यशोधन जोशी

इतिहास हा केवळ लढाया आणि राजवटींचा नसतो. निव्वळ मोठय़ा घडामोडींपेक्षा अनेक लहान-मोठय़ा व्यक्तींच्या जगण्यातून इतिहास आकार घेत असतो. अशा व्यक्तींच्या जगण्याकडे टाकलेला एखादा कटाक्षही ऐतिहासिक प्रक्रियांचे सजग भान देऊन जातो. इतिहास घडविणाऱ्या अशाच काहींवर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..

आपल्याकडे इतिहासलेखन हे लढाया, त्यानंतरचे तहनामे, राजे-राजवाडे वत्यांची राजवट यांच्याच माहितीने भरलेले असते. पण इतिहास यात अडकून पडलेला नसतो, तर तो नेहमी छोटय़ामोठय़ा गोष्टींतून वाहणारा प्रवाह असतो. कालांतराने यातल्या अनेक रंजक घटना लुप्त होतात. ‘द कोर्टेझन, द महात्मा अ‍ॅण्ड द इटालियन ब्राम्हीन : टेल्स फ्रॉम इंडियन हिस्टरी’ या पुस्तकात मनु पिल्लई या लेखकाने ब्रिटिशपूर्व आणि ब्रिटिशकाळातील अशाच काही घटनांचा आढावा जवळपास ६० लेखांतून घेतलेला आहे. त्यातील काही लेखांचा हा धांडोळा..

पुस्तकाच्या शीर्षकात ज्या ‘इटालियन ब्राह्मिन’चा निर्देश केला आहे, त्याची कहाणी अशी.. रॉबर्तो डी नोबिली नावाचा इटालियन धर्मप्रसारक १६०४ मध्ये कॅथलिक चर्चमार्फत मदुराईत दाखल झाला. धर्मप्रसारासाठी त्याने अनोखी पद्धत अवलंबली, ती म्हणजे तो स्वत:च हिंदू झाला. त्याने वेदाभ्यास सुरू केला आणि त्यात पारंगत झाल्यावर नोबिलीने प्रवचने द्यायला सुरुवात केली. या प्रवचनांतून बायबलचीच शिकवण तो देत असे. याने प्रभावित होऊन हळूहळू अनेक ब्राह्मणांनी धर्मातर केले. भारतातल्या इतर ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी नोबिलीच्या या हिंदू होण्याला व धर्मातराच्या या प्रकाराला कडाडून विरोध केला. परिणामी नोबिलीला मदुराईमधून बाहेर पडावे लागले व काही वर्षांतच त्याचा विपन्नावस्थेत मद्रासजवळच्या मैलापूरला मृत्यू झाला.

एका लेखात इ.स. १७१२ मध्ये तंजावरच्या शाहुजी महाराजांनी एका नाटकाची निर्मिती केली, त्याचा संदर्भ येतो. या नाटकात एक शूद्र स्त्री आणि तिच्यावर लुब्ध झालेला एक विद्वान ब्राह्मण ही मुख्य पात्रे आहेत. ती स्त्री ब्राह्मणाला- ‘मी गोमांस खाते आणि तू तर गाईची पूजा करतोस’ हे कारण देऊन झिडकारण्याचा प्रयत्न करते. पण ब्राह्मण त्यावर असा युक्तिवाद करतो की, ‘तू तर गायच खातेस, मग तू तर माझ्यापेक्षा जास्त शुद्ध असली पाहिजेस!’ यातून नाटक पुढे सरकत जाते आणि शेवटी शंकर प्रकट होऊन या प्रकरणाचा निवाडा करतात. प्रतीकात्मक असलेल्या या नाटय़ातून शाहुजी महाराजांना गाय खाणारा व गाईला पूज्य मानणारा हे एकाच वेळी हिंदू असू शकतात आणि आपापल्या धर्माचे पालन करू शकतात, हे दाखवायचे असावे.

दक्षिण भारतातील थिरूवरंगम येथील अरंगनाथर या विष्णूच्या अवताराचे एका मुस्लीम राजकन्येशी लग्न झाल्याची कथा रूढ आहे. ही राजकन्या तुघलक राजकन्या होती, असे मानले जाते. अशाच अर्थाची एक कथा कर्नाटकातील थिरूनारायणपूरम येथेही रूढ आहे. मुस्लीम राजकन्येने या देवस्थानांचे इस्लामीकरणापासून संरक्षण केले किंवा या हिंदू देवालयांत मुस्लीम राजकन्येला देवतारूपाने स्थान देऊन मुस्लीम धर्मालाच हिंदू परंपरेत सामावून घेण्याचा प्रयत्न म्हणून याकडे बघता येईल. त्याविषयी लेखकाने एका लेखात लिहिले आहे.

