बहुभाषकता, भाषान्तर आणि आधुनिकता याबद्दलचा हा लेख; निमित्त – २७ फेब्रुवारीच्या मराठी राजभाषा दिनी ताजी होणाऱ्या  मराठी राजभाषा आहे पण ज्ञानभाषा आहे का?’ या चर्चेचं!  अमुक विचार सर्वप्रथम अमुक भाषेतच व्यक्त होतात, यामागे केवळ भाषेची शब्दसंपदा आणि कोशगत शब्दांच्या आíथक संसाराचा हातभार नसतो तर  त्या भाषेच्या समस्त सामाजिक-सांस्कृतिक संदर्भाची पाश्र्वभूमी असते.. हा मुद्दा का लक्षात घ्यायचा आणि त्यामुळे परिणाम कायकाय होत आहेत, याचा हा ऊहापोह..

प्रत्येक भाषा ही एक विश्वदृष्टी असेल, एक विश्वच असेल तर भाषान्तर हे त्या अर्थी विश्वान्तरच होय. भाषान्तर म्हणजे दुसऱ्या भाषेत रूपान्तर, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेणे अशी फोड केली तर अर्थातच तो एका विश्वातून दुसऱ्या विश्वात प्रवेशही ठरत असतो. त्यामुळे ‘चांगल्या भाषान्तरांत भाषा सोडून काहीच बदलत नाही’ असे म्हणणे विनोदी ठरते.. कारण अनेकदा भाषा ही सर्वकाही असते अशी तात्त्विक भूमिकादेखील घेतली जाते आणि ती मान्य केल्यास ‘चांगल्या भाषान्तरांत भाषा सोडून काहीच बदलत नाही पण भाषाच तर सर्वकाही असते’ असे म्हणावे लागेल! अर्थात एखादे भाषान्तर कितीही सकस असले तरीही त्यात सर्वकाही बदलणे हे अटळच असते, असे म्हणावे लागेल.

ही तात्त्विक भूमिका आणि त्यातला गमतीचा भाग बाजूला; पण भाषान्तराने विश्वान्तराला नक्कीच हातभार लावलेला आहे हेच इतिहास सांगतो. धर्माचे प्रसार असोत की आधुनिक लोकशाहीचा विस्तार असो त्यात भाषान्तराची प्रधान भूमिका आहे. तिसऱ्या जगातील भारतसदृश देशांतील समस्या या त्या अर्थाने आधुनिकतेच्या, लोकशाही तत्त्वांच्या भाषान्तराच्या समस्या आहेत असेही म्हणता येईल. त्यामुळे लोकशाही असो, व्यापार असो, धर्मप्रसार असो किंवा मध्ययुगीन भारतीय भाषा आणि भक्ती-चळवळीचा पाया असो या साऱ्या गोष्टी भाषान्तरानेच पोसल्या गेलेल्या आहेत, शक्य झालेल्या आहेत. किंवा अगदी आत्ताचा राष्ट्रद्रोह, राष्ट्रवाद आणि राष्ट्र या संकल्पनांचा मुद्दा असो.. या साऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत भाषान्तरांच्या साहाय्यानेच पोहोचलेल्या आहेत.

कोणतेही भाषान्तर होण्यासाठी बहुभाषकता नांदणे आवश्यक असते. बहुभाषकतेअभावी भाषान्तर अशक्य असते. आणि चांगली गोष्ट अशी की जगातील अध्र्यापेक्षा जास्त लोक हे दोन किंवा त्यापेक्षा अधिक भाषा जाणणारे आहेत! त्यामुळे एकभाषक असणे हा नियम नाही आणि त्यातही भारतासारख्या देशात तर एकभाषकता ही अपवादानेच सापडावी अशी गोष्ट आहे.

