20 September 2020

News Flash

महाकथाकाराची आत्मकथा!

फ्रेडरिक फोर्सिथचा जन्म इंग्लंडच्या केंट परगण्यातील अ‍ॅशफर्ड या गावी झाला.

‘द डे ऑफ जॅकल’, ‘द ओडेसा फाईल’ या सुरुवातीच्या कादंबऱ्यांपासून ‘द कोब्रा’, ‘द किल लिस्ट’ या अलीकडच्या कादंबऱ्यांपर्यंत सातत्याने लोकप्रिय राहिलेल्या फ्रेडरिक फोर्सिथनं आपला हा लेखकीय प्रवास ‘द आउटसायडर – माय लाइफ इन इंट्रिग’ या आत्मचरित्रातून मांडला आहे. पत्रकारितेनं कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या फोर्सिथनं कादंबरीलेखनात पाऊल कसं टाकलं इथपासून ते त्याच्या कादंबऱ्यांच्या ‘कथेमागची कथा’ सांगत, व्यक्तिगत रागलोभ, राजकीय मतं नोंदवत हे आत्मकथन पुढं सरकत राहतं.. रंगतदार, तरीही प्रांजळ आत्मकथनातून या महाकथाकाराची नव्याने ओळख होते..

ज्यांची पुस्तके पहिल्या वाक्यापासून अखेरच्या वाक्याच्या पूर्णविरामापर्यंत हातातून खाली ठेवावीशी वाटत नाहीत, अशा वाचकप्रिय लेखकांच्या नामावलीत ब्रिटिश कादंबरीकार फ्रेडरिक फोर्सिथ याचा क्रम बराच वरचा. ‘द डे ऑफ जॅकल’, ‘द डॉग्ज ऑफ वॉर’, ‘द ओडेसा फाईल’,  ‘द फिस्ट ऑफ गॉड’, ‘द अफगाण’, ‘द कोब्रा’, ‘द किल लिस्ट’ या त्याच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या. आजमितीला त्याच्या कादंबऱ्यांच्या सात कोटींहून अधिक प्रती खपल्या असून जगातील विविध भाषांत त्यांचे अनुवाद झालेले आहेत. या वाचकप्रियतेचे कारण म्हणजे फोर्सिथच्या या कादंबऱ्या केवळ हेरगिरी करणाऱ्या चातुर्यकथा नव्हत्या, तर त्यातून आंतरराष्ट्रीय राजकारण, कटकारस्थाने, नवी संहारतंत्रे आणि दहशतवादाची बदललेली समीकरणे यांचे वस्तुनिष्ठ चित्रण वाचकप्रत्ययास येत होते. या कादंबऱ्यांपैकी काही रुपेरी पडद्यावर झळकल्या, तेव्हा त्या चित्रपटांनाही प्रेक्षकप्रियता लाभली. गुप्तहेर कादंबरीकार म्हणून उदंड यश, संपत्ती आणि कीर्तीचा धनी झालेल्या फोर्सिथने आरंभी वैमानिक म्हणून काम केले होते आणि नंतर त्याने पत्रकारिता व हेरगिरीही केली. त्याचे हे अनुभूतिसंचित ‘द आऊटसायडर : माय लाइफ इन इंट्रिग’ या आत्मचरित्रातून गतिमान शैलीत प्रकटले आहे.

