सुहास शेलार

पश्चिम उत्तर प्रदेशातील वर्षभराच्या भटकंतीतून आकारास आलेले हे पुस्तक मनामनांत पेरलेल्या प्रश्नांचे वास्तव दाखवून देणारे आहे..

प्रेमविवाह हा गुन्हा नव्हे, हे अगदी आजही अनेक जण स्वीकारायला तयार नसतात. पाश्चात्त्य संस्कृतीच्या विकृत अंगाचे अंधानुकरण, अशीच आजपावेतो प्रेमाची संभावना केली गेली. धर्म आणि संस्कृती रक्षणाच्या नावाखाली आपल्याच माणसांना नाना तऱ्हेचा त्रास दिला जातो. प्रेमी युगुलांची नग्न धिंड काढण्यापासून ते जिवे मारण्यापर्यंतही मजल जाते. पण त्यातून साध्य काय होते? या उच्छादामुळे भारतीय संस्कृतीचे वाईट चित्रच जगापुढे मांडले जाते.

प्रेम कोणावर करावे, याचे काही अलिखित नियम वा चौकटी आपल्याच संस्कृतीने आखून दिल्या आहेत. म्हणजे स्वजातीय प्रेमविवाह विनाअडथळा समाजमान्य होतो. अगदी वर-वधूच्या कुटुंबीयांचा विरोध असला, तरी समाजातून या विवाहास फारसा विरोध होत नाही. परंतु प्रेमाला आंतरजातीय, विशेषत: आंतरधर्मीय किनार असली की त्याला फाटे फुटतात. प्रसंगी गावप्रमुखापासून ते देशपातळीवरचे राजकारणीही यात उडी घेतात. मुस्लीम धर्मीयाने हिंदू मुलीशी लग्न केल्यास ‘लव्ह जिहाद’ असा शिक्का मारला जातो, तर ख्रिश्चन मुलाने आंतरधर्मीय विवाह केल्यास आणखी काही..

प्रामुख्याने २०१४ नंतर लव्ह जिहाद, घरवापसी, गो-हत्या अशा प्रकरणांची उघड चर्चा देशभरात सुरू झाली. त्यामुळे धार्मिक तणाव शिगेला पोहोचला, अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पण भारताचे नव्याने रंगवले जाणारे हे चित्र वास्तव आहे का, असा प्रश्न पडलेल्या दोघा पत्रकारांनी या घटनांचा मागोवा घेण्याचा निश्चय केला आणि ते दीर्घ यात्रेसाठी निघाले. मिहीर श्रीवास्तव आणि राउल इराणी अशी त्यांची नावे. धार्मिक संघर्षांने पोळलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशची निवड त्यांनी अभ्यासासाठी केली. सामान्य नागरिक, सर्व धर्मातील प्रतिष्ठित नेते, साधुसंतांपासून मौलवींपर्यंत अनेकांच्या गाठीभेटी; धर्मसंघर्षपीडित, त्यांचे कुटुंबीय यांच्या मुलाखती; विविध आश्रम, मदरसे, धार्मिक स्थळांना दिलेल्या भेटी आणि अनुभवांती ‘लव्ह जिहादीज् : अ‍ॅन ओपन-माइंडेड जर्नी इनटु द हार्ट ऑफ वेस्टर्न उत्तर प्रदेश’ हे प्रवासवर्णन आकारास आले.

२०१४ साली ‘लव्ह जिहाद’ प्रकरणामुळे देशातील प्रमुख वर्तमानपत्रांत झळकलेल्या मेरठमधील सरवाह या गावापासून लेखकद्वयींनी यात्रेस सुरुवात केली.. खासगी शिकवण्या घेणारी सर्वसामान्य हिंदू कुटुंबातील एक मुलगी अंतर्गत सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन मदरशामध्ये शिक्षिका म्हणून रुजू होते. उच्च शिक्षणामुळे निर्माण झालेली स्वच्छंदी जगण्याची ऊर्मी व स्वकर्तृत्वावर जगाला गवसणी घालण्याचा विचार यांमुळे अल्पावधीतच ती सर्वाची मने जिंकते. काही दिवसांनी तिचे एका सहकाऱ्याशी प्रेमसंबंध जुळतात. तो जातीने मुस्लीम. मात्र प्रेमाची वीण इतकी घट्ट, की धर्माच्या भिंती भेदून पार जाईल. काही वर्षे हे प्रेमसंबंध असेच सुरू राहतात. पुढे ते दोघेही लग्नाचा निर्णय घेतात. ती आपल्या कुटुंबीयांना याबाबत कळवते. अपेक्षेनुसार घरातून कडाडून विरोध होतो. तरीही ती निर्णयावर ठाम असल्याचे पाहून तिला घरात डांबून ठेवले जाते. मात्र, काही मित्रांच्या मदतीने ती घरच्यांच्या बेडीतून स्वतची सुटका करून घेते आणि आपल्या प्रियकराशी लग्न करते.

