17 December 2017

News Flash

देशाची घसरण, स्त्रियांची फरपट

आधुनिकता आणि परंपरेविषयीची हीच गुंतागुंत बुरख्याच्यासंदर्भातही अनिला यांना आढळली.

डॉ. चत्रा रेडकर | Updated: September 23, 2017 1:53 AM

वाघा-अत्तारी सीमेवरील सोहळा पाहणाऱ्या पाकिस्तानी स्त्रियांचे संग्रहित छायाचित्र

जिहादी/ लष्करी प्रभावाखालचा इस्लामी देश हीच पाकिस्तानची ओळख घट्ट होत जाताना जे काही बदल झाले, ते सावकाशच घडले होते.  पाकिस्तानी समाजात धर्माच्या नावाने होत असलेले एकजिनसीकरणाचे प्रयत्नच तिथे स्थर्य निर्माण करण्यात अडथळा बनत आहेत. ही धर्माधारित घसरण कशी होत गेली आणि त्यामुळे त्या देशातील स्त्रियांची स्थिती काय झाली, याचा लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक..

अनिला झेब बाबर या एक पाकिस्तानी अभ्यासक आहेत. पाकिस्तानातील इस्लाम, लोकसंस्कृती, लिंगभावाचे राजकारण आणि स्थलांतर या विषयांत त्या तज्ज्ञ मानल्या जातात. पाकिस्तानी स्त्री-जीवनाच्या अभ्यासातून पुढे आलेले वास्तव त्यांनी ‘वुइ आर ऑल रिव्होल्यूशनरीज हिअर’ या पुस्तकात मांडले आहे. क्रांती ही संकल्पना किती बुळबुळीत झाली आहे हे पाकिस्तानी स्त्रीच्या जगण्याचे बदललेले संदर्भ उलगडताना लक्षात आले. स्त्री जीवनातील या बदलांचा त्यांनी मांडलेला आलेख पाकिस्तानी समाजजीवनातील ताणेबाणे स्पष्ट करत जातो. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सत्तर वर्षांत भारतात सर्व जाती-धर्म-पंथ-भाषा यांना सामावू पाहणारी स्थिर अशी राज्यसंस्था उभी राहिली; तर पाकिस्तानातील राज्यसंस्था आजही अस्थिर आहे. भारतात लष्कराने सीमांच्या रक्षणात मोलाची कामगिरी बजावली असली तरी देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केली नाही. याउलट पाकिस्तानात स्वातंत्र्यानंतरचा जवळपास निम्मा काळ राज्यकारभार लष्कराच्या हातात राहिला आहे. भारतात तीव्र राजकीय मतभेद असले तरी एका राजकीय पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्तांतर कायमच शांततेने आणि सांविधानिक मार्गाने झाले आहे. पाकिस्तानात मात्र फारच कमी वेळा शांततापूर्ण सत्तांतर झाल्याचे आढळते. भारत आणि पाकिस्तान या एकाच वेळी आधुनिक राष्ट्र म्हणून वाटचाल सुरू झालेल्या दोन जुळ्या राष्ट्रांत एवढा फरक का? या पुस्तकातून उलगडत जाणारा पाकिस्तान या प्रश्नाचा समाजशास्त्रीय वेध घेण्यासाठी काही महत्त्वाचे संदर्भ पुरवते. भारतीय राष्ट्र आणि राज्यसंस्था यांचे स्थर्य आणि सामर्थ्यांचे गमक उमगण्यासाठीही हे पुस्तक उपकारक ठरू शकते.

अखंड भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातून जी मूल्ये पुढे आली त्यावर पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या सुशिक्षित मध्यमवर्गातील अनेकांचा विश्वास होता. भारतात अल्पसंख्याक म्हणून जगण्यापेक्षा पाकिस्तानात बहुसंख्याक म्हणून जगू अशा भाबडय़ा आशेने त्यांनी पाकिस्तानात स्थलांतर केले. ज्या सुशिक्षित मुस्लीम मध्यमवर्गाने पाकिस्तानला पाठिंबा दिला त्या सर्वाचे स्वतंत्र पाकिस्तानविषयीचे स्वप्न हे काही इस्लामी राज्याचे नव्हते. त्यांना मुसलमानांसाठी नेहरूंच्या आधुनिक भारतासारखाच स्वतंत्र आधुनिक पाकिस्तान हवा होता. आधुनिक पाकिस्तानविषयीच्या या स्वप्नापासून या पुस्तकाची सुरुवात होते. धर्माच्या नावे स्त्रीवर घातली जाणारी बंधने झुगारून आधुनिक पाकिस्तानचे स्वप्न पाहणाऱ्या आणि बाल्यावस्थेतील पाकिस्तानचे समर्थन करत उभ्या असलेल्या नॅशनल व्हॉलंटरी गार्डच्या स्वयