नीना गुप्ता या व्यक्तिमत्त्वाला बंडखोरी हा शब्द चिकटलेला आहे. जे समाजमान्य आहे ते आंधळेपणाने स्वीकारून पुढे जात राहणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीच नव्हते. प्रचलीत समज, रूढी दूर सारत जगण्याचा आपल्या परीने मार्ग शोधायचा, आपली वहिवाट आपणच बनवायची या शिरस्त्याने त्या जगत आल्या. जो बाणा व्यक्तिगत आयुष्यात होता, तोच पुढे चित्रपट क्षेत्रात काम करतानाही त्यांनी जपला. बंडखोर स्वभावाच्या या शिक्क्यामुळे अभिनेत्री म्हणून सरळ स्वभावी तरुणीच्या भूमिका कधीच आपल्या वाट्याला आल्या नाहीत, याबद्दल जाहीरपणे खंत व्यक्त करणाऱ्या नीना गुप्ता यांच्या वरवर शांत भासणाऱ्या आयुष्यातील झंझावात ‘सच कहूँ तो’ या त्यांच्या आत्मचरित्रातून वाचायला मिळणार आहे.

नीना गुप्ता आणि त्यांची मुलगी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा या दोघींच्या आयुष्यावर बेतलेली ‘मसाबा मसाबा’ ही वेबमालिका याआधीच ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाली आहे. ही वेबमालिका प्रदर्शित झाली तेव्हा या मायलेकी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत आल्या होत्या. नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील बऱ्याच महत्त्वाच्या घटना ‘मसाबा मसाबा’मध्येही पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर नीना गुप्ता यांचे ‘सच कहूँ तो’ हे आत्मकथन आणखी नवे काय सांगणार, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण ‘मसाबा मसाबा’ या वेबमालिकेत दाखवल्या गेलेल्या या दोघींच्या आयुष्यातील बहुतांश घटना या मसाबाच्या नजरेतून टिपल्या गेल्या आहेत, हे दुर्लक्षिता येणार नाही.

अभिनयाची पार्श्वभूमी नसताना राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून अर्थात एनएसडीमधून प्रशिक्षण घेऊन नीना गुप्ता हिंदी सिनेसृष्टीत दाखल झाल्या. समांतर तसेच काही चांगल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या, मात्र समकालीन शबाना आझमी, स्मिता पाटील यांच्याप्रमाणे त्यांना व्यावसायिक यश का मिळवता आले नाही, इथपासून ते क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याबरोबर असलेले प्रेमसंबंध, अविवाहित मातेच्या पोटी जन्माला आलेली मसाबा, त्यावेळच्या आर्थिक -सामाजिक आव्हानांना तोंड देत एकल पालक म्हणून तिचा सांभाळ, वैयक्तिक निर्णयांचा कारकीर्दीवर झालेला परिणाम… अशा अनेक घटनांविषयी त्यांनी हातचे काही न राखता आत्मकथनात लिहिले असावे. नीना गुप्ता या प्रसिद्ध चेहऱ्यामागे दडलेला एका स्त्रीचा, तिने घेतलेल्या निर्णयांचा, त्यातून उमटलेल्या परिणामांचा आणि त्याची जबाबदारी घेत केलेल्या संघर्षाचा आलेख या आत्मकथनात वाचायला मिळेल का, हे जाणून घेण्यासाठी १४ जूनपर्यंत वाट पाहावी लागेल.