बहुभाषकतेचा अभ्यास ही एक ज्ञानशाखा म्हणून विकसित होत आहे आणि बहुभाषकता (इ्र’्रल्लॠ४ं’्र२े, होय- या ज्ञानशाखेने आता द्वैभाषिकता हा शब्दार्थ असणारी ही संज्ञा बहुभाषकतेच्या अभ्यासासाठी स्वीकारलेली आहे) ही सामाजिक भाषाविज्ञान, मस्तिष्कलक्ष्यी भाषाविज्ञान, मनोलक्ष्यी भाषाविज्ञान आणि शिक्षणशास्त्र या ज्ञानशाखांतील अभ्यासपद्धती, मर्मदृष्टी घेऊन अभ्यासली जाते.

बहुभाषकता आणि भाषान्तर

अर्थातच बहुभाषकता आणि भाषान्तर यांच्यात घनिष्ठ संबंध आहे, तो पूर्वीपासूनच आहे आणि साहजिकच आहे. दोन्ही गोष्टी या संवादाच्या पक्षातील आहेत; नव्हे संवादावर आधारलेल्या आहेत. बहुभाषकतेत आणि भाषान्तरात अस्मिता व्यामिश्ररीत्या गोवलेल्या असतात. त्यापेक्षा महत्त्वाची बाब ही यांतून उद्भवणारा संवाद हा खरं तर नव्या कल्पना, नव्या विचारव्यूहांच्या शक्यता खुल्या करतो. सुरुवातीला उल्लेखिलेली ‘भाषा म्हणजे एक स्वतंत्र विश्व’ ही भूमिका फार टोकाची वाटत असल्यास किमान भाषा म्हणजे शब्दा-अर्थाची एक विशिष्ट व्यवस्था ही कल्पना मान्य होण्यात काही अडचण नसावी. एखाद्या भाषेच्या आíथक संसारापलीकडे भाषाबाह्य असे जे संदर्भ असतात ते भाषेतील विचारव्यूहांना दिशा देत असतात. एखाद्या भाषेचा भवताल हा विशिष्ट संदर्भ प्रदान करणारा असतो आणि त्यामुळे काही विचारव्यूह हे त्या भाषेत शक्य होत असतात. पण एखाद्या भाषेभोवती तसे संदर्भ नसतील तर, भाषान्तराच्या आधारे ते विचार पोहोचविता येऊ शकतात तसेच बहुभाषकताही याच कामाला हातभार लावते.

भाषान्तर आणि विचारव्यूह

कोणत्याही बहुभाषक समाजात त्या-त्या भाषांभोवतीचे संदर्भ हे त्या त्या भाषांचा इतिहास, त्या भाषांचे राजकीय आयाम यांच्यावर अवलंबून असतात. अमुक विचार प्रथम अमुक भाषेतच सर्वात आधी किंवा एखाद्या क्षणी का व्यक्त होतात, यामागे केवळ भाषेची शब्दसंपदा आणि कोशगत शब्दांच्या आíथक संसाराचा हातभार नसतो तर त्या भाषेच्या समस्त सामाजिक-सांस्कृतिक सन्दर्भाची पाश्र्वभूमी असते. आज आपण सगळे अशी ओरड ऐकतो की भारतीय भाषांमधून काही नवे वैज्ञानिक संशोधन होताना दिसत नाही, काही अभिनव विचार पुढे येताना दिसत नाहीत. विद्यापीठीय वर्तुळांतही (इंग्रजी सोडून) इतर भाषाविषयांत पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी मानविकी, सामाजिक विज्ञाने, विज्ञान, तंत्रज्ञान या विषयांच्या अभ्यासकांशी काही अर्थपूर्ण, ज्ञानात्मक पातळीवर दर्जेदार म्हणावा असा संवाद साधताना दिसत नाहीत. शिवाय मराठी माध्यम, हिन्दी माध्यम किंवा कोणत्याही भारतीय भाषांच्या माध्यमातून शिकणारे विद्यार्थी हे सकस नसतीलच असा ग्रह लोकांत दिसून येतोच. इंग्रजी येते म्हणजे हुशार असाही ग्रह आपल्या समाजात आहेच.

