पंकज भोसले

कॅनडियन लेखिका मार्गारेट अ‍ॅटवूड यांच्या १९८५ साली प्रकाशित झालेल्या ‘द हॅण्डमेड्स टेल’ या कादंबरीच्या सुन्न करणाऱ्या समकालीनत्वाची जाणीव त्यावरील टीव्ही मालिकेने पुन्हा नव्याने करून दिली. गेल्या महिन्यात ‘द हॅण्डमेड्स टेल’चा उत्तरार्ध- म्हणजे ‘द टेस्टामेण्ट्स’ ही कादंबरी प्रकाशित झाली अन् प्रकाशनापूर्वीच तिला बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले..

यंदाच्या बुकर पारितोषिकाची लघुयादी झळकण्यादरम्यान मार्गारेट अ‍ॅटवूड यांचे बहुप्रतीक्षित ‘द टेस्टामेण्ट्स’ प्रसिद्ध झाले आणि पुस्तक प्रकाशकांच्या प्रमादामुळे पारितोषिक मंडळ प्रचंड मोठय़ा अवघड अवस्थेत गेले. अमेरिका-ब्रिटनमधील कित्येक दुकानांमध्ये ‘यंदाची बुकर पारितोषिक विजेती कादंबरी’ म्हणून उल्लेख असलेली स्टीकर्स ‘द टेस्टामेण्ट्स’च्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रतींवर लागली होती. जाहीररीत्या निकाल लागण्याच्या तब्बल महिनाभर आधीच यंदाचे ‘बुकर’ पारितोषिक ठरले की काय, असा पुस्तक खरेदी करणाऱ्यांचा समज झाला. पण ‘अद्याप कोणत्याही पुस्तकाची निवड झालेली नसून १४ ऑक्टोबरला निवड समितीच यंदाचे बुकर ठरवणार आहे,’ असा बराच मोठा खुलासा पारितोषिक मंडळाला करावा लागला.

साठांहून अधिक कथा-कादंबऱ्यांची पुस्तके नावावर असलेल्या मार्गारेट अ‍ॅटवूड आघाडीच्या आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये वर्षभर सातत्याने आपल्या कथांसह हजर असतात. (गेल्या महिन्याच्या ‘प्लेबॉय’मध्येही त्यांची नवीकोरी कथा आहे.) त्यांची लेखन फॅक्टरी चाहत्या वाचकांच्या बळावर अविश्रांत सुरू आहे. टीव्ही मालिका आणि सिनेमांमुळे लोक पुस्तक वाचायचे बंद झाले, अशी धादांत फसवी आवई अगदी अलीकडच्या काळापर्यंत जगभरच्या वाचन पळपुटय़ा क्षेत्रांमध्ये तयार होत होती. मात्र, सध्या टीव्ही मालिका आणि सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर त्यांचा आधार असलेल्या पुस्तकांवर सजग वाचकांच्या उडय़ा पडत असल्याचे चित्र आहे. ‘सॅक्रेड गेम्स’ या विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीचे भारतीय पुस्तकपेठांमधील नगण्य स्थान ‘नेटफ्लिक्स’च्या टीव्ही मालिकेमुळे एकाएकी ‘बेस्टसेलर’ पदापर्यंत पोहोचले. हे झाले आपल्यासमोरचे अगदी ताजे उदाहरण. ‘थर्टीन रिझन्स व्हाय’ या दशकापूर्वी प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर आलेल्या मालिकेमुळे अमेरिकी कुटुंबांत बालक-पालक संवादाचे पर्व सुरू झाले असून कादंबरीचा जीर्णोद्धार झाला आहे. ‘एण्ड ऑफ द फकिंग वर्ल्ड’ या चित्रकादंबरीवर आधारलेल्या मालिकेनंतर ब्रिटनमध्ये ग्राफिक नॉव्हेल्सला मागणी वाढली आहे.

अ‍ॅटवूड यांची ‘द टेस्टामेण्ट्स’ ही कादंबरी तिच्या प्रकाशनकालाआधी बहुप्रतीक्षित असण्याच्या महत्त्वाच्या कारणांमध्ये या कादंबरीच्या आधीच्या भागावर आधारलेल्या ‘हॅण्डमेड्स टेल’ या टीव्ही मालिकेने केलेली जागतिक घुसळण सर्वात मोठी होती. १९८५ साली प्रकाशित झालेली ‘द हॅण्डमेड्स टेल’ ही नजीकच्या भविष्यकाळातील आतंकित शहराची काल्पनिक गोष्ट सांगत होती. इंटरनेट, समाजमाध्यमे आणि आत्मसुखाचे महाशोध लागण्याच्या काळाआधी आलेल्या या कादंबरीमध्ये स्त्रीशोषण-गुलामगिरीसह सरकारी दमनशाहीचे काल्पनिक प्रारूप तयार झाले होते. त्यातील संकल्पनांपासून भाषिक लकबींपर्यंत साऱ्यांचा गौरव झाला. १९९० साली त्यावर एक चित्रपटही आला. पण पुढे काळाच्या पावलांसोबत जगभरातील समाजांमध्ये इतक्या काही आंतर्बाह्य़ लगबगी होत होत्या, की ‘हॅण्डमेड्स टेल’ उत्तम मुरलेल्या चविष्ट लोणच्यासारखी या दशकालाही पुरून उरली.

