राजीव गांधी यांच्या काळापासून भारतीय अवकाश-कार्यक्रमाने जी विविधांगी झेप घेतली, तिचे ‘इस्रो’मधील साक्षीदार आणि एक शिल्पकार ठरलेले कृष्णस्वामी कस्तुरीरंगन हे पुढे देशाच्या अवकाश विभागाचे सचिव झाले आणि पी. व्ही. नरसिंह रावांपासून इंदरकुमार गुजराल, एच. डी. देवेगौडा आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह कामाची संधी त्यांना मिळाली. मग २००३ ते २००९ दरम्यान ते राज्यसभा सदस्यही होते. भूसंकालिक उपग्रह वाहक यान (जीएसएलव्ही) तयार करण्याचा महत्त्वाचा टप्पा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याने आज भारत अन्य देशांचेही उपग्रह सोडण्याची कंत्राटे घेऊ शकतो. निम्नतापी (क्रायोजेनिक) इंजिनही भारतात बनवण्याच्या संशोधनाची सुरुवात त्यांनी केली. अशा पायाभूत कामामुळेच ‘चांद्रयान’ची महत्त्वाकांक्षा आज भारत ठेवू शकतो. या कस्तुरीरंगन यांचे आत्मचरित्र एरवी विज्ञान-तंत्रज्ञान विषयाला वाहिलेली पुस्तके प्रकाशित करणाऱ्या ‘स्प्रिंगर’तर्फे यंदा एप्रिलमध्येच प्रकाशित झाले असले, तरी भारतात अद्याप त्याची ‘ई-बुक’ आवृत्तीही अडीच हजार रुपयांना विकली जाते आहे! मात्र या पुस्तकाविषयीच्या उत्कंठेचे कारण याहीपेक्षा जास्त असू शकते.

‘या पुस्तकाचे एक पैशाचेही मानधन (रॉयल्टी) मी घेणार नाही’ असे विधान कस्तुरीरंगन यांनी नुकतेच ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आणि याच मुलाखतीत, ‘तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचे वाटणारे तुमचे काम कोणते?’ या प्रश्नावर ‘नवीन शैक्षणिक धोरण-२०२० तयार करणे’ हे उत्तर त्यांनी दिले! या पुस्तकाचा भर ‘इस्रो’मधील झेपावत्या दशकांची कथा सांगण्यावरच आहे, शैक्षणिक धोरणाविषयीची आत्मपर प्रकरणे त्यात नाहीत.. ती संभाव्य पुढल्या भागात असतील; पण मग तोवर, ८० वर्षांच्या कस्तुरीरंगन यांनी आणखी कुठले यश मिळवले असेल?