25 March 2019

News Flash

सामान्य नायकाचं महाआख्यान

ललितसाहित्याची ताकद दाखवून देणारी ही स्पॅनिश कादंबरी इंग्रजीतही आली आहे.

राजकीय संदर्भ असूनही ललितसाहित्याची ताकद दाखवून देणारी ही स्पॅनिश कादंबरी इंग्रजीतही आली आहे..

आकाराने मोठय़ा, जाडजूड कादंबऱ्यांचा खास स्वत:चा असा वाचक असतो. तो चिकाटीने आणि नेटाने या कादंबऱ्या वाचतो, त्यात रमतो आणि त्याविषयी उत्साहाने व्यक्तही होतो. आजच्या समाजमाध्यमांनी गजबजलेल्या काळात दीर्घ काही वाचायची ताकद कमी होतेय किंवा हल्ली टीव्ही मालिकांनी कादंबरीचा वाचक हिरावून घेतलाय, अशा हाकाटीला अजिबात महत्त्व न देता या अस्सल वाचकाचं वाचन निर्विघ्न आणि निवांत सुरू असतं. या पक्क्या बठकीच्या वाचकाला साद घालणाऱ्या एका महत्त्वाच्या स्पॅनिश कादंबरीच्या अनुवादाचा पहिला खंड गेल्या वर्षी प्रकाशित झाला. लुईस गोयतीसोलो (Luis Goytisolo) या बुजुर्ग स्पॅनिश लेखकाची ‘रिकाऊन्टिंग’ (Recounting) ही ती सुमारे साडेसातशे पानांची कादंबरी. खरं तर ‘आन्तागोनिया’ (Antagonia) या चार खंडात्मक महाकादंबरीचा हा पहिला खंड. दुसऱ्या खंडाचा अनुवाद या वर्षी ऑगस्टमध्ये प्रकाशित होतोय. ब्रेण्डन रिले यांनी केलेला हा अनुवाद ‘डाल्की अर्काइव्ह प्रेस’ (Dalkey Archive Press) या आंतरराष्ट्रीय साहित्याचे दर्जेदार अनुवाद प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलाय.

स्पॅनिश गृहयुद्धानंतरच्या दोन दशकांमध्ये बदलत जाणारा बार्सिलोना शहराचा अवकाश या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. लेखक होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या राऊल नामक नायकाच्या निवेदनातून कादंबरी आकार घेत जाते. राऊलच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतचा कालखंड या पहिल्या भागात येतो. या कादंबरीचं स्वरूप ‘बिल्डुंग्सरोमान’ (Bildungsroman) या जर्मन संज्ञेची आठवण करून देणारं आहे. संवेदनशीलतेने जगणं समजून घेत लहानाचा मोठा होणाऱ्या नायकाचा प्रवास रेखाटणाऱ्या कादंबऱ्या ‘बिल्डुंग्सरोमान’ या प्रकारात समाविष्ट केल्या जातात. या नायकाच्या दृष्टिकोनातूनच वाचक त्याच्या सभोवतालचं जग बघतो. नायकानं घेतलेला ‘पर’ आणि ‘स्व’चा शोध ‘बिल्डुंग्सरोमान’च्या आशयाचा मुख्य घटक असतो. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला आलेली ही संज्ञा त्या आधी आणि नंतरच्याही अनेक कादंबऱ्यांना लागू होते. त्यात अठराव्या शतकात प्रकाशित झालेल्या ‘विल्हेम माइस्टर्स अप्रेन्टिसशिप’ या योहान्न वुल्फगान्ग ग्यथं (Johann Wolfgang Goethe) याच्या जर्मन कादंबरीपासून आपल्याकडे शरच्चंद्र मुक्तिबोधांचं कादंबरीत्रय वा नेमाडेंच्या चांगदेव चतुष्टया-पर्यंतच्या अनेक कादंबऱ्या येतात.