याचे मूळ कारण हे कोणत्याही द्वैभाषिक समाजात भाषांचे विषम (असमान) असे कार्य हे आहे. भाषांबाबत असे दृष्टिकोन वाढीस लागण्यामागे अर्थातच त्या त्या द्वैभाषिक समाजांतील भाषांमागील इतिहास, राजकारण, अर्थकारण, समाजकारण हे होत. त्यांचा परिणाम हा प्रशासकीय भाषिक शैक्षणिक धोरणावरही होत असतोच. बहुभाषक समाजात दोन भाषा अत्यंत समान पद्धतीने वावरतात असे अपवादत दिसते. किंबहुना, बहुभाषक लोकही आपल्याला ज्ञात असलेल्या भाषांत वेगवेगळी काय्रे करताना दिसतात. उदा. ही भाषा घरात वापरतो, ही कचेरीत; ही भाषा न्यायालयात वापरतो ही पक्षकारांशी बोलताना, अमुक भाषा दुकानांत/ घराबाहेर, अमुक भाषा घरांत!

शेकडो उदाहरणे देता येतील. परिपूर्ण काटेकोर रीतीने दोन्ही भाषांतून तीच काय्रे करता आली असती तर अर्थातच या दोन भाषांतून व्यक्त होणारी अस्मिता आणि भागणाऱ्या गरजा या गोष्टीही समान ठरल्या असत्या. थोडक्यात, सर्व संदर्भात दोन्ही भाषांतून समान प्रभुत्वाने बोलणारे भाषक हे एक मिथक आहे आणि सर्व संदर्भात समान पद्धतीने उपयोगात आणल्या जातात असे बहुभाषक समाजही थोडकेच आहेत. भाषा आणि त्यांचे विशिष्ट संदर्भ या गोष्टी बहुभाषक समाजात बऱ्यापकी निश्चित स्वरूपाच्या असतात.

असे असल्यामुळेच त्याचे पडसाद हे भाषान्तरावरही पडतात. एखाद्या भाषेतील सारेच काही इतर भाषांत भाषान्तरित होताना दिसत नाही. यामागे संदर्भाची पाश्र्वभूमी तर असतेच पण शिवाय भाषांचे आणि भाषान्तराचे राजकारणही असते. आपल्याला एखादे भाषान्तर, एखादे व्याख्यान हे बोजड वाटते तेच मुळी अनेकवेळा लक्ष्य (ज्या भाषेत भाषान्तर झाले आहे ती) भाषेतील अपुऱ्या संदर्भामुळे. उदा. काही मराठी समीक्षक फार बोजड लिहितात असा ग्रह मराठी विद्यापीठीय वर्तुळांतील लोकांचा आणि अर्थातच त्या बाहेरील लोकांचा होताना दिसतो. तोही या समीक्षकांच्या व्याख्यानांना, विचारांना असणारे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, समीक्षा किंवा भारतीय परंपरेतील विचारांचे संदर्भ आपल्याला ठाऊक नसतात म्हणून. बोजड वाटणारी व्याख्याने आणि बोजड वाटणारी भाषान्तरे ही अनेकदा या संदर्भाच्या विषमतेमुळे तशी भासत असतात. त्यामुळे केवळ भाषान्तरे करून टाकली की दोन भाषांतील वैचारिक ऐवज समसमान होईल असे नसते. उलट तसे होणे हिताचेही ठरणार नाही. प्रत्येक समाज हा त्याच्या निकडीनुसार, संदर्भानुसार काय हवे ते निवडत राहील आणि भाषान्तर करीत राहील तेव्हाच त्या निवडीतून त्याची स्वतची अस्मिता, स्वतचे असे विचारविश्व उभे राहील. केवळ भाषान्तर करून होणार नाही. भाषान्तरित संहितांवर, भाष्यांवर सतत बोलत राहिलो, त्या भाषान्तरांना, भाष्यांना एका ज्वलंत चर्चाविश्वाची जोड मिळाली तर भारतीय भाषांना त्यांचे स्वतचे असे अनेक विचारव्यूह खुले होतील, विद्यमान विचारव्यूह संपन्न होतील.