फ्रेडरिक फोर्सिथचा जन्म इंग्लंडच्या केंट परगण्यातील अ‍ॅशफर्ड या गावी झाला. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. ब्रिटिश किनारपट्टीजवळील अ‍ॅशफर्डमधील त्याचे बालपण दुसऱ्या महायुद्धाच्या सावलीत गेले. त्याला ज्या शाळेत दाखल करण्यात आले, ती कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध होती. परिणामी तो एकांतप्रिय वृत्तीचा झाला. टोनब्रिज स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो स्पेनमधील ग्रॅनाडा विद्यापीठात दाखल झाला. फोर्सिथला मातृभाषा इंग्रजीखेरीज इतर अनेक भाषा चांगल्या प्रकारे अवगत होत्या. या भाषाशिक्षणाविषयी त्याने आत्मचरित्रात विस्ताराने लिहिले आहे. लहानपणी फ्रेंच आणि जर्मन कुटुंबात राहून त्याला त्या भाषा शिकण्याची संधी मिळाली. फ्रेंच माणसांना तो फ्रेंच वाटू शकेल आणि जर्मन माणसांना तो जर्मन वाटू शकेल एवढे प्रभुत्व त्याने त्या भाषांवर मिळवले. स्पॅनिश भाषा तिच्यातील बारकाव्यांसह त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आत्मसात केली. या भाषाप्रभुत्वाचा उपयोग नंतर त्याला पत्रकारिता आणि हेरगिरी करताना झाला. शालेय शिक्षण घेत असताना फोर्सिथ तसा काही फार बुद्धिवान नव्हता; पण जगप्रवासाची त्याला आवड होती. त्यासाठी प्रशिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तो ‘रॉयल एअरफोर्स’मध्ये वैमानिक म्हणून नोकरीस लागला. दोन वर्षांनी ही नोकरी सोडल्यावर फोर्सिथ ‘रॉयटर्स’ या प्रख्यात वृत्तसंस्थेत पत्रकार म्हणून कामाला लागला आणि १९६५ मध्ये ‘बीबीसी’चा वार्ताहरही झाला.

फोर्सिथची पत्रकारितेची कारकीर्द त्याचे अनुभूतिविश्व समृद्ध करून गेली. त्याने फ्रान्स, चेकोस्लोव्हॉकिया आणि पूर्व जर्मनीत बातमीदारी केली. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील शीतयुद्धाचा तो काळ. आरंभी तीन वर्षे इंग्लंडमध्ये पत्रकारिता केल्यावर ‘रॉयटर्स’चा प्रतिनिधी म्हणून फोर्सिथ पॅरिसला गेला, तेव्हा तेथील परिस्थिती अतिशय स्फोटक होती. पॅरिसच्या रस्त्यांवर डाव्या आणि उजव्या समर्थकांमध्ये हिंसक चकमकी होत होत्या. सोव्हिएत युनियनशी एकनिष्ठ असलेल्या कम्युनिस्ट पार्टीचा तेथे प्रभाव होता. ‘ओएएस’ या उजव्या फुटीर गटाकडून फ्रेंच राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांच्या हत्येचे अनेक अयशस्वी प्रयत्न झाले होते. पण फ्रेंच गुप्त पोलीस एवढे कार्यक्षम होते, की त्यांना ‘ओएएस’च्या कोणत्याही संभाव्य कारस्थानाची आधीच कल्पना येत असे. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्षांच्या हत्येसाठी ज्याला फ्रान्समधील पोलीस ओळखत नाहीत, अशा भाडोत्री मारेकऱ्याला बाहेरून आणण्याखेरीज अन्य पर्याय नाही, असे फोर्सिथचे मत होते. त्याने या विषयावर कादंबरी लिहिण्याचे ठरवले आणि लंडनमधील आपल्या एका मित्राच्या सदनिकेत बसून ती कादंबरी अवघ्या ३५ दिवसांत पूर्ण केली. ‘जॅकल’ ही काल्पनिक व्यक्तिरेखा आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न या वस्तुस्थितीवर आधारित असलेली ती ‘द डे ऑफ जॅकल’ ही कादंबरी होती. आरंभी अनेक प्रकाशकांनी नाकारलेली ही कादंबरी १९७१ मध्ये प्रकाशित झाल्यावर अल्पावधीतच तिच्या १० लाख प्रती खपल्या आणि दोन वर्षांनी तिच्यावर काढलेला चित्रपटही गाजला. या यशामुळे फोर्सिथचे लेखनचक्र गतिमान झाले आणि त्याचा खास वाचकवर्ग तयार झाला.

