26 September 2020

News Flash

आम्ही हे वाचतो : रुपेरी पडद्यामागचे स्त्री-संघर्ष..

चित्रपट क्षेत्रातील लिंगभेदी वृत्तीचा मागोवा घेणाऱ्या पुस्तकाविषयी..

‘व्हॉइसेस ऑफ द टॉकिंग स्टार्स’

चित्रपट क्षेत्रातील लिंगभेदी वृत्तीचा मागोवा घेणाऱ्या पुस्तकाविषयी..

‘व्हॉइसेस ऑफ द टॉकिंग स्टार्स – वुमेन ऑफ इंडियन सिनेमा अ‍ॅण्ड बियॉण्ड’ हे मधुजा मुखर्जी यांनी संपादित केलेले पुस्तक चित्रपट क्षेत्रातील लिंगभेदाचा माग काढणारे आहे. स्त्री आणि पुरुष हा भेदभाव मुळात सगळ्याच क्षेत्रांना व्यापून उरला आहे, चित्रपटसृष्टीही त्याला अपवाद नाही. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’साठी दीपिका पदुकोणने रणवीर सिंगपेक्षा अधिक मानधन घेतल्याची आश्चर्यमिश्रित चर्चा याचे उदाहरण ठरावी. मात्र हा लिंगभेदाचा दंश या क्षेत्राला आताच झालेला नाही. त्याचे धागे स्टुडिओ युगापर्यंत जातात.

मुखर्जी यांचा या पुस्तकासाठीच्या संशोधनाची सुरुवात झाली ती कोलकात्यातल्या ‘न्यू थिएटर्स लिमिटेड’च्या अभ्यासापासून. या अभ्यासात तत्कालीन कलाकारांच्या मुलाखती, त्यांच्या संबंधीचे लेख, त्यांनी केलेल्या मुद्रित जाहिरातींचे साहित्य, त्यांची आत्मचरित्रे.. अशा विपुल साहित्याचा समावेश होता. या साहित्याच्या अवलोकनातून जे संशोधन उभे राहिले ते या पुस्तकात मांडले गेले आहे.

चित्रपटसृष्टीला हा लिंगभेदाचा विळखा तेव्हा होता की नाही? असलाच तर तो कशा स्वरूपात होता? त्या विरोधात पडसाद उमटले, की एरवी बोलपटांमधून गाजलेल्या ‘स्टार’ अभिनेत्रींचा खरा आवाज त्यांच्या पडद्यावरील लोकप्रियतेच्या कोलाहलात दडपून टाकला गेला? अशा अनेक प्रश्नांची धक्कादायक उत्तरे आपल्याला या पुस्तकात मिळतात. भारतीय चित्रपटांच्या अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा घरंदाज मुलींनी, स्त्रियांनी चित्रपट क्षेत्रात येणेही निषिद्ध मानले जात होते, त्या वेळी रुपेरी पडद्यावर आलेल्या, चमकलेल्या तीन अभिनेत्रींच्या आत्मचरित्रांनी त्या काळातील वास्तवाची माहिती दिली, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे. १९३५ साली चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलेल्या भानुमती रामकृ ष्ण या दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिग्दर्शक, गायिका, संगीतकार, कवयित्री, लेखिका अशा सगळ्याच आघाडय़ांवर लौकिक कमावला होता. केवळ आत्मचरित्रच नव्हे तर त्यांनी लिहिलेल्या साहित्यातून त्या काळाचे वास्तव प्रतिबिंबित झाले आहे. दुसरे नाव या यादीत आहे ते दुर्गाबाई खोटे यांचे. भारतीय चित्रपटसृष्टीत दुर्गाबाई खोटे यांचा दरारा होता. प्रतिष्ठित घरातून चित्रपट क्षेत्रात आलेली ही अभिनेत्री केवळ अभिनयामुळेच नव्हे तर आपल्या रोखठोक स्वभाव-विचारांनीही लोकांच्या मनावर राज्य करीत होती. दुर्गाबाईंच्या आत्मचरित्रातून स्टुडिओचा काळ, तत्कालीन चित्रपटकर्मी, दुसऱ्या महायुद्धाचे सावट असताना चित्रपट व्यवसाय आणि स्टुडिओच्या अर्थकारणावर झालेला परिणाम अशा अनेक गोष्टींचे संदर्भ उलगडले आहेत.

आणखी एका अभिनेत्रीचा या पुस्तकात प्रामुख्याने उल्लेख आहे तो म्हणजे काननबाला यांचा. मधाळ गायकी आणि अभिनयाच्या जोरावर बंगाली, हिंदी चित्रपटांमध्ये लौकिक कमावणाऱ्या काननदेवी यांच्या ‘सबारे आमी नोमी’ या आत्मचरित्राचाही अभ्यास करीत मुखर्जी यांनी तत्कालीन चित्रपट व्यवसायात मूळ धरून असलेल्या लिंगभेदाचा वेध घेतला आहे. त्याच काळात रतनबाई या अभिनेत्रीने ‘न्यू थिएटर’च्या कर्त्यांधर्त्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला मुखर्जी यांनी दिला आहे. त्यात एका चित्रपटात आपली मानहानी झाल्याची लेखी तक्रार रतनबाईंनी केली आहे. रतनबाईंच्या तक्रारीला दिलेल्या उत्तरात- ‘आम्ही तुम्हाला रेड लाइट परिसरातून उचलून आणले आणि कलाकार म्हणून नावलौकिक मिळवून दिला..’ अशा शब्दांत तक्रारीचे धाष्टर्य़ दाखवल्याबद्दल त्यांना जाब विचारला गेला. मात्र त्या काळातील परिस्थिती आणि स्त्री-सक्षमीकरणाचा अभाव असतानाही रतनबाईंसारख्या तुलनेने छोटय़ा अभिनेत्रीनेही न डगमगता ‘तुम्ही मला उचलून आणलेत तर उपकार केले नाहीत,’ असे हिमतीने दटावत सडेतोड उत्तर दिले आहे.

तत्कालीन भारतीय, हॉलीवूड अभिनेत्रींच्या मुलाखती, त्यांचे पत्रव्यवहार, त्यांच्यावर प्रसिद्ध झालेले लेख, त्यांनी लिहिलेली पुस्तकं अशा साधनांच्या साहाय्याने चित्रपट क्षेत्रातील लिंगभेद आणि वर्तमानालाही जखडून असलेले त्याचे ऐतिहासिक संदर्भ यांचे सविस्तर विवेचन पुस्तकात आहे.

‘व्हॉइसेस ऑफ द टॉकिंग स्टार्स’

संपादन : मधुजा मुखर्जी

प्रकाशक : सेज / स्त्री

पृष्ठे : १९४, किंमत : ४५० रुपये

reshma.raikwar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 1:56 am

Web Title: voices of the talking stars book review
Next Stories
1 रशियाच्या जाळ्यात ट्रम्प कसे अडकले?
2 ऑर्वेलची प्रकाशवाणी : शब्दांच्या शोधात..
3 स्त्री-साहित्याची शक्ती!
Just Now!
X