सनातन हिंदू धर्मापासून फारकत घेऊन लिंगायत विचारधारेची सुरुवात केलेल्या बसवेश्वरांनी शिव हाच एकमेव ईश्वर मानून एक नवीन उपासनामार्ग सर्वसामान्यांसाठी निर्माण केला. या विचारधारेला अनुसरणारे समाजातले सर्व घटक होते, स्त्रियांनाही यात समान सन्मान होता. जातीपातीची उतरंड मोडून काढण्यात बसवेश्वरांना काहीसे यशही आले, पण सनातन्यांचा रोषही ओढवून घ्यावा लागला. बसवेश्वरांच्या मृत्यूनंतरही ही विचारधारा टिकली आणि विजयनगर साम्राज्यात या धर्माला राजाश्रयही मिळाला. या साऱ्याचा लेखाजोखा लेखकाने मांडलेला आहे. लिंगायत स्त्री संत आणि कवयित्री त्यांच्या भावना काव्यात कशा धाडसीपणे मांडत, याचे मोजके दाखले देत लेखक अभ्यासकांना या रचना अभ्यासण्यास उद्युक्त करतो.

अकबराची पत्नी मरियम-उझ-झमानी ही अकबरानंतरही काही काळ जिवंत होती. तिचा मुगल दरबारात मोठा दबदबा होता. स्वत:च्या जहाजातून ती मध्यपूर्वेतील देशांत व्यापार करत असे. तिच्या ताफ्यातल्या ‘रहीमी’ जहाजाला लुटून पोर्तुगीजांनी ते जाळून टाकले. या अपमानाचा बदला म्हणून जहांगीरने पोर्तुगीजांच्या दमण आणि सुरतमधल्या वखारी लुटल्या आणि त्यांना सुरतेत व्यापाराला बंदी केली. पोर्तुगीजांनी खंडणी भरून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतानाच काही अटी लादण्याचा प्रयत्न केला; परिणाम पोर्तुगीजांची सुरतेतून उचलबांगडी झाली. नेमक्या याच वेळी जहांगीरकडे आलेल्या इंग्रजांचे नशीब फळफळले आणि त्यांना सुरतेत वखार घालण्याची परवानगी मिळाली, हा योग लेखक उलगडून दाखवतो.

खरे तर इतिहासात कल्पनाविस्ताराला काहीही स्थान नाही, पण तरीही आपण त्यात रमतो. हाच धागा पकडून विजयनगरचे साम्राज्य लयाला गेले नसते तर काय झाले असते, याबद्दल लेखक सांगतो. विजयनगर तालिकोटच्या लढाईत पराभूत झाले नसते तर भारत मुघल आणि विजयनगर यांत विभागला गेला असता. दक्षिणेतील शाह्य़ा विजयनगरचे मांडलिकत्व पत्करून मुघलांशी लढत्या. मुघल जरी मध्यपूर्वेतून व इतर विदेशी इस्लामी राजवटींकडून नवनवीन तंत्रज्ञान मिळवत असले, तरी विजयनगरही पोर्तुगीज आणि इतर परदेशी सत्तांच्या संपर्कात राहून आधुनिक झाले असते. पुढच्या काळात मराठे, हैदराबादचा निजाम आणि टिपू उदयाला आले नसते आणि भारताच्या इतिहासाला वेगळे वळण लागले असते.

विजयनगरच्या साम्राज्याबद्दल अजूनही काही रंजक गोष्टी लेखक नमूद करतो. विजयनगर आणि दख्खनमधील पाच शाह्य़ा यांच्यातील कुरबुरीतून कृष्णदेवरायाने त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचा पराभव केला, पण त्यांना आपल्या राज्याला जोडण्याऐवजी कृष्णदेवरायाने त्यांना आपले मांडलिक बनवले आणि ‘यवनराज्य स्थापन आचार्य’ ही पदवी धारण केली. विजयनगरचे सत्ताधीश हे स्वत:ला ‘हिंदुराय सुरत्राण’ म्हणजे हिंदू सुलतान हे बिरुदही लावत.

जोआना नोबिलिस किंवा बेगम समरू ही नावे अनेकांना परिचित नसतील. पुस्तकातील एका लेखात त्यांची ओळख होते. दिल्लीतल्या एका दुय्यम दर्जाच्या सरदाराच्या नाटकशाळेतली ही मुलगी- जी पुढे एका जहागिरीची बेगम झाली, तिची विलक्षण गोष्ट लेखक सांगतो. वॉल्टर रेनहार्ट या जर्मन वंशाच्या उचापती सेनाधिकाऱ्याशी तिने लग्न केले. सगळ्यात पहिल्यांदा त्याने ‘सॉमर्स’ या नावाने फ्रेंचांची चाकरी पत्करली. तिथून तो ब्रिटिशांना जाऊन मिळाला आणि ‘सॉम्बर’ हे नाव धारण केले. तिथूनही पळ काढून त्याने बंगालच्या नवाबाकडे चाकरी पत्करली. इथे त्याच्या नावाचे देशी रूप झाले ‘समरू’ आणि त्याच्या बेगमला ‘समरू बेगम’ हे नाव पडले. जाट आणि बादशहा शहाआलम असे धनी बदलत तो दिल्ली दरबारात स्थिरावला. सरधाणाची जहागीर त्याला बादशहाकडून मिळाली. रेनहार्ट मरण पावल्यावर बेगम समरूने बादशहाकडून ही जहागीर आपल्या पदरात पाडून घेतली आणि त्या बदल्यात बादशहाची चाकरीही उत्तमरीत्या बजावली. १७८१ मध्ये समरू बेगमने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तरीही तिने मुस्लीम वेश आणि रीतभातींचा त्याग केला नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तिने इंग्रजांशीही गोडीगुलाबीचे संबंध प्रस्थापित करून १८३८ मध्ये मरण पावेपर्यंत आपले राज्य राखले.

ब्रिटिशांचे राज्य आले नसते तर भारताचे चित्र कसे दिसले असते, याबद्दलही लेखकाने चर्चा केली आहे. त्याचे सार असे : दक्षिण भारतात फ्रेंचांचे प्राबल्य होते. काही काळापुरते त्यांनी ब्रिटिशांना दक्षिण भारतातून हद्दपारच केले होते. टिपू सुलतान आणि फ्रेंच यांचेही संबंध उत्तम होते. टिपूने आपल्या मुलाला फ्रान्सला यांत्रिकी शिकायला पाठवण्याचीही तयारी केली होती. टिपू आणि फ्रेंच यांच्या संयोगातून युरोपातली औद्योगिक क्रांती टिपूच्या राज्यात अवतरलीही असती. उत्तरेत मुघलांचे राज्य कायम राहून सर्वाधिकार मात्र मराठय़ांच्या हाती राहिले असते.. मात्र, इथे लेखक टिपूच्या कर्तृत्वाचे गोडवे गाताना मराठय़ांनी सत्ता न राबवता फक्त लुटालूट केली, असे म्हणतो. मराठय़ांकडे चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा होत्या, त्यामुळे वसुली करणे हा मराठय़ांचा हक्कच होता. त्यात काही वेळा रक्तपात होणे अगदी साहजिक होते. महाराष्ट्र पुराणातील मराठा बारगिरांच्या लुटालुटीबद्दलच्या चार ओळींचा संदर्भ देऊन लेखक मराठय़ांना बोल लावतो. मराठय़ांची भूमिका जर लुटारूची असती, तर मराठय़ांना अब्दालीविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाण्याची गरजच नव्हती, हे मात्र लेखक साफ विसरला आहे असे वाटते.

सामान्य कारकून म्हणून भारतात येऊन स्वत:च्या योग्यतेवर बंगालच्या गव्हर्नरपदापर्यंत पोहोचलेल्या रॉबर्ट क्लाइव्हची गोष्ट लेखक सांगतो. क्लाइव्ह हा धडाडीचा खरा, पण तेवढाच भ्रष्टही होता, हेही लेखक नमूद करतो. १७७३ मध्ये त्याच्यावर या कारणाने खटलाही भरला गेला. त्यातून त्याची सुटका झाली, पण त्याच्या प्रतिष्ठेला मोठय़ा प्रमाणात धक्का बसला. यातून तो सावरला नाही आणि १७७४ साली बहुधा अफूच्या अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाला.