‘द बायफ्रा स्टोरी’ (१९६९) या फोर्सिथच्या पहिल्या पुस्तकातून त्याची शोधपत्रिका प्रकटली आहे. त्यात १९६० च्या दशकातील नायजेरियामधील यादवी युद्धाचा वृत्तांत आलेला आहे. या पुस्तकात रक्तपाती हिंसाचाराची वास्तव वर्णने तर आहेतच, पण ब्रिटिश सरकारच्या अनैतिक राजकारणावर जळजळीत टीकाही आहे. या युद्धात ब्रिटिश सरकारने बेल्जियममार्फत शस्त्रपुरवठा केला असतानाही अधिकृतरीत्या त्याचा इन्कार केला; तसेच ब्रिटनला नायजेरियन सरकारवरील आपला प्रभाव वापरून तेथे शांतता प्रस्थापित करणे सहज शक्य होते, पण तत्कालीन राज्यकर्त्यांच्या भेकडपणामुळे तसे होऊ शकले नाही. परिणामी तेथे फार मोठी जीवितहानी झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रिटनची प्रतिमा मलिन झाली. त्यासाठी आपण त्यांना कधीच माफ करणार नाही, असे फोर्सिथ सांगतो. याच अनुषंगाने बीबीसीविषयीही आपली नाराजी फोर्सिथने व्यक्त केली आहे. नायजेरियातील युद्धाचे वृत्तांकन करण्यासाठी बीबीसीने फोर्सिथला तेथे पाठवले होते, पण नायजेरियन युद्ध लांबवले आणि अशातच अमेरिका-व्हिएतनाम युद्ध सुरू झाले. इतर प्रसिद्धीमाध्यमांप्रमाणेच बीबीसीनेही या नव्याने सुरू झालेल्या युद्धाच्या बातम्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. त्यामुळे नायजेरियन युद्धाचा विषय मागे पडला आणि फोर्सिथची त्याविषयीची बातमीपत्रे प्रसिद्ध झाली नाहीत. एवढेच नव्हे, तर ‘आपल्या धोरणात बसत नाही’ अशी सबब सांगून बीबीसीने त्याला युद्धपत्रकार म्हणून नायजेरियात वास्तव्य करण्यासाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने बीबीसी सोडली आणि त्यानतंरही मुक्त पत्रकार म्हणून तो दोन वर्षे नायजेरियातच राहिला. या घटनाक्रमामुळे संतप्त झालेल्या फोर्सिथने बीबीसी ही ‘रॉयटर्स’सारखी परखड बातम्या देणारी वृत्तसंस्था नाही, तर नियमांवर बोट ठेवून चालणारी अवाढव्य व सुस्त सरकारी नोकरशाही आहे, अशी टीका केली. अशा ठिकाणी नोकरी स्वीकारण्यात कदाचित आपली चूक झाली असावी, असेही पुढे त्याने आत्मचरित्रात म्हटले आहे.

निवेदनाच्या ओघात आपल्या कादंबऱ्यांची निर्मितीप्रक्रिया सांगणाऱ्या फोर्सिथने ‘द ओडेसा फाईल’विषयी एका स्वतंत्र प्रकरणात विस्ताराने लिहिले आहे. ‘द ओडेसा फाईल’ ही फोर्सिथची कादंबरी १९७२ मध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिच्यावरील चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात पीटर मिलर हा तरुण जर्मन पत्रकार दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील रिगा या ज्यूंच्या छळछावणीच्या प्रमुख अधिकाऱ्याला दोन दशकानंतर कसा शोधून काढतो, याची कथा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ‘एस एस’ या कुप्रसिद्ध नाझी संघटनेचे सदस्य जर्मनी सोडून इतर देशांत पळून गेले आणि आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यातील बहुतेकांनी आपली नावे बदलून नवे आयुष्य सुरू केले. या सदस्यांना मदत करणाऱ्या संघटनेचे ‘ओडेसा’ हे नाव. कादंबरीचे कथानक काल्पनिक असले, तरी तिच्यावरील चित्रपटामुळे ‘बुचर ऑफ रिगा’ म्हणून ओळखला जाणारा एडवर्ड रोशमन हा नाव बदलून दक्षिण अमेरिकेत राहणारा रिगाच्या छळछावणीचा क्रूरकर्मा प्रमुख जर्मन अधिकारी अचानक जगापुढे आला. अर्जेटिनाच्या पोलिसांनी रोशमनला पकडून त्याच्यावर खटला भरला, पण उजव्या विचारसरणीच्या न्यायाधीशाने त्याला तुरुंगात टाकण्याऐवजी जामीन दिला. जामिनावर असलेला रोशमन अर्जेटिनाहून पेराग्वेला पळून जात असताना हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. अशा रीतीने रिगाच्या छळछावणीतील दुर्दैवी ज्यूंना मरणानंतर उशिरा का होईना न्याय मिळाला, अशी लेखनसाफल्याची भावना फोर्सिथने ‘द ओडेसा’ या प्रकरणात व्यक्त केली आहे.