आपल्याला मनापासून आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याच्या इच्छेआड उभ्या राहिलेल्या धर्माच्या भिंती पार करण्याचे अग्निदिव्य ती करू पाहते. मात्र या भिंतींमधले अंतर इतके मोठे होते, की पाय अडकून ती खाली पडते. कुटुंबीय तिला परत आणतात आणि बंदीत ठेवतात. घडल्या प्रकाराची गावभर चर्चा होते. गावातील राजकारण्यांकडून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू होतो. मुलीच्या कुटुंबीयांवर तक्रार दाखल करण्यासाठी दबाव आणला जातो. पुढे तिला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांसह तिच्या प्रियकरावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येतो. या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक होते.

अटक झालेल्यांपैकी एक व्यक्ती अशी होती, जिचा या विवाहप्रकरणाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नव्हता. मात्र पीडितेला धर्मपरिवर्तनास भाग पाडल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला जातो. गावपातळीवर राजकीयदृष्टय़ा प्रभावशील असल्याने मुद्दामहून त्याला या प्रकरणात गोवण्यात येते. ‘लव्ह जिहादचा म्होरक्या’ असे शिक्कामोर्तब करून वर्तमानपत्रांतून त्याची पुरेपूर बदनामी होईल याची काळजी घेतली जाते. न्यायालयात पीडित मुलगी बलात्कार झाल्याचे अमान्य करते. त्यामुळे तिच्या प्रियकरासह अन्य चौघे या प्रकरणातून सुटतात. मात्र, बळजबरीने धर्मपरिवर्तन केल्याच्या आरोपांमुळे संबंधित व्यक्तीला काही वर्षे तुरुंगात काढावी लागतात. पुढे उच्च न्यायालयात त्याला जामीन मिळतो. परंतु यादरम्यानच्या काळात त्याचे कुटुंब पूर्णत: उद्ध्वस्त होते. किशोरवयात पदार्पण करीत असलेल्या त्याच्या मुलांवर या घटनेमुळे आघात होतो. नातेवाईक दुरावतात. सामाजिक आणि धार्मिक बहिष्कारसत्र सुरू होते.

उपरोक्त प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा लवलेशही दिसून येत नाही. प्रेमाला धर्म आणि जातीच्या बंधनांत जखडून ठेवण्याचा हा प्रकार. यात राजकारणाचा शिरकाव झाला नसता, तर दोन-चार दिवस चर्चेच्या पलीकडे काहीच साध्य झाले नसते. परंतु राजकीय पोळी भाजण्याची संधी मिळत असल्यास विझलेल्या आगीवरही फुंकर मारून विस्तव तयार करतील अशी आपली नेतेमंडळी. संमिश्र मतदार असलेल्या सरवाह आणि परिसरातील अन्य गावांत आपल्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चालून आलेल्या या संधीचे सोने करण्यासाठी थेट केंद्रीय नेतृत्वाने उडी घेतली. त्यामुळेच या प्रकरणाची दिशा बदलली असे निरीक्षण लेखकद्वयींनी नोंदवले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ‘यती माँ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेतनादेवी यांचा या प्रकरणातील हस्तक्षेपही नोंद घेण्याजोगा आहे. पुस्तकात त्याबद्दल वाचायला मिळते. अवैध धर्मातर रोखण्यासाठीच सरवाह गावातील पीडितेच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिला, असे त्या सांगतात. ‘भारतातील मुस्लीम लोकसंख्यावाढीचा वेग इतका प्रचंड आहे, की येत्या काही वर्षांत ते हिंदूंशी बरोबरी करतील. मदरशांमध्ये हिंदूंविरोधात कारवायांचे, तसेच हिंदू मुलींशी विवाह करून त्यांचे सक्तीने धर्मातर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते,’ असा युक्तिवादही त्या करतात. अशा प्रकारांचा सामना करण्यासाठी त्यांनी हिंदू महिलांची सशस्त्र सेना तयार केली आहे. महिलांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षणही त्या देतात.