भारताच्या इतिहास संशोधनाची पायाभरणी करण्याचे श्रेय विल्यम जोन्सकडे जाते. त्याच्या या कार्याची माहिती देणारा एक लेख पुस्तकात आहे. जोन्स संपूर्ण आयुष्यात २८ भाषा शिकला. १७८३ साली तो कोलकाता येथील न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून भारतात दाखल झाला. आपल्या कामासोबत इतर कोणत्या विषयांवर अभ्यास करायचा आहे, याची यादीही त्याने प्रवासातच तयार केलेली होती. भारतात आल्यावर त्याला इथल्या समृद्ध इतिहासाची जाणीव झाली आणि वर्षभरातच त्याने ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ची स्थापना केली. इतिहासअभ्यासासाठी संस्कृतची गरज भासल्यावर त्याने गुरुकुल पद्धतीने संस्कृतचे शिक्षण घेऊन त्यातही प्रावीण्य मिळवले. ‘शाकुंतल’चे इंग्रजी भाषांतर हे त्याचेच फळ. ग्रीक आणि संस्कृतच्या ज्ञानातून त्याने भारताच्या इतिहासात मोठी भर घातली. शिलालेखात सापडणारा उल्लेख ‘देवानां पियदसी’ म्हणजे सम्राट अशोक हे जोन्सने शोधून काढले. ग्रीक साहित्यात उल्लेख येणारे पालिबोथरा म्हणजे मौर्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पटणा) आणि सॅनड्रोकोटस म्हणजे चंद्रगुप्त, हे जोन्सने सिद्ध करून दाखवले. पण या दरम्यान भारतातले वातावरण न झेपल्याने तो वारंवार आजारी पडत होता आणि अखेर त्यातच त्याचा मृत्यू झाला.

‘शतरंज के खिलाडी’ सिनेमामुळे आपल्याला अवधचा नवाब वाजीद अलीशाह माहीत असतो, पण अवध खालसा होऊ नये म्हणून धडपड करणारी त्याची आई मलिका किश्वर मात्र आपल्याला माहीत नसते. तिच्याविषयी पुस्तकात एक लेख आहे. अवधचे राज्य ब्रिटिशांनी खालसा करून वाजीद अलीशाहला पदच्युत केले व संपूर्ण राजघराण्याची रवानगी कोलकात्याला केली. याविरोधात आवाज उठवला तो मलिका किश्वरने. भारतात दाद लागत नाही म्हटल्यावर तिने इंग्लंडच्या राणीकडेच दाद मागायचे ठरवले. इंग्लंडची राणीही स्त्री आहे, तिलाही मुलेबाळे आहेत, तर तिला आपली व्यथा समजेल, असा विचार करून अनेक अडचणींना तोंड देत ती इंग्लंडला जाऊन पोहोचली. तिची आणि राणीची भेटही झाली, पण राणीच्या हातातही काहीच नव्हते. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही तिच्या पदरी काही पडले नाही. दरम्यान भारतात १८५७ च्या बंडाची सुरुवात झाली. मग सगळीच गणिते फिस्कटली. निराशेने ती भारतात  यायला निघाली, पण हवामान न झेपल्याने मलिका किश्वरचे पॅरिसमध्येच निधन झाले.

भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासावर ठसा उमटवणाऱ्या काही अधिकाऱ्यांची दखलही लेखकाने घेतलेली आहे. तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा आणि सावित्रीबाई फुले, अ‍ॅनी बेझंट, थोर गणितज्ञ रामानुजन आणि त्यांची पत्नी, विवेकानंद अशा वेगवेगळ्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींच्या जीवनाचा आढावा लेखकाने घेतला आहे, त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या घटनांबद्दल- जसे की, सावरकर व त्यांची मार्सेलीसची गाजलेली उडी, बाबरी मशिदीविषयीच्या ऐतिहासिक घडामोडी, फुटबॉल आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ- रोचक माहिती देतो.

‘द कोर्टेझन, द महात्मा अ‍ॅण्ड द इटालियन ब्राम्हीन : टेल्स फ्रॉम इंडियन हिस्टरी’

लेखक : मनु पिल्लई

प्रकाशक : कॉन्टेक्स्ट

पृष्ठे : ३९४, किंमत : ३९५ रुपये

yashjoshi.in@gmail.com