भयावह प्रदूषण, कोलमडलेली कुटुंबसंस्था, ढासळत जाणारा जन्मदर, आणि घटती लोकसंख्या या पार्श्वभूमीवर सनातनी ख्रिस्ती धर्माचे पुनरुज्जीवन करू पाहणारा अमेरिकेतला एक बंडखोर पंथ सरकार उलथवून सत्ता ताब्यात घेतो. ‘गिलियड’ हा नवा देश अस्तित्वात येतो. स्त्रियांना ग्रंथ वाचण्याचाही अधिकार शिल्लक ठेवला जात नाही. घटस्फोट बेकायदेशीर ठरतात. वांझोटेपणा हा फक्त स्त्रीचा दोष मानला जाऊ  लागतो. अनेक रानटी शिक्षा पुन्हा प्रस्थापित केल्या जातात. बायबलचा आधार घेऊन अनेक प्रजननक्षम स्त्रियांना सैन्यातल्या आणि यंत्रणेतल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे लैंगिक गुलाम – ‘हॅण्डमेड्स’- केले जाते. हॅण्डमेड्सवर त्यांच्या मालकाकरवी विधिवत बलात्कार करवून त्यातून जन्माला आलेली संतती अधिकारी पुरुषाला आणि त्याच्या पत्नीला दिली जाते. या समाजातल्या एका हॅण्डमेडने नोंदवून ठेवलेला तिचा वृत्तान्त गिलियडच्या पाडावानंतर कधी तरी काही संशोधकांच्या हाती आला असल्याचे कादंबरीच्या अखेरीस सूचित केले आहे. हा वृत्तान्त आणि त्यावर नंतरच्या संशोधकांचे भाष्य म्हणजे ‘द हॅण्डमेड्स टेल’ ही कादंबरी!

२०१७ सालच्या एप्रिलमध्ये या कादंबरीवर आधारित असलेली टीव्ही मालिका प्रदर्शित झाली आणि अल्पावधीतच तिचा प्रचंड बोलबाला झाला. तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन नुकतेच झाले होते. त्यांनी स्त्रियांबद्दल केलेल्या धक्कदायक नि अपमानास्पद विधानांवर माध्यमांचे गुऱ्हाळ जोरात चालले होते. तरीही ट्रम्प यांना मिळालेल्या लोकाश्रयाच्या पार्श्वभूमीवर ‘द हॅण्डमेड्स टेल’ची चर्चा होणे स्वाभाविकच होते. मेक्सिकोतून बेकायदेशीररीत्या अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या मुलांपासून वेगळे करण्याचे ट्रम्प यांचे धोरण, अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये गर्भपातावर आलेली बंदी या सगळ्या घटना आणि ‘द हॅण्डमेड्स टेल’मध्ये घडणाऱ्या घटना यांत चकित करणारे साम्य होते. स्त्रियांच्या अपमानाचा निषेध करणाऱ्या मोर्चामधून मालिकेत हॅण्डमेड्सना दिलेले लाल रंगाचे गणवेश आणि त्यांच्या डोक्यावरची पांढरी झापडवजा टोपी- सतत हे कपडे प्रतीकात्मकरीत्या वापरले गेले. आजवरच्या इतिहासामध्ये जगात कुठे ना कुठे स्त्रीच्या बाबतीत खरोखरच झालेल्या अन्यायापलीकडे कोणताही नवा काल्पनिक अत्याचार कादंबरीत न वापरण्याच्या अ‍ॅटवूडच्या निर्णयामुळे कादंबरीची धार आधीच कमालीची वाढली होती. त्या गोष्टीच्या सुन्न करणाऱ्या समकालीनत्वाची जाणीव टीव्ही मालिकेने पुन्हा नव्याने करून दिली. मग ‘द हॅण्डमेड्स टेल’ ही फक्त कादंबरी उरली नाही. एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, याचे धगधगीत दर्शन घडवणारा तो एक आरसा ठरला.

गेल्या महिन्यात अ‍ॅटवूडने लिहिलेला ‘द हॅण्डमेड्स टेल’चा उत्तरार्ध (सीक्वेल) – म्हणजे ‘द टेस्टामेण्ट्स’ ही कादंबरी प्रकाशित झाली. प्रकाशनापूर्वीच तिला बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या कादंबरीचीही रचना वैशिष्टय़पूर्ण आहे. ‘द हॅण्डमेड्स टेल’ची गोष्ट टीव्ही मालिकेच्या पहिल्या पर्वामध्येच संपते. तिथून पुढे मालिकेने कादंबरीतल्या पात्रांच्या आयुष्यातला कथाभाग विस्तारत नेला. मालिकेचे तिसरे पर्व नुकतेच संपले. त्यानंतर लगेच अवतरलेली ‘द टेस्टामेण्ट्स’ टीव्ही मालिकेतल्या पात्रांची आयुष्ये पुढे नेते. यात आंट लिडिया ही आधीच्या कादंबरीतील महत्त्वाची बुजुर्ग व्यक्तिरेखा, अ‍ॅग्नेस आणि डेझी या अनुक्रमे गिलियड आणि कॅनडात राहणाऱ्या तरुणींची निवेदने येतात.