चेतनादेवी यांच्या दाव्यातील तथ्य शोधण्यासाठी लेखकद्वयींनी पश्चिम उत्तर प्रदेशातील मोठय़ा आणि चर्चेतील मदरशांना भेटी दिल्या. तेथील प्रमुखांसह विद्यार्थी आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अत्यंत बारकाईने आणि शिताफीने तिथल्या कानाकोपऱ्यांचा अभ्यास केला. परंतु एकाही मदरशात हिंदूंविरोधी कारवाया किंवा कथित ‘लव्ह जिहाद’चे प्रशिक्षण दिले जात नसल्याचे त्यांना आढळून आले.

लेखकद्वयींनी काही आश्रम आणि गोशाळांनाही भेटी दिल्या. तिथला परिसर, त्यांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास केला. संत-महंत, गोरक्षकांशी संवाद साधला. बहुतांश साधू-संतांनी हिंदुत्वाचा राजकारणासाठी वापर करणाऱ्यांवर प्रखर टीका केली. राजकारणामुळेच हिंदुत्व बदनाम झाले आहे. हिंदू धर्म कोणाचेही वाईट चिंतित नाही. याउलट प्रत्येक मानवाचा उचित सन्मान करण्याची शिकवण येथे दिली जाते, अशी भावना यांपैकी अनेकांनी व्यक्त केली. हिंदू मठ-आश्रमांतून मुस्लीमविरोधी प्रचार केला जातो, अशा पडद्यामागून चालणाऱ्या चर्चेच्या अनुषंगानेही लेखकद्वयींनी संशोधन केले. परंतु असा कोणताही प्रकार तेथे दिसून आला नाही.

लेखकद्वयींनी केलेल्या सुमारे वर्षभराच्या भ्रमंतीदरम्यान त्यांना कष्टकरी समाजात कोणताही धार्मिक संघर्ष दिसून आला नाही. हिंदू असोत वा मुस्लीम, गावातील सामान्य नागरिक मिळूनमिसळून राहतात. एकमेकांचे सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. परंतु राजकारणरूपी वाळवीने एकदा का गावात प्रवेश केला की ती हळूहळू संपूर्ण गावाला पोखरून टाकते. ‘व्होट बँक’ तयार करण्यासाठी धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण केली जाते. निवडणुका जवळ आल्या, की मतदारांना प्रभावित करण्यासाठी लव्ह जिहाद, घरवापसी, गो-हत्या यांसारखे मुद्दे उकरून काढले जातात. निवडणूक संपली की हे सर्व मुद्दे आपसूक मागे पडतात. निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते सर्वधर्मसमभावाचा नारा देतात. पुढल्या निवडणुकीला पुन्हा हेच मुद्दे राजकीय पक्षांच्या अजेण्डय़ावर येतात. त्यामुळे हा ‘लव्ह जिहाद’ न संपणारा आहे, अशी खंत लेखकद्वयी मांडतात.

हे पुस्तक प्रामुख्याने राजकीय आणि धार्मिक अंगावर भाष्य करणारे असले, तरी ते केवळ माहितीप्रधान न होता वाचकप्रिय होईल याकडे लेखकद्वयींनी लक्ष दिले आहे. वर्षभराहून अधिक काळ केलेल्या भ्रमंतीदरम्यान त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश गावांना भेट दिली. त्यामुळे तेथील लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृतीचीही त्यांना ओळख झाली. पत्रकारांच्या नजरेतून या संस्कृतीचे नोंदवलेले तपशीलवार बारकावे वाचकाला खिळवून ठेवणारे आहेत. तसेच लेखकद्वयींपैकी एक राउल इराणी या छाया-पत्रकाराने टिपलेली छायाचित्रे या प्रवासवर्णनाचा दृश्यानुभव देणारी आहेत.

suhas.shelar@expressindia.com