फोर्सिथने आपल्या लेखनकारकीर्दीत मुख्यत्वे गुप्तहेर कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी त्यात एकसुरीपणा वा आशयाची पुनरुक्ती आढळत नाही. विषयांचे वैविध्य हे त्याच्या कादंबऱ्यांचे प्रथमदर्शनीच जाणवणारे वैशिष्टय़. त्याच्या एका कादंबरीत जैविक युद्धाचे तपशील येतात आणि दुसऱ्या कादंबरीत शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व सोव्हिएत रशिया एकमेकांची पिके  कशी संपवतात याची चित्तथरारक कथाही येते. त्याच्या ‘आयकॉन’ला १९९९ मधील भ्रष्टाचार व दहशतवाद यामुळे विघटन होत असलेल्या रशियाची पाश्र्वभूमी आहे, तर ‘द कोब्रा’मध्ये अमली पदार्थाची निर्मिती व व्यापार करणाऱ्यांचे जग साकार होते. तेल कंपन्या व शस्त्रास्त्रांचे व्यापारी यांच्याशी राजकारण्यांचा होणारा संघर्ष हा ‘द निगोशिएटर’चा विषय आहे, तर ‘द किल लिस्ट’मध्ये मुलतत्त्ववादी मुस्लीम दहशतवादाचे भयावह रूप स्पष्ट होते.

आरंभकाळात मुख्यत्वे शीतयुद्ध व युरोप यांवर लेखन करणाऱ्या फोर्सिथने नंतर आपल्या कथानकाचा भौगोलिक परिसर कोलंबियापासून थेट पाकिस्तानपर्यंत विस्तारला आहे. शिवाय शीतयुद्धाच्या काळातील शत्रूची जागा अमली पदार्थाचे धनाढय़ व्यापारी आणि ‘अल् कायदा’सारख्या धर्माधिष्ठित संघटनांनी घेतली. फोर्सिथची ‘द डॉग्ज ऑफ वॉर’ ही एका ब्रिटिश कारखानदाराने भाडोत्री सैनिकांच्या मदतीने आफ्रिकेतील झांगारो या काल्पनिक देशातील सरकार पदच्युत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कहाणी आहे. बायफ्रा आणि नायजेरियाच्या यादवी युद्धाच्या काळात त्याने केलेल्या पत्रकारितेचा अनुभव येथे संक्रमित झाला आहे. पत्रकार असताना फोर्सिथ सभोवतालच्या घडामोडी सजगपणे टिपत गेला आणि त्याच्या कादंबऱ्या त्यातून आकाराला आल्या. आपल्या लेखनातील तपशिलाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी तो संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करतो. शोधपत्रकारितेत ज्या पद्धतीने संशोधन केले जाते, त्याच पद्धतीने कादंबरी लिहिताना अभ्यास करणारा फोर्सिथ कथानकाच्या आवश्यकतेनुसार एखादा माजी नाझी अधिकारी, तुरुंगातून सुटलेला धंदेवाईक मारेकरी, रशियन पॉलिट ब्युरोचा निवृत्त अधिकारी, राष्ट्राध्यक्षांचा अंगरक्षक आणि सीआयए व एसएसआयच्या अनुभवी गुप्तहेरांची भेट घेतो. त्यामुळे साहस, डावपेच, हेरगिरी, प्रतिहेरगिरी, अनिष्ट शस्त्रास्त्र स्पर्धा अशा जीवघेण्या परिस्थितीचे वास्तव वर्णन करणाऱ्या त्याच्या कादंबऱ्या वाचकांना एका वेगळ्याच विश्वात नेतात. त्याच्या कादंबऱ्यांतील हेर हे काहीसे एकलकोंडे, बळकट शरीरयष्टीचे, बुद्धिमान, योग्य प्रशिक्षणाने कोणत्याही संकटावर मात करणारे आणि आपल्या वाटय़ाला आलेली जबाबदारी निष्ठापूर्वक निभावणारे असे असतात. इयान फ्लेमिंगच्या कादंबऱ्यांतील जेम्स बॉण्डप्रमाणे प्रेमप्रकरणे करणे वा इतर अवांतर गोष्टींसाठी त्यांना मुळी वेळच नसतो. फोर्सिथच्या कादंबऱ्यांतील हेरगिरीचे तपशील एवढे वास्तवदर्शी कसे, हा प्रश्न वाचकांना नेहमीच पडतो. पण त्याविषयी याआधी काहीही न बोलणाऱ्या फोर्सिथने आत्मचरित्रात प्रथमच गौप्यस्फोट केला आहे. तो असा : ‘मी ‘एमआय-सिक्स’ या ब्रिटनच्या सरकारी गुप्तहेर संघटनेसाठी वीस वर्षे काम केले, तेही विनामूल्य.’

