दक्षिण अमेरिकी लेखक रॉबटरे बोलानोने जादुई वास्तववादाचे ओझे धुडकावून लावले. बोलानोच्या लेखनशैलीने इंग्रजीत येताच जागतिक साहित्य पटलावर मुद्रा उमटवली. त्यानंतर बोलानो हे नाव त्याच्या मृत्युपश्चात मिळालेल्या अनपेक्षित लोकप्रियतेमुळे दंतकथा बनले. त्याच लेखनशैलीच्या पठडीशी साधम्र्य असणाऱ्या व्हलेरिया ल्युसेली या लेखिकेच्या ‘द स्टोरी ऑफ माय टिथ’ या ग्लोकल कादंबरीबद्दल..

रॉबटरे बोलानो या दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील लेखकाची त्याच्या अल्पकालीन लेखकीय आयुष्यात फक्त भवतालच्या समभाषिक देशांपुरतीच त्रोटक ओळख होती. २००३ सालातील त्याच्या मृत्युपश्चात मात्र त्याचे कथन साहित्य इंग्रजीद्वारे प्रथम अमेरिकेत पोहोचले आणि त्यानंतर त्याच्या एकामागोमाग एक पुस्तकांची रांगच लोकप्रियतेसाठी स्पर्धा करू लागली. पारंपरिक नोबेल वगैरे मिळविणाऱ्या दक्षिण अमेरिकी पूर्वसुरींच्या जादुई वास्तववादाचा धिक्कार करणाऱ्या त्याच्या कथा-कादंबऱ्या राजकीय कोलाहलातील लेखकीय जगण्याचे गणित जुळविणाऱ्या होत्या. जागतिकीकरण, इंटरनेट या परवलीच्या घटकांमधून जगाशी एकरूप झालेल्या सर्व संदर्भाना कवेत घेतल्यामुळे त्याच्या गोष्टी एकाच वेळी स्थानिक आणि वैश्विक परिमाणांनी संपृक्त अशा असतात. हजार पृष्ठांच्या कादंबऱ्या असोत की लेखक-कवींवर आणि स्वानुभवावर बेतलेल्या दोन-चार पानांच्या गोष्टी, बोलानोच्या या कहाण्या वाचकांच्या मानगुटीवर पुस्तक संपेस्तोवर बसून राहतात. साहित्यिकांच्या सर्वव्यापी आढळणाऱ्या जमातींच्या भल्या-बुऱ्या-विचित्र जगण्याचे स्तर मांडत या कहाण्या विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, पॉप कल्चर यांच्या ज्ञात संदर्भामुळे चटकन जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्यांना चटकन आवडून जातात. २००४ सालापासून आजतागायत बोलानोची दीड डझनाहून अधिक पुस्तके इंग्रजीत आलीत अन् प्रत्येक पुस्तकानंतर त्यांची जनप्रियता हीच दंतकथा बनली. या दंतकथेमुळे मात्र एक नवी गोष्ट घडली. बोलानोच्या लेखनाची पठडी हस्तगत करणाऱ्या वारसदार दक्षिण अमेरिकेतील लेखकांचा कळप जागतिक साहित्याच्या पटलावर दिमाखात वावरू लागला. त्यांचाही अनुवाद इंग्रजीमध्ये तातडीने होऊ लागला. वास्तववादाचा आणि प्रयोगांचा आविष्कार करणाऱ्या आलेहान्द्रो झाम्ब्रा (बोनसॉय), सिझर अैरा (द लिटररी कॉन्फरन्स), युरी हेरारा (साईन प्रिसेडिंग द एण्ड ऑफ द वर्ल्ड) या कादंबऱ्या निव्वळ दक्षिण अमेरिकी ठरत नाहीत. त्यात साहित्याचे, तत्त्वज्ञानाचे आणि जगण्याचे सारेच संदर्भ हे ‘ग्लोकल’ आहेत. या लेखकांच्या पंगतीत सध्या नव्याने दाखल झालेल्या व्हलेरिया ल्युसेली या मेक्सिकोतील तरुण लेखिकेची ‘स्टोरी ऑफ माय टिथ’ ही खरोखरची ‘दंत’कथा सध्या गाजत आहे.

व्हलेरिया ल्युसेली मेक्सिकोत जन्मली. दक्षिण आफ्रिकेत वाढली. यादरम्यान दक्षिण कोरियापासून भारतापर्यंत अनेक ठिकाणी वास्तव्य केले. जपानी लेखक हारुकी मुराकामी यांनी आपले लेखन सुरुवातीला जसे इंग्रजीत करून मातृभाषेत अनुवादित करून लिहिले, तसा काहीसा प्रकार या लेखिकेने आपल्या लेखनाच्या बाबत केला. म्हणजे मूळ लिखाणाचा पहिला तपशील इंग्रजीतून स्पॅनिश भाषेत उतरवून तिची पुस्तके त्या भाषेत प्रसिद्ध झाली. त्यानंतर पुन्हा इंग्रजी अनुवादकाराने त्याचे भाषांतर करून त्या कादंबरीला आणखी फुलविले. गंमत म्हणजे या लेखन-अनुवादाच्या काहीशा विचित्र प्रक्रियेचीही ‘स्टोरी ऑफ माय टिथ’ कादंबरीच्या कहाणीमध्येही नोंद आहे. त्यामुळे हा कादंबरीचा  अचंबित करणारा प्रकार आहे.

