प्रचंड आशेने आणि उत्साहाने ‘द अनसीन इंदिरा गांधी’ हे पुस्तक आपण वाचायला घेतो. पुस्तक वाचायला सुरू केले की, पहिल्या पाच-सात पानांतच एक तीव्र  निराशा आणि अपेक्षाभंग आपल्या सोबतीला येतो आणि तो अगदी शेवटपर्यंत टिकतो..

इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्यावर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीची कायमस्वरूपी काळजी घेण्यासाठी व विविध दौऱ्यांत त्यांना आकस्मिक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी एका डॉक्टराची नेमणूक करण्याचे ठरते. त्यानुसार हे काम सफदरजंग हॉस्पिटलचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. के. पी. माथूर यांना दिले जाते. तेव्हापासून ते थेट इंदिरा गांधी यांची हत्या होण्याच्या दिवसापर्यंत, जवळजवळ २० वर्षे डॉ. माथूर जवळजवळ रोज म्हटले तरी चालेल इंदिराजींना भेटत, तपासत, त्यांच्यावर उपचार करत असत. त्यांच्या सर्व देश-परदेशांतील दौऱ्यात ते नेहमी जात असत. या प्रदीर्घ सहवासाच्या काळातील अनुभवांवर आधारित त्यांनी ‘द अनसीन इंदिरा गांधी’ हे पुस्तक लिहिले आहे.

आपण साहित्य का वाचतो? आपल्या लहानखुऱ्या आयुष्यात जे सुरस आणि चमत्कारिक अनुभव आपल्याला मिळणे शक्य नाही त्याचा थोडा तरी अंदाज आपल्याला मिळावा ही आपली एक सुप्त इच्छा असते. त्यामुळे रोमहर्षक धगधगता कालखंड आणि ती घडवणारी व्यक्तिमत्त्वे यांचे आपल्याला आकर्षण असते. यामध्ये काही अंशी गॉसिपचा भाग असतो हे कबूल केले तरी हिमालयाएवढे निर्णय घेतानाची (जे नेहमीच प्रचंड त्रासदायक, रक्तरंजित अन् पिढय़ान्पिढय़ांचे हिशेब घडवणारे- बिघडवणारे असतात) राजकीय नेत्यांची मन:स्थिती, त्यांवर परिणाम करणारे घटक, त्यांचे पायसुद्धा आपल्यासारखेच मातीचे असतात की  काय याची उत्सुकता अशा अनेक कारणांनी ही पुस्तके आपल्याला फार महत्त्वाची वाटतात. अशात इंदिरा गांधींचे आयुष्य तर मला वाटते जवळजवळ सर्वात जास्त धक्कादायक घडामोडींनी भरलेले. गुंगी गुडिया काय, दुर्गा काय, इंदिरा इज इंडिया काय सगळेच अद्भुत. कॉँग्रेसची फूट, ७१चे युद्ध आणि विजय, सिमला करार, गरिबी हटाओ, आणीबाणी, नंतरचा प्रचंड पराभव, पुन्हा बहुमताने सत्तेत, पंजाबचा प्रश्न, सुवर्ण मंदिर आणि शेवटी धर्मनिरपेक्ष देशात शीख सुरक्षारक्षकांना कामावरून काढण्यास दिलेला नकार आणि जवळजवळ ओढवून घेतलेला मृत्यू.  सगळेच सनसनाटीपूर्ण. आणखी वर फिरोज गांधींपासून ते संजय गांधींपर्यंत, बरखास्त केलेली राज्यांची विधिमंडळे, क्रोनी कॅपिटलिझजम.. आणि अशा किती तरी. त्यामुळे प्रचंड आशेने आणि उत्साहाने ‘द अनसीन इंदिरा गांधी’ हे पुस्तक आपण वाचायला घेतो.

