गेले वर्ष करोनाने नासवले. पुस्तकांचे, प्रकाशनाचे जग ऑनलाइन, पीडीएफ अशा नव्या व्यवधानांमुळे कसेबसे सुरू राहिल्यासारखे दिसले, पण तो सारा प्रकार तसा नवा. त्यात सरावलेपण यायला आणखी काही काळ जावा लागेल. ते सरावलेपण आले तरी छापील पुस्तकांविषयांची आस्था काही कमी होणारी नाही. छापील पुस्तकांचे मोल हे वाचणाऱ्यांसाठी कशाहूनही अधिक. आता वर्ष सरले, पण करोनाकाळ काही सरलेला नाही. पण थांबून चालणारे नाही, याची जाण आता पुस्तकविश्वातही हळूहळू का होईना येऊ लागली आहे. नववर्षांच्या पहिल्या दिवशीच त्याची प्रचिती आली. शुक्रवारच्या संध्याकाळी राजधानी दिल्लीत ‘मेकिंग ऑफ हिंदूू पेट्रियट’ या जे. के. बजाज आणि एम. डी. श्रीनिवास या लेखकद्वयींच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. करोनाकाळातला ‘ऑनलाइन’ शिरस्ता मोडून हा प्रत्यक्ष प्रकाशनसोहळा पार पडला, अर्थातच करोनानियम पाळूनच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या तब्बल हजार पृष्ठांच्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. महात्मा गांधींच्या ‘हिंद स्वराज’मधील विचार हे या नव्या पुस्तकाचा चर्चाविषय. ‘हिंदू स्वराज’मधले गांधीजी हे रशियन कादंबरीकार लियो टॉलस्टॉय यांना ‘हिंदू पेट्रियट’ वाटले होते. तोच धागा या पुस्तकाच्या शीर्षकात दिसतो. गांधीजींचे ‘हिंदू स्वराज’मधील विचार कसे घडले, याचा वेध घेणारे हे पुस्तक त्यांच्यातल्या ‘हिंदूत्व’ विचारांचे कवडसे शोधू पाहणारे आहे. या पुस्तकाचे सविस्तर परीक्षण यथावकाश ‘बुकमार्क’मध्ये प्रसिद्ध होईलच.