गिलियड या शोषणाधारित दडपशाही राजवटीची अंतर्गत उतरंड कशी काम करते; तिच्या दडपणासमोर मान तुकवताना, सत्तेसाठी झगडताना, सत्ता मिळवताना, वापरताना, पेलताना माणसांची जडणघडण कशी होत जाते; इतर सामाजिक संस्थांमध्ये विकृती कशा प्रवेश करतात; माणसे स्वत:शी कोणकोणत्या तडजोडी करतात आणि आपल्या सदसद्विवेकबुद्धीला कसकशी सामोरी जातात आणि तरीही माणसे माणसांइतकीच भली नि स्खलनशील कशी उरू शकतात, अशा अनेकानेक प्रश्नांचा थक्क करणारा वेध या कादंबरीत घेतला जातो. कादंबरीच्या शेवटाकडे गिलियडच्या अंताची सुरुवात आहे. शेवटाकडे येताना कादंबरी काहीशी चित्तथरारक, घटनाप्रधान आणि वेगवाग होत गेली आहे. पण कथाभागाला एखाद्या कुमारवयीन साहसकथेचे अविश्वसनीय व सुलभीकृत रंग आहेत. हेच तेवढे ‘द टेस्टामेण्ट्स’ला लागलेले गालबोट. तरीही सध्याच्या समाज-विकृतींच्या विज्ञानाचे अचूक वर्णन या कादंबरीमध्ये आले आहे.

भवतालच्या परिस्थितीत वैश्विक नैराश्यवाद पसरण्याची सारी क्षमता असताना आपणच वर्तवलेल्या भयावह भविष्याचे काळेकुट्ट स्वरूप वास्तवात प्रत्यक्ष साकारताना बघणाऱ्या अ‍ॅटवूड यांना आशेचे रंग लेखणीतून खुणावत असतील, तर ते समजण्याजोगे आहे. त्याला पलायनवाद म्हणायचे की माणसांच्या भल्याबद्दलचा दुर्दम्य, अभंग विश्वास, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी या दोन्ही कादंबऱ्या आणि ‘हॅण्डमेड्स टेल’ या टीव्ही मालिकेचे सूक्ष्म अवलोकन आजघडीला अत्यावश्यक बनले आहे.

बुकरची लांबोडकी यादी जेव्हा प्रसिद्ध झाली, तेव्हा व्हलेरिया ल्युसेली यांच्या ‘लॉस्ट चिल्ड्रन अर्काइव्ह’ आणि ओयींकान ब्रेथवेट यांच्या ‘माय सिस्टर, द सीरियल किलर’ या दोन कादंबऱ्यांची तुफान विक्री सुरू झाली. मात्र या विक्रीचा परिणाम म्हणून की काय, या कादंबऱ्यांना वगळून बुकरची लघुयादी तयार झाली. त्याचप्रमाणे महिन्याआधीच कादंबरी बुकर विजेती असल्याचे स्टीकर लागून काही ठिकाणी विक्रीस गेल्याचा ‘द टेस्टामेण्ट्स’च्या बाबत घडलेला प्रामादिक मुद्दा दुर्लक्षित झाल्यास यंदा या कादंबरीची विजेती म्हणून निवड होऊ शकेल!

(समाप्त)

आठ वाक्यांची कादंबरी!

ल्युसी एलमन यांची ‘डक्स, न्यूबरीपोर्ट’ ही तब्बल हजार पानांची कादंबरी वाचनास तब्बल एक महिन्याचा कालावधी लागू शकेल इतकी आकाराने मोठी आहे. यात एका मध्यमवयीन महिलेकडून आजारपणावर मात करून शरीर पूर्वावस्थेत आणू पाहणाऱ्या निनावी निवेदिकेची आठ वाक्यांत संपणारी गोष्ट आहे. पण यातील एकेक वाक्य साधारण पुस्तकाहून दुपटीने पाने उलटल्यानंतर संपणारे आहे! एका सिंहिणीकडून आपल्या हरवलेल्या बछडय़ांचा शोध कादंबरीच्या उपकथानकात येतो. ही कादंबरी म्हणजे लेखनाचा एक प्रयोग असून पर्यावरणऱ्हासापासून अमेरिकी अध्यक्षांच्या धोरणांपर्यंत आणि कुटुंबातील रोजच्या व्यवहारांपासून ते समाजातील हिंसा आणि अस्थैर्यावरच्या मुद्दय़ांना त्यात गुंफण्यात आले आहे. या कादंबरीला यंदाचा बुकर पुरस्कार मिळण्याची शक्यता कमी असल्याचे मत पट्टीच्या वाचकांकडून मांडले जात असले, तरी धक्कादायक निकालांची परंपरा यंदाही पाळल्यास ही कादंबरी सर्वश्रेष्ठ ठरू शकते!

pankaj.bhosale@expressindia.com