News Flash

प्लास्टिकचा राक्षस संपवायचा कसा?

प्लास्टिकच्या समस्येत एकाच वेळी वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकची समस्या मोठी आहे

राजेन्द्र येवलेकर rajendra.yeolekar@expressindia.com

लेखिकेनं प्लास्टिकच्या महाकाय समस्येचा अभ्यास केवळ पत्रकार म्हणून नव्हे, प्लास्टिकविरोधी कार्यकर्ती म्हणूनही केला. त्यामुळे हे लिखाण समस्या मांडतं आणि उत्तरंदेखील शोधतं.. 

प्लास्टिकचा वापर ही माणसांची एक मानसिक गुलामगिरी झाली आहे, ती तोडणे शक्य आहे. त्यासाठी ठरवून काही प्रयत्न करावे लागतील. प्लास्टिक प्रदूषणाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यां व बीबीसीच्या पत्रकार ल्यूसी सीगल यांचे ‘टर्निग दि टाइड ऑन प्लास्टिक’ पुस्तक बहुरत्ना वसुंधरेबाबत संवेदनशीलता असलेल्या कुणासाठीही डोळे उघडायला लावणारे आहे. ‘सर्फर्स अगेन्स्ट स्यूएज’ या चळवळीद्वारे त्यांनी अनेक सागरी किनाऱ्यांवर प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम केले आहे. प्लास्टिक उद्योगातील बारकावेही त्यांना माहिती आहेत. त्यामुळे हस्तिदंती मनोऱ्यात बसून दुसऱ्याला शिकवणाऱ्या त्या लेखिका नसून प्लास्टिकविरोधी कार्यकर्त्यां आहेत. पुस्तकाच्या पहिल्या पानापासून त्या आपल्याला खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. मात्र पुस्तकात प्लास्टिकवापराचा प्रश्न ब्रिटन व इतर प्रगत देशांच्या दृष्टिकोनातून अधिक प्रमाणात मांडला आहे. त्यावर सवयी बदलण्याच्या माध्यमातून त्यांनी काही उत्तरे सुचवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘सगळेच प्लास्टिक पुन्हा वापरात आणता येते’ हा आपला मोठा गैरसमज लेखिकेने या पुस्तकात दूर केला आहे. फार थोडय़ा प्लास्टिकचा फेरवापर करता येतो, असे लेखिकेचे अनुभवांती म्हणणे आहे. बहुतांश वेळा प्लास्टिक हा कचऱ्याचा भाग ठरतो. हा प्लास्टिक कचरा कधीच नष्ट होत नाही, कारण प्लास्टिकचे विघटन होत नाही. तांत्रिकदृष्टय़ा सगळ्याच वस्तूंचे फेरचक्रीकरण करता येत असले, तरी त्याला मर्यादा आहेत. कारण हे सगळे करण्यासाठी वीज, पैसा, प्रयत्न या सगळ्यांची गरज असते. ‘बराच प्लास्टिक कचरा हा फेरवापरात येत नाही तर तो जाळून टाकला जातो,’ असे त्या म्हणतात.

परिणामी त्यानंतरही उरलेल्या बऱ्याच प्लास्टिकचे अंतिम स्थान हे महासागर हे असते; पण हे प्लास्टिक महासागरात अनेकदा सूक्ष्म तुकडय़ांच्या रूपात जाते. आताच काही उपाययोजना केली नाही, तर सध्याच्या वेगाने २०५० पर्यंत महासागरातील प्लास्टिक तुकडय़ांची संख्या ही माशांच्या संख्येपेक्षा जास्त होईल. हे सूक्ष्म प्लास्टिक थेट अन्नसाखळीतही येते. मासे रंगीत प्लास्टिक अन्न समजून गिळतात असे दिसून आले आहे. प्लास्टिकच्या समस्येवर सरकार, उत्पादन निर्माते आपल्या वतीने लढतील, हा मोठा गैरसमजही त्यांनी दूर केला आहे. जर जनमताचा दबाव राहिला नाही तर यातले कुठलेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी संबंधित कंपन्यांशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांना प्लास्टिक पॅकेजिंग बंद करायला सांगितले पाहिजे, असे मत व्यक्त करून त्यांनी स्वत: असे केल्याची उदाहरणे दिली आहेत.

प्लास्टिकच्या समस्येत एकाच वेळी वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकची समस्या मोठी आहे. आपण सवयीने त्याचे गुलाम बनलो आहोत. प्लास्टिक स्ट्रॉ, प्लास्टिकच्या पातळ पिशव्या, प्लास्टिक कप, पाण्याच्या बाटल्या यांचा समावेश त्यात जास्त आहे. ल्यूसी सीगल यांनी प्लास्टिक कमी वापरा, फेरविचार करा, पुन:पुन्हा वापरा, प्लास्टिक वापराला नकार द्या, अशा काही उपाययोजना सुचवल्या आहेत. अर्थात यात मनाचा निश्चय महत्त्वाचा आहे, कारण प्लास्टिक हे एक व्यसन आहे. सीगल यांनी सांगितलेले उपाय जर किमान बारा व्यक्तींनी वापरले तरी आपण वर्षांला प्लास्टिकच्या ३००० ते १५,००० वस्तू वापरण्याचे टाळू शकतो. त्यासाठी शाळा, दुकाने, बस स्थानके अशा ठिकाणांपासून चळवळ सुरू करावी लागेल. प्लास्टिकविरोधात काम करण्याची हीच योग्य वेळ आहे व आता नाही तर कधीच नाही, अशी परिस्थिती आहे, असा धोक्याचा इशारा त्या देतात.