‘रिकाऊन्टिंग’चा नायकही असाच त्याच्या भोवतालची संगती लावण्यासाठी धडपडत असतो. या जडणघडणीचा आलेख साकारताना गोयतीसोलो एका अक्षावर सूक्ष्मातिसूक्ष्म तपशिलांनिशी बार्सिलोनाचा अवकाश जिवंत करतो, तर दुसऱ्या अक्षावर काळाचे लहानमोठे खंड उमटत राहतात. या दोन अक्षांमध्ये नायकाबरोबरच त्याच्या कुटुंबातली माणसं, शेजारी, मित्र, शिक्षक अशी मुख्य/ दुय्यम पात्रं जिवंत होतात. या पात्रांचे नायकाशी व एकमेकांशी असलेले बदलते संबंध, त्यातून आकार घेणारी उपकथानकं, साहित्य, राजकारण, आयुष्य या सगळ्यांवरच्या दीर्घ चर्चा, बार्सिलोना व कातालोनियाच्या अवकाशांची वर्णनं या सगळ्यांतून कादंबरीची वीण घट्ट होत जाते.

असा अफाट आवाका असलेली ही कादंबरी वाचायला तशी अवघडच. गुंतागुंतीचा आशय व्यक्त करण्यासाठी लेखकानं दीर्घ वाक्यांची शैली वापरलेली आहे. वाचकाला दम घेण्यासाठी उसंत न देणारी ही शैली बाणाची ‘कादंबरी’,  हरिभद्राची ‘समरादित्यकथा’ अशा संस्कृत आणि प्राकृत कथाग्रंथांची, तसंच लास्लो क्रास्नाहोरकाई, थॉमस बर्नहार्ड, जुझे सारामागो, डब्ल्यू. जी. सेबाल्ड आदींच्या कादंबऱ्यांची आठवण करून देते. संथ सरकणाऱ्या अजगरासारखी ही वाक्यं कधी दोन-तीन पानंही व्यापतात. मात्र या कादंबरीचं वाचन अवघड असण्याचं केवळ लांबलचक वाक्य हे एकमेव कारण नाही. अनेक ठिकाणी तीन-चार पात्रांच्या चर्चा संवादरूपानं येतात. त्यात बहुधा नेमकं कोणतं पात्र बोलतंय ते स्पष्ट केलं जात नाही. पात्रांची ओळख तात्पुरती पुसून फक्त त्यांचे शब्द ऐकू येतात. वैयक्तिकता आणि वाणी दडपली जाण्याच्या काळाची भयावहता त्यातून अधोरेखित होते.

रोजच्या जगण्यातल्या वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींकडे निवेदक अत्यंत गांभीर्याने बघतो. दुपारी तीन वाजता घराला कुलूप का होतं, याचं स्पष्टीकरण तीन पानं व्यापतं. सॅण्डविच खाण्याच्या क्रियेचं वर्णन चार-पाच पानांपर्यंत चालतं. एके ठिकाणी, नायकाच्या झाडाकडे पाहण्याच्या क्रियेच्या तपशिलांनी दोन पानं भरतात. वरकरणी अनावश्यक वाटणाऱ्या या तपशिलांमधून युद्धाच्या गडद सावटाखाली असलेल्या समाजातल्या मध्यमवर्गाचं अतिशय जिवंत चित्र आकारतं. त्यातूनच कादंबरीला समृद्ध घनता लाभते. वेळोवेळी केलेली विषयांतरं निवेदनाची लय जाणीवपूर्वक खंडित करतात. एका प्रसंगात पोलीस नायकाचा पाठलाग करताना तो एका चिंचोळ्या गल्लीत लपतो. तेव्हा निवेदक हा प्रसंग तसाच ठेवून तिथल्या भव्य चर्चचं वर्णन करण्यात रमतो. अन्य एका प्रकरणात कॉफीचा वास नायकाला त्याच्या बालपणात घेऊन जातो. असे प्रसंग वाचताना मास्रेल प्रूस्त या थोर फ्रेंच कादंबरीकाराच्या ‘रिमेम्ब्रन्स ऑफ थिंग्ज् पास्ट’ या अभिजात महाकादंबरीची आठवण होते. प्रूस्तप्रमाणे गोयतीसोलोसुद्धा नायकाचं आयुष्यभान सघन होण्याच्या प्रक्रियेत स्मृतीचं महत्त्व ओळखणारा कादंबरीकार आहे. जाणिवेत वारंवार होणारा स्मृतीचा आणि पर्यायाने भूतकाळाचा हस्तक्षेप ‘रिकाऊन्टिंग’च्या आशयकेंद्रांपैकी एक आहे. कादंबरीत प्रूस्तचा थेट संदर्भही अनेकदा येतो. पात्रांच्या वाङ्मयीन चर्चा आणि वादांमधून प्रूस्तबरोबरच इतरही लेखकांचे संदर्भ वेळोवेळी येत राहतात. ते केवळ नाममहात्म्यापुरते नाहीत, तर त्यातून कादंबरीच्या निवेदनाला युरोपियन वाङ्मयसंस्कृतीच्या विस्तीर्ण पटाची पाश्र्वभूमी लाभते. नायकाचं क्रमश: समृद्ध होत जाणारं आकलन अधोरेखित होतं.