कथेचा निवेदक आहे गुस्तावो सांचेझ सांचेझ ऊर्फ हायवे. या हायवेच्या मते तो जगातला सर्वोत्तम लिलावकर्ता आणि सर्वात मोठा वस्तुसंग्राहक आहे. त्याच्या आणखी दाव्यांपैकी तो रम प्यायल्यानंतर प्रख्यात अमेरिकी गायिका जॅनिस जॉपलिन हिच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करू शकतो. आणि बऱ्याच काही तिकडम गोष्टी करू शकतो, ज्या महामानवांनीच आत्तापर्यंत केलेल्या आहेत. तर या निवेदकाला एका वृत्तपत्रीय पुरवणीत एका लेखकावरचा लेख सापडतो. त्या लेखकाने म्हणे कादंबरी लिहून इतका पैसा कमावला असतो, की त्याच्या सर्व दातांच्या शस्त्रक्रियेसह अनेक भौतिक सुखांचा तो धनी बनतो. आता हा लेख वाचून हायवे त्या आधारावरच एक कादंबरी लिहून आपल्या सर्व दातांवरील शस्त्रक्रिया उरकण्याचा निर्धार करतो. पण या शस्त्रक्रियेची अन् कादंबरी लेखनाची प्रक्रिया निव्वळ पाश्र्वभागी आहे. येथे महत्त्वाचे आहे, ते हायवेचे एका ज्युस फॅक्टरीमधील सुरक्षारक्षकाच्या पदावरून जगातील सर्वोत्तम लिलावकर्ता बनण्याचे त्रांगडे प्रकरण. ज्युस फॅक्टरीतील अपघाताला वाचविल्यामुळे त्याला सुरक्षारक्षकावरून आपत्कालीन व्यवस्थापकपदावर काम दिले जाते. त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी कंपनी त्याला जेथे पाठविते, तेथे तो कला लिलावाच्या प्रशिक्षणातही सहभागी होतो. जपानी शिक्षकाकडून ज्ञान घेऊन यशाच्या पायऱ्या पार करत तो चित्र, वस्तू यांच्या लिलावातील अढळपद पटकावतो. या दरम्यान, अयशस्वी लग्न, दुरावलेला मुलगा आणि वाढत जाणारे लिलावाचे, वस्तुसंग्रहाचे जग यांमध्ये त्याचे अफाट, तिरपागडे आयुष्य निवेदनाचे रंगतदार नमुने सादर करून देते.

येथे बोधकथा येतात, रूपकं आणि दृष्टान्त येतात. तेदेखील कुणी, तर त्याच्या काका-मामांनी सांगितलेली. अन् त्यांची नावे योगायोगाने सांचेझ सांचेझ सार्त् किंवा सांचेझ सांचेझ दस्तोवस्की आहेत. एकूण ही कादंबरी एक सरळ रेषेतल्या कथेत आणायची, तर या निवेदक हायवेला एका विशिष्ट लिलावामध्ये प्रसिद्ध हॉलीवूड सिनेतारका मेरलिन मन्रो हिचे दात सापडतात. आता त्या दातांची तो खरेदी करतो. पण ते दुसऱ्या लिलावासाठी नाही. बहुमूल्य दातांना आणखी मूल्यवान करायचा विचारही त्याला शिवत नाही. तोवर जगातील सर्वोत्तम लिलावकर्ता झाल्यामुळे हाती पैसा आणि बरीच संपत्ती आलेली असते. त्यामुळे आपल्या जुन्या दातांवर शस्त्रक्रिया करून तो ते काढून टाकतो. मग मेरेलिन मन्रोचे दात त्या जागी बसवून घेतो. पण नंतर घटना अशा घडत जातात की एका लिलावामध्ये मेरेलिन मन्रोच्या दातांसकट हायवे आपली बोली लावतो. तेथे त्याचाच सोडून दिलेल्या पत्नीचा मुलगा सिद्धार्थ त्याला खरेदी करतो. मग आपल्या वडिलांचे (मेरेलिन मन्रोचे) दात काढून त्यांना पुरता त्रास देऊन हा सिद्धार्थ त्याच्या सगळ्या हयातीत जमविलेल्या वस्तुसंग्रहावर डल्ला मारतो. आपला संग्रह आणि भूषणावह असलेले मेरेलिन मन्रोचे दात लुबाडल्यामुळे कफल्लक झालेल्या हायवेला आपल्या लुबाडलेल्या दातांसाठी सायकलवरून केलेल्या शोधप्रवासात हॉटेलमध्ये एक लेखक सापडतो. त्याच्या डोक्यात त्यामुळे वेगळीच कल्पना आकाराला येते. आपली आयुष्याची अन् हरविलेल्या दातांची कहाणी त्याने लिहून द्यावी असा आग्रह तो त्या लेखकाला करतो. पुढे मग सुरू होते, पुन्हा एका लेखनाची कहाणी सुरुवातीपासून त्या लेखकाच्या नजरेतून. पण त्या कहाणीमध्ये आणखीच नव्या तपशिलांची नि गमतीची भर होते, जी सांगण्यापेक्षा वाचणे अधिक आनंददायी ठरू शकते.