प्लास्टिक कचऱ्याचा जो काही थोडासा फेरवापर होतो त्यातील नव्वद टक्के पैसा हा करदात्यांच्या खिशातून जात असतो. सुपर मार्केटमधून ज्या वस्तू विकल्या जातात, त्यांच्या पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. उत्पादनकर्त्यां कंपन्यांना त्यांचे अन्नपदार्थ सुरक्षित राहावेत याची काळजी असते; पण नव्वद टक्के वेळा पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकचा अतिरेक झालेला असतो. पाश्चात्त्य देशांत अख्खा नारळही प्लास्टिकमध्ये गुंडाळून देतात हे त्याचे उदाहरण लेखिका देते. लेखिका सीगल यांनी ‘बीबीसी’शिवाय ‘द गार्डियन’मध्ये पर्यावरण पत्रकार म्हणून काम केलेले असल्याने त्यांच्या लिखाणाचा आवाका मोठा आहे. प्लास्टिकचा इतिहास, राजकारण, त्याच्या अतिरेकी वापराचा सामाजिक वेडेपणा अशा अनेक मुद्दय़ांसोबतच, हे पुस्तक प्लास्टिकचा भस्मासुर आटोक्यात आणण्याचे मार्गही शोधते!

सीगल यांनी प्लास्टिक रोखण्यासाठी आठ उपाय (रेकॉर्ड, रिडय़ूस, रिप्लेस, रिफ्यूज, रियूज, रिसायकल, रिफिल, रिथिंक) सुचवले आहेत. एक तर प्लास्टिकच्या वस्तू विकत घेताना दहा वेळा विचार करा. प्लास्टिकचा फेरवापर करा, त्याला दुसरे पर्याय शोधा. प्लास्टिक बाटल्या एक वेळा वापरण्याच्या नसाव्यात. त्या पुन्हा पाणी भरून घेता येईल अशाच स्वरूपाच्या ठेवा. दुधासाठीही काचेच्या बाटल्यांचा वापर करा, असे अनेक मुद्दे यात येतात. लेखिका म्हणते- आता काही जण हे शक्य नाही म्हणतील; पण पूर्वी दुधासाठी काचेच्याच बाटल्या आपण वापरत होतो. किराणा सामान वर्तमानपत्रातच गुंडाळून दिले जात होते. काहींना हे मागे जाण्यासारखे वाटेल; पण ते मागे जाणे हे प्रत्यक्षात आपल्याला पुढे नेणारे आहे. ज्यांना अगदीच प्लास्टिक वापरायचे असेल त्यांनी त्या वस्तूंचा सतत पुन:पुन्हा वापर करीत राहावा. विशेषकरून पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या असतील, तरी त्या पुन:पुन्हा वापराव्यात. त्या एकदा वापरून फेकून देण्याच्या प्रकारातील असतात तेव्हाच प्रश्न निर्माण होतात. एकदाच वापराचे कप कागदी वाटत असले तरी त्याला प्लास्टिकचा मुलामा दिलेला असतो, त्यामुळे ते धोकादायकच असतात.

या पर्यायी वस्तूंबाबत लेखिकेने उदाहरण दिले आहे. ते फेरवापराच्या कॉफी कपचे. त्यांना एका ठिकाणी मिळालेला असा कप बांबूपासून बनवलेला होता व अत्यंत हलका व दणकट होता. त्यामुळे निसर्गाशी मैत्री करणारे पर्याय आपण यात शोधू शकतो.

जगातील पहिले प्लास्टिक १८६६च्या सुमारास पूर्व लंडनमध्ये हँकने येथे अलेक्झांडर पार्क्‍स यांनी तयार केले. तेव्हाचे प्लास्टिक हे पार्केसाइन नावाने ओळखले जात होते. पार्क्‍स यांनी त्यांचे तंत्रज्ञान मॅकिंटोस या रेनकोट कंपनीला विकले होते. त्यात त्यांना बराच पैसाही मिळाला होता. बिलियर्डसच्या चेंडूसाठी पूर्वी महागडे हस्तिदंत वापरले जात; त्याला पर्याय शोधण्यासाठी १० हजार डॉलर्सचे सोने इनाम म्हणून जाहीर करण्यात आले होते. अमेरिकी संशोधक जॉन वेस्ली हयात यांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. त्यांनी आधुनिक प्लास्टिकची निर्मिती त्यासाठी केली. सिंथेटिक सेल्युलॉइडचा तो प्रकार होता. यातूनच पुढे नायट्रोसेल्युलोज म्हणजे गनकॉटनचा जन्म झाला. सेल्युलॉइड, सेल्युलोज, असिटेट, फेनॉलिक, अमायनो प्लास्टिक, नायलॉन असे अनेक प्रकार आले. पॉलिमरायझेशनच्या प्रक्रियेसाठी झिगलर व नाटा यांना १९५०चे नोबेल मिळाले. नंतर प्लास्टिकचे व्यावसायिकीकरण वेगाने झाले. पॉलिथिलीनचा शोध लागल्यानंतर १९६० मध्ये ब्रिटनमध्ये दोन कोटी प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती झाली. नंतर क्लिंग फिल्मचा वापर सुरू झाला. तिथून पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकचा वापर सुरू झाला.