कादंबरीत स्मृतीला अतिशय महत्त्व आहे, असं वर म्हटलं. पण ही स्मृती दगाबाज आहे. ती कधी दोन कालखंडांची सरमिसळ करते, तर कधी न घडलेल्या घटनांना वास्तवाचे कपडे घालून समोर आणते. म्हणूनच कादंबरीच्या निवेदनातले वास्तवाचे संदर्भ आणि प्रत्यक्षातलं वास्तव यात नेमकं किती अंतर आहे, हे निवेदकाला आणि पर्यायाने वाचकांनाही कधीच कळत नाही. वास्तव आणि कल्पिताच्या कडा पुसट होतात.

नायकाचा लेखक होण्याचा प्रवास कादंबरीच्या शेवटी पूर्ण होतो. तो कादंबरी लिहितो. त्या कादंबरीची रचना आपण वाचत असलेल्या कादंबरीसारखी (म्हणजे ‘रिकाऊन्टिंग’सारखी) असते. त्यातल्या पात्रांची नावंही या कादंबरीतल्या पात्रांसारखीच असतात. कादंबरीच्या रचनेतली ही स्वसंवेद्यता महत्त्वाची आहे. कल्पित साहित्य हेच प्रमुख आशयकेंद्र असलेल्या कल्पित साहित्याला (इंग्रजीत ज्याला ‘मेटाफिक्शन’ म्हणतात) स्पेनमध्ये बहर आला तो फ्रान्सिस्को फ्रँकोची राजवट संपुष्टात येताना. फ्रँकोच्या हुकूमशाही राजवटीत भाषेच्या वापरावर अनेक बंधनं होती. भाषेची बहुविधता दडपली गेली आणि तिचा केवळ राजवटीच्या समर्थनाचं साधन म्हणून वापर सुरू झाला. स्पेनमधली स्वसंवेद्य कादंबरी या दडपशाहीला अप्रत्यक्ष प्रतिक्रिया म्हणून समोर यायला लागली. १९७५ साली फ्रँकोच्या मृत्यूनंतर या भाषिक कृतीला अधिकच बहर आल्याचं दिसतं. त्यातून सामाजिक वास्तवाचं रूपांतर वैशिष्टय़पूर्ण वाङ्मयीन अनुभवात झालं. हे सामाजिक वास्तव सतत बदलतं असल्यामुळे स्वसंवेद्य कादंबरीनंही अभिव्यक्तीच्या नव्या वाटा शोधल्या. त्यातून आधुनिकोत्तर कादंबरीचं बीजारोपण झालं.