हे पुस्तक वाचायला सुरू केले की, पहिल्या पाच-सात पानांतच एक तीव्र निराशा आणि अपेक्षाभंग आपल्या सोबतीला येतो आणि तो अगदी शेवटपर्यंत टिकतो. सुरुवातीला प्रियांका गांधी-वढेरा यांची छोटी प्रस्तावना आहे. त्यात त्या डॉक्टरांचे इंदिराजींच्या घरातले स्थान आपल्याला समजावून सांगतात व आपली कृतज्ञता व्यक्त करतात. नंतर मग इंदिराजींचे घर, खाण्यापिण्याच्या सवयी (याबद्दल तर खूप म्हणजे खूपच), त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम यांचे वर्णन येते. नंतर मग त्यांच्या जवळच्या व्यक्तींची वरवरची माहिती, त्यांच्या दौऱ्यातले काही वरवर विनोदी वाटणारे प्रसंग, फिरोज गांधींबद्दलची एखादी किरकोळ गॉसिप याची आपल्याला माहिती मिळते. इंदिरा गांधी अगदी साध्या होत्या, त्या खोलीतल्या फर्निचरची जागा स्वत:च बदलत, बेडशीट वगैरे बदलत, ट्रिपमध्ये काही खेळ खेळत वगैरे निरस वर्णने येत राहतात. बांगलादेशचे युद्घ, सिमला करार, अणुस्फोट (उदा. इंदिराजी फार अस्वस्थ होत्या, सारख्या फोन उचलून सुरू आहे का नाही चेक करत होत्या व शेवटी त्यांनी व धर यांनीसुद्धा डॉक्टरांना कटवलेच.).

आणीबाणीबद्दल आपल्याला आधीच माहिती असलेली अगदी पृष्ठभागावरची, कुठलेही खोल विश्लेषण नसलेली वर्णने येत राहतात. निवडणूक हरल्यानंतरचा एकाकीपणा, विनोबा भावे यांच्या आश्रमातील साधी राहणी, मेनका गांधी यांच्याशी संजय गांधी विचार मंचाच्या कामाने आलेला दुरावा, मार्गारेट थॅचर यांच्याबरोबरचे संबंध वगैरे काही तुरळक ठिकाणी ओलावा जाणवतो असे म्हणता येईल फार फार तर.

इंदिरा गांधींच्या हस्ताक्षरातील काही नोट्स, बरेच फोटो या पुस्तकात आहेत. अगदी इंदिरा गांधींच्या भक्तांनासुद्धा या पुस्तकात नवे, मनोज्ञ असे काही मिळेल असे वाटत नाही. या सगळ्या पुस्तकापेक्षा रामचंद्र गुहा यांच्या ‘इंडिया आफ्टर (महात्मा) गांधी’ या पुस्तकाच्या पाचपंचवीस पानांत आपल्याला इंदिरा गांधी खूप जास्त उमजतात. इंदिरा गांधी यांचे खूपच जास्त चांगले, खोल, माहितीपूर्ण चरित्र कथेरिन फ्रँक (मराठी अनुवाद लीना सोहोनी), पुपुल जयकर, इंदर मल्होत्रा यांनी लिहिलेले आहे. नैसर्गिकपणे या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद मिळमिळीत आणि अल्पकालीन असावा असे एकंदरीत इंटरनेटवरून जाणवते. फार काही असोशीने वाचकांना शिफारस करावी असे हे पुस्तक वाटत नाही.

शेवटी सोल्झेनित्झीन यांचे ‘द फर्स्ट सर्कल’ नावाचे एक फार महत्त्वाचे पुस्तक आहे. त्यात ग्लेब नेरझीन नावाच्या एका पात्राच्या संदर्भात एक रशियन म्हण येते- ‘इट इज नॉट द सी दॅट ड्राउन्स यू, इट्स द पडल’, म्हणजे जर तुम्ही समुद्रात उडी न मारता छोटय़ाशा डबक्यातच तिथल्या तिथे पोहण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला (अ लाइफ ऑफ हमड्रम रुटीन)

तर एका अर्थाने तो तुमच्या आयुष्य समजावून घेण्याच्या प्रक्रियेचा, क्रिएटिव्हिटीचा मृत्यू असतो. तद्वतच डॉ. माथूर यांचे हे पुस्तक कंटाळवाणे होऊन वाचवत नाही.

 

  • ‘द अनसीन इंदिरा गांधी- थ्रू हर फिजिशिअन्स आइज्’
  • लेखक : डॉ. के. पी. माथूर
  • प्रकाशक : कोणार्क पब्लिशर्स,
  • पृष्ठे – १६४ , किंमत- ५०६ रुपये

 

– आशुतोष दिवाण