‘होय, डोनाल्ड ट्रम्प यांनी मला अगदी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की, युक्रेनसाठी मंजूर झालेले आर्थिक प्रस्ताव आपण तोवर रोखून धरायचे, जोवर तो देश (युक्रेन) जो बायडेन वर आरोप ठेवत नाही’ अशा शब्दांतली कबुली अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे माजी सुरक्षा सल्लागारपद भूषवलेल्या आणि ‘इराणला एकटं पाडा’ वगैरे अनेक निर्णयांचे साक्षीदार असणाऱ्या जॉन बोल्टन यांनी १७ मार्च रोजी प्रकाशित होत असलेल्या ‘द रूम व्हेअर इट हॅपन्ड’ या पुस्तकात दिल्याची बातमी ‘न्यू यॉर्क टाइम्स’नं गुरुवारी फोडली.. आणि मग सुरू झाला हलकल्लोळ! त्याचं काय एवढं? खरं तर, ट्रम्प असलं घाणेरडं पक्षीय  राजकारण करताहेत,  विरोधकांना निष्प्रभ करण्यासाठी कोणत्याही थराला जाताहेत, हे जगजाहीरच नव्हतं का? महाभियोग (इम्पीचमेंट) चं ट्रम्पवरलं संकट केवळ त्यांच्या पक्षाचं बहुमत एका सभागृहात आहे, म्हणूनच टळलं- हेही उघडच नाही का?

पण नाही. तरीही कल्लोळ झालाच, त्याला कारणं होती. याच जॉन बोल्टन यांना ‘साक्ष देण्यासाठी बोलावण्याची गरज नाही’ असं ट्रम्प यांचं बहुमत असलेल्या सिनेटनं परस्पर ठरवून टाकलं होतं आणि त्याच वेळी याच बोल्टन यांच्या या आगामी पुस्तकाची प्रकाशनपूर्व प्रत खुद्द ‘व्हाइट हाउस’च्या एका समितीच्या नजरेखाली होती.. हा फक्त योगायोग मानायचा का? ती प्रत तिथं होती, कारण व्हाइट हाउसच्या कोणत्याही माजी अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आत्मपर काही लिहिल्यास, गोपनीयता भंग तर नाही ना हे तपासणाऱ्या व्हाइट हाउस समितीकडे अशी प्रत द्यावीच लागते. पण या पुस्तकात ही कबुली आहे, याचा ठाव ‘न्यू यॉर्क टाइम्स’ला लागला आणि प्रकरण बिघडलं. आता बोल्टन यांचे वकील असा दावा (तोंडीच दावा, म्हणजे कांगावाच) करताहेत की, म्हणे व्हाइट हाउसमधूनच पुस्तकातला हा भाग वृत्तपत्रापर्यंत पोहोचवण्यात आला. दुसरीकडे, बोल्टन यांचे मदतनीस म्हणून १५ वर्ष काम करणारे मार्क ग्रूमब्रिज यांनी, ‘बोल्टन, तुम्ही देशाचा विश्वासघात केलात’ असा त्रागा ट्विटरवरून करताहेत. तिसरीकडे आणखी एक माजी कर्मचारी फ्रेड फ्रिट्झ हे ‘बोल्टन, पुस्तक मागे घ्या’ असा रिपब्लिकनांना, आणि विशेषत: ट्रम्पना फारच उपयोगी पडणारा हेका ट्रम्पप्रिय ‘फॉक्स न्यूज’ वरून जाहीर करताहेत. या कल्लोळात पुस्तकाची प्रसिद्धी झाली, पण ‘गुपित’सुद्धा फुटलंच!