फोर्सिथच्या आत्मचरित्रातील ‘व्हिस्पर्ड वर्ड्स’, ‘ए लिटल बॉइज ड्रीम’, ‘ए लार्ज जार ऑफ टाल्क’ या आरंभीच्या प्रकरणांतून त्याच्या बालपणाविषयी थोडक्यात माहिती मिळते. नंतर त्याची पत्रकारितेची आणि लेखकीय कारकीर्द सुरू होते, तेव्हा व्यक्तिगत तपशील तसे अभावानेच येतात. आत्मसमर्थनाचा सूर त्याने वरच्या पट्टीत लावला नसला, तरी आत्मगौरवाची भावना काही ठिकाणी जाणवते. फोर्सिथचे व्यक्तिगत रागलोभ आणि राजकीय मतेही येथे प्रकटतात. आपल्या लेखनाविषयी लिहीत असताना, आपल्या कथासंग्रहांचा अपेक्षित खप झाला नाही आणि ‘द फॅण्टम ऑफ मॅनहटन’ ही कादंबरी वाचकांनी नाकारली, असे तो प्रांजळपणे सांगतो. शीतयुद्धाच्या काळात पूर्व जर्मनीत पत्रकार म्हणून काम करीत असताना फोर्सिथवर गुप्त पोलिसांची पाळत असायची. पूर्व जर्मनीतून बाहेर बातम्या पाठवण्यासाठी त्याला बराच खटाटोप करावा लागे. जर्मन पोलिसांच्या चौकशीला त्याला वारंवार सामोरे जावे लागे. आता गमतीदार वाटणारा, पण तेव्हा निर्णायक ठरण्याची शक्यता असलेला पत्रकारितेतील एक प्रसंग त्याने आत्मचरित्रात नोंदविला आहे. शीतयुद्धाच्या काळात पूर्व जर्मनीतील रशियन सैन्याने एका मे दिनाच्या संचलनाचा सराव, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून, मध्यरात्री करण्याचे ठरवले. पण त्याची कल्पना नसल्याने फोर्सिथला ही लष्करी हालचाल म्हणजे संभाव्य युद्धाची तयारी वाटली आणि त्याने तसा संदेश बॉनमार्गे लंडनला पाठवला. त्यामुळे काही तासांसाठी तरी तिसरे महायुद्ध सुरू होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

या व अशाच आणखी काही रंगतदार आणि थरारक प्रसंगांमुळे फ्रेडरिक फोर्सिथचे हे आत्मचरित्र खुद्द त्याच्याच कादंबरीसारखे वाचनीय झाले आहे.

  • ‘द आऊटसायडर : माय लाइफ इन इंट्रिग’
  • लेखक : फ्रेडरिक फोर्सिथ
  • प्रकाशक : पेंग्विन बुक्स
  • पृष्ठे : ३६८, किंमत : ३९९ रुपये

– भालचंद्र गुजर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 2:51 am

Web Title: the outsider my life in intrigue
Next Stories
1 संचिताचा संच
2 शांततेची भीती का वाटते?
3 अष्टदळाचे सावट!
Just Now!
X