‘रिकाऊन्टिंग’चं निवेदन बहुपेडी आणि बहुमुखी आहे. ते कधी नायकाच्या डायरीतल्या नोंदींचं रूप धारण करतं, तर कधी मित्रांना आणि प्रेयसीला लिहिलेल्या पत्रांतून उलगडतं. कधी प्रदीर्घ स्वगताच्या रूपात समोर येतं, तर कधी निनावी संवादांच्या माध्यमातून पुढे जातं. हे एका प्रकारातून दुसऱ्यात जाणं अतिशय सहज होतं. त्यात कुठेही सांधेबदलाचा खडखडाट जाणवत नाही, की निवेदनाच्या ओघाचा लयभंग होत नाही. वाचक सहजतेनं एका प्रकारातून दुसऱ्यात प्रवेश करतो आणि निवेदनाच्या संथ प्रवाहासह पुढे जात राहतो. निवेदनाच्या या बहुस्तरीयतेमधून व्यामिश्रता वाढते. काळ आणि अवकाशाचे ताणेबाणे घट्ट विणले जातात. या सगळ्या बांधणीत निवेदनातली चिंतनशीलता आणि काव्यात्मता कुठेही हरवत नाही. एक उदाहरण देतो :

‘आठवणींचा मागोवा घेणं म्हणजे एखाद्या प्राचीन इमारतीच्या अवशेषांवर नव्याने बांधलेल्या वास्तूमध्ये प्रवेश करणं. पण ती प्राचीन इमारत तरी मुळात तिथली असते थोडीच? तिच्या पायाचा दगड एका गावाहून आणलेला, तर भिंतीच्या विटा दुसऱ्याच गावच्या. आणि ते दगडही उत्खननात सापडेल्या आणखी एखाद्या प्राचीन इमारतीच्या पायातून काढलेले नसतील कशावरून?’

कादंबरीतला काळही बहुस्तरीय आहे. एक परिच्छेद वर्तमानातला, तर पुढचा भूतकाळातला आणि पुढचा पुन्हा वर्तमानातला असे काळ-पातळ्यांमधले अचानक होणारे बदल सुरुवातीला वाचनात अडथळा आणतात. एकदा त्यांची सवय झाली, की निवेदनातली गंमत कळायला लागते. वाचक अधिक सावध व सक्रिय बनतो.

कादंबरीचा नायक व लेखक यांच्या आयुष्यात काही समांतर दुवे आहेत. नायक राऊलप्रमाणेच स्पेनमधल्या कम्युनिस्ट पक्षाला साथ दिल्याबद्दल लुईस गोयतीसोलो याला १९६३ साली अटक झाली होती. या कादंबरीचं लेखन त्यानं तुरुंगात असतानाच सुरू केलं. लिहायला कागद नसल्याने सुरुवातीची पाच प्रकरणं गोयतीसोलोने टॉयलेट पेपरवर लिहिली. राऊलप्रमाणेच गोयतीसोलोची आईसुद्धा १९३८ साली फ्रँकोनं केलेल्या बॉम्बवर्षांवात मारली गेली. राऊलच्या भावासारखाच लुईस गोयतीसोलोचा भाऊ हुआन प्रसिद्ध लेखक होता.

अर्थात, असे चरित्रात्मक तपशील माहीत असणे ही कादंबरी वाचतानाची गरज नाही. गरज आहे ती निवांतपणा, भरपूर वेळ आणि चिकाटीची. या तीन गोष्टी असतील तर एका सामान्य नायकाचं हे महाआख्यान वाचकाला समृद्ध करेल. कारण पुस्तक वाचताना वाचक खरं तर त्याच्या ‘स्व’चंच वाचन करत असतो. श्रेष्ठ साहित्य वाचताना वाचकाला या ‘स्व’बद्दल तोपर्यंत अज्ञात असलेल्या काही गोष्टींची प्रथमच जाणीव होते. या गोष्टी त्या साहित्यकृतीच्या संपर्कात आल्याशिवाय उजेडात येणं शक्य नसतं. ‘रिकाऊन्टिंग’ ही अशी साहित्यकृती आहे.

‘रिकाऊन्टिंग’

मूळ लेखक : लुईस गोयतीसोलो

इंग्रजी अनुवाद : ब्रेण्डन रिले

प्रकाशक : डाल्की अर्काइव्ह प्रेस

पृष्ठे : ७६०, किंमत : १८८० रु.

 

निखिलेश चित्रे

satantangobela@gmail.com

First Published on March 24, 2018 4:13 am

Web Title: luis goytisolo recounting antagony book i