आधुनिकता आणि भाषान्तर यांच्यात घनिष्ठ संबंध आहे. आधुनिकतेचा, लोकशाही तत्त्वांचा, राष्ट्र या संकल्पनेचा अनुषंगाने कादंबरी या साहित्यप्रकाराचाही संबंध आहे. मुळात आधुनिकतेचे वहनच एका अर्थाने भाषान्तराच्या माध्यमातून झालेले आहे. कादंबरी आणि चित्रपट तंत्रज्ञान यांचे उदाहरण घेऊ. कादंबरी हा प्रकार आधुनिकता आणि राष्ट्र यांचा वाहक आहे आणि त्यांच्यासोबत जन्माला आलेला आहे. असे असले तरी एकदा का भाषान्तरे होत गेली तसा हा प्रकार भारतीय भाषांत रुजला आणि तो अत्यंत आपलासा वाटू लागला. तीच गोष्ट चित्रपट आणि चित्रपट तंत्रज्ञानाची आहे. आधुनिकतेसोबत ते आले खरे पण भारतीय चित्रपट ही एक स्वतंत्र अभिरुचिव्यवस्था म्हणून स्थिरावलेली आहे. भाषान्तरे किंवा रूपान्तरे हे विश्वान्तर कसे आणि त्यातून आपल्या अभिरुचिव्यवस्था, आपल्या अभिव्यक्तीचे प्रकार कसे साकारले जातात हे यातून स्पष्ट होते.

अशीच गोष्ट ही इतर विचारव्यूहांमध्ये, वैज्ञानिक विषयांमध्ये, शास्त्रपरंपरांमध्ये, त्यांच्या संवादांमध्ये, मानविकी आणि सामाजिक शास्त्रांमध्ये, कायद्याच्या विषयांमध्ये झालेली आहे. भाषान्तराच्या आरंभिबदूपासून स्वतचे विचारव्यूह रचले गेलेले आहेत. अर्थात हे आपल्या भारतीय भाषांमध्ये कितपत प्रभावीपणे झालेले आहे, हा मुद्दा विचारार्ह आहे. हे सारे विषय भारतीय भाषांत बोजड वाटण्याची तक्रार हीच मुळात आपल्या या भाषांबद्दलच्या दृष्टिकोनात आहे. आपले हे दृष्टिकोन हेदेखील वर म्हटल्याप्रमाणे विशिष्ट सामाजिक, आíथक, सांस्कृतिक संदर्भाची निपज आहेत. यांचाच परिणाम आपल्या प्रशासकीय धोरणांवरही दिसतो. आणि भारतीय भाषांमधून नवविचार, त्यांचे व्यूह हे अशा एका दुष्टचक्रात अडकतात. बहुतेक वेळा विद्यापीठीय वर्तुळातील लोक, प्रकाशक – ‘नाही, नाही या पुस्तकाचं भाषान्तर मराठीला झेपणार नाही’ असे म्हणताना दिसतात. तेव्हा अर्थातच हे विधान मराठी भाषेच्या पारिभाषिक न्यूनतेबाबतचे कमी आणि मराठीजनांच्या मराठीच्या वापरासंबंधीचे अधिक असते.

हा वापर वाढत नाही कारण इंग्रजीसारख्या भाषेशी असलेले इतर भारतीय भाषांचे [अर्थातच इंग्रजी भारतीय भाषा नाही असे इथे अभिप्रेत नाही] सत्तासंबंध हे गुंतागुंतीचे आहेत. इंग्रजी आणि इतर भारतीय भाषा यांच्यातील द्वैभाषिकतेतून भारतीय भाषांना ज्ञानशाखीय ऐवज समृद्ध करत राहावा लागेल किंवा भारतीय भाषा आपण अमुक अमुक बाबतीतच वापरतो : मनोरंजन, कला, साहित्य, वृत्तपत्रे, चर्चा. उच्च शैक्षणिक, ज्ञानात्मक देवाणघेवाणीसाठी जरा कमीच असा संकोच आपण स्वीकारत आहोत असे म्हणावे लागेल.

लेखक कासारगोड येथील ‘केरळ केंद्रीय विद्यापीठा’च्या भाषाविज्ञान विभागात सहायक प्राध्यापक आहेत.

ईमेल : chinmayvijay1@gmail.com