8