आपण वापरतो त्यापैकी ९० टक्के प्लास्टिक हे खनिज तेलापासून बनते. त्यामुळे प्लास्टिकचा संबंध हा हायड्रोकार्बन अर्थव्यवस्थेशी आहे. त्यात अमेरिकेसह अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. सध्या तेलाच्या एका पिंपामागे आठ टक्के भाग प्लास्टिकसाठी वापरला जातो. त्यातील चार टक्के प्लास्टिकच्या कच्च्या मालासाठी, तर चार टक्के पॉलिमरायझेशन प्रक्रियेसाठी वापरतात. या हायड्रोकार्बन अर्थव्यवस्थेत बडय़ा कंपन्यांचे हितसंबंध असल्यामुळे वापर रोखणे सोपे नाही, पण शक्य आहे.

१९९० मध्ये ‘एकदाच वापराच्या बाटल्यां’चा वापर सुरू झाला. या बाटल्या पॉलिएथिलीन टेरेफथॅलेटच्या (पीईटी) बनलेल्या असतात. या बाटल्यांमुळे भारतात भूजलाचा उपसाही वाढला. एक लिटरची बाटली आपल्यापर्यंत येते, पण त्यासाठी १.६ लिटर पाणी खर्च होते. सर्वात पहिला आघात हा एकदा वापराच्या पाण्याच्या बाटल्या व प्लास्टिकच्या पिशव्या यांच्यावर करावा लागेल, यात शंका नाही. त्यासाठी या बाटल्या व पिशव्या परत दुकानदारांकडे जमा करणाऱ्यांना नाममात्र आर्थिक लाभाचे आमिष दाखवावे लागेल. जर्मनीने अशा अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांचे प्लास्टिकच्या फेरचक्रीकरणाचे प्रमाणही अधिक आहे. शिवाय, पॅकेजिंगमध्ये नव्या गोष्टींचा वापर करावा लागेल आणि मुळात प्लास्टिकच्या वस्तू विकत घेताना गांभीर्याने विचार करावा लागेल. यासाठी काही पारंपरिक साधनांचा वापर प्लास्टिकला पर्याय म्हणून करता येईल का, यावर संशोधनाची गरज आहे. त्यातून लघुउद्योगांना चालना मिळेल. जैवविघटनशील प्लास्टिकचे दावेही केले गेले आहेत; पण त्यात व्यवहार्यता किती हे तपासून पाहावे लागेल. सरकार, समाज व कंपन्या यांच्या पातळीवर प्रयत्न झाले तर हे आव्हान काही प्रमाणात पेलणे शक्य आहे.

जळी, स्थळी प्लास्टिक- संकट

– दरवर्षी ३० कोटी टन प्लास्टिक उत्पादन होते, तर दरवर्षी महासागरांमध्ये ८० लाख टन प्लास्टिक मिसळते. त्यात १५ ते ५१ लाख कोटी प्लास्टिक तुकडे महासागरात मिसळतात.

– जगात दरवर्षी दर मिनिटाला १० लाख प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात.

– जगातील प्लास्टिक कचऱ्यापैकी केवळ पंधरा टक्के कचऱ्याचा फेरवापर करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून पाच टक्के प्लास्टिक हे प्रत्यक्ष पुन्हा वस्तूत रूपांतरित होते.

– आतापर्यंत जेवढी प्लास्टिकनिर्मिती झाली, त्यापैकी ८० टक्के प्लास्टिक अद्याप आपल्याभोवती आहे. पॅसिफिक सागरात तर फ्रान्सच्या तीनपट आकाराचा प्लास्टिक कचऱ्याचा पट्टा असून १.८ लाख टन तुकडे सहा लाख चौरस मैल भागांत पसरले आहेत.

 

‘टर्निग दि टाइड ऑन प्लास्टिक ’

लेखिका : ल्यूसी सीगल

प्रकाशक : ट्रॅपीझ

पृष्ठे : २७२, किंमत : ३४९ रुपये

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 2:26 am

Web Title: turning the tide on plastic book review author lucy siegle zws 70
Next Stories
1 ‘आगामी’ बुकर!
2 संवाद टिकवण्याची धडपड..
3 सांगोपांग स्त्रीवाद!
Just Now!
X