‘रूमी’ म्हणजे बाराव्या शतकातला, फारसी भाषेत रचना करणारा कवी आणि भारतीय उपखंडातल्या सूफी पंथावरही त्याचा प्रभाव दूरान्वयानं शोधता येतो, हे अनेकांना माहीत असतं-अगदी रूमीच्या कविता वाचल्या नसल्या तरी! रूमीचा मोठा शिष्यपरिवार होता, त्यांच्यासाठी तो ‘मौलाना’ (गुरू) होता आणि रूमीच्या कवितांप्रमाणेच त्याची वचनं- त्याच्या शहाणिवेचे शब्द-या शिष्यांनी टिपून ठेवले आणि रूमीनं सांगितलेल्या गोष्टी, रूमीची प्रवचनं, रूमीची वाक्यं या साऱ्यांचं ते संकलन ‘फीहे-मा- फी:’ या नावानं ओळखलं जातं. त्या संकलनातल्या निवडक भागाचं फेरसंकलन आता ‘रूमीज लिट्लि बुक ऑफ विज्डम’ या नावानं उपलब्ध झालं आहे. मरियम मफी या ‘रूमीच्या अनुवादक’ म्हणून ओळखल्या जातात; त्यांनी यापूर्वी ‘रूमीज लिट्लि बुक ऑफ…’ या मालिकेत प्रेम, आयुष्य, हृदय अशी निरनिराळी फेरसंकलनं केली आणि त्या पुस्तकांसाठी रूमीच्या कवितांचा (मसनवी आणि दीवान-ए-शम्स) आधार घेतला. ‘फीहे-मा- फी:’ हे निराळं पुस्तक-त्यात सारं गद्यच. पद्य नाही. तरीही, रूमीच्या वचनांना रूमीच्या काव्याचाच गंध आहे, त्याचं ‘म्हणणं’ दोन्हीकडे सारखंच आहे, असं लंडन विद्यापीठाच्या फारसी विभागात कार्यरत असलेल्या नर्गिस फरझाद यांनी ‘रूमीज लिट्लि बुक ऑफ विज्डम’च्या प्रस्तावनेत म्हटलं आहे. या रूमी-वचनांची इंग्रजीतली दोन फेरसंकलनं यापूर्वीही ग्रंथरूप झाली होती, याकडे फरझाद लक्ष वेधतात. पण रोचकतेच्या दृष्टीनं मरियम मफी यांचं काम अधिक सरस आहे.

‘आशा हीच तुमची संरक्षक आहे’ किंवा ‘तुमचा मान तुम्ही परत मिळवलात, की पूर्वीच्या तुमच्या चुकाही विसरल्या जातील’ अशी आजच्या स्पर्धात्मक युगात उपयुक्त ठरणारी वचनंसुद्धा या पुस्तकात दिसतील! पण लौकिकाला पारलौकिकाची जोड देणं, हे या पुस्तकातल्या २५० पैकी बहुतेक वचनांचं वैशिष्ट्य आहे. शरीर भंगुर आहे आणि आत्मा (रूह) शाश्वत आहे, याची जाणीव रूमीला आहेच. पण ईश्वराला आत्मा वाहून टाकण्याची सूफी कल्पना शिष्यांपर्यंत पोहोचवतानाच, ‘नास्तिक असोत की अस्तिक, जोवर माणसे सज्जन आहेत, तोवर ती ईश्वरसेवाच करीत असतात’ यासारखे विचारही रूमी मांडतो, म्हणून हे पुस्तक वाचनीय. ‘कवी’पणामुळे प्रचलित धर्मकल्पना, ईश्वरकल्पना यांच्या पुढे जाता येते, हे महाराष्ट्रीय संतकवींनी सिद्धच केलेले सत्य रूमीच्या वचनांमधून पुन्हा प्रतीत होते!