या निवेदक हायवेच्या मित्राच्या मते कुठलेही साहित्य अथवा कादंबरी ही अतिशयोक्ती, दृष्टांत, परिपत्रक, शाब्दिक व्यंजने, कालक्रम आदी घटकांच्या आधारावर बनत असते. त्यामुळे या कादंबरीचेही असेच भाग पाडण्यात आले आहेत. त्या भागांनुसार हा हायवेच्या आयुष्याचा प्रवास घडतो. शेवटच्या प्रकरणाला आपण कथाघटकातील सर्वात टीपेचा मानत असलो, तर येथे मात्र तसे होत नाही. येथे कादंबरीच्या निर्मितीसाठी प्रभावित करणाऱ्या घटकांचा कालानुक्रम दिला जातो. लेखिकेने अत्यंत सहजपणे तत्त्वज्ञानापासून राजकारणापर्यंत आणि साहित्यातील दिग्गजांपासून कलेच्या सर्व क्षेत्रांतील जागतिक प्रभावळींना एकत्र केले आहे. अन् तेही कथा असून नसल्यासारख्या अवस्थेत. वर यासोबत रूपकं, बोधकथा, दृष्टान्त यांच्या जोडीला तिकडम माणसांचे प्रकार तयार केले आहेत. आपल्या हरवलेल्या भावाला त्याची सायकल परत देण्यासाठी कैक वर्षांपासून सायकल वापरणारे एक पात्र येते, तसे आपल्या डोक्यावर स्टॅम्प चिकटवून आपल्याला दुसऱ्या शहरात धाडण्यासाठी पोस्ट ऑफिस गाठणारे एक पात्र येते.  लेखिकेने इतके सारे कडबोळे एकत्र करून तयार केलेल्या कादंबरीचे मात्र कौतुक वाटायला लागते. या कादंबरीच्या शेवटी लेखिकेने केलेल्या खुलाशातून तिचा उलगडा होतो. मेक्सिकोतील एका प्रसिद्ध ज्युस कंपनीच्या मालकीचे कलादालनही आहे. त्या कलादालनातील परिपत्रकासाठी आणि ज्युस कंपनीतील कामगारांसाठी आठवडय़ाला पत्रकरूपी कहाणी लिहिण्याचा एक प्रस्ताव ज्युस कंपनीने लेखिकेसमोर ठेवला. त्याचे एक प्रकरण लिहून त्यावरील कामगारांच्या प्रतिक्रिया ऐकून पुढले प्रकरण लिहायचे, असा प्रकार करीत या कादंबरीची निर्मिती झाली आहे.

सर्वात गमतीचा भाग म्हणजे एका ज्युस कंपनीने लेखनाला प्रोत्साहन देणे, कामगारांनी या कादंबरीच्या भागाचा कच्चा माल लेखिकेला पुरविणे आणि लेखिकेने या सगळ्या प्रक्रियेलाही कादंबरीचा भाग बनवणे. भरपूर गोष्टींचे एकत्रीकरण असूनही नीट पाहिले तर यात अवघड गोष्टच शून्य आहे. दक्षिण अमेरिकेतील साहित्य व्यवहाराची, साहित्यप्रेमाची अन् साहित्यजाणिवेची कल्पना या कादंबरीच्या निर्मितीवरून लक्षात येऊ शकेल. मुळात काही निवडक स्थानिक घटकांनी लेखनाला उद्युक्त करण्याची प्रक्रियाच वाखाणण्याजोगी आहे. अन् त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य प्रसवणे, हादेखील दुर्मीळच क्षण. व्हलेरिया ल्युसेलीने आपल्या ‘दंत’कथेतून तो साकारला आहे.

  • ‘द स्टोरी ऑफ माय टिथ’ : व्हलेरिया ल्युसेली
  • इंग्रजी अनुवाद : ख्रिस्तिना मॅक् स्विनी
  • प्रकाशक : कॉफीहाऊस
  • पृष्ठे : १९५, किंमत : ७७५ रु.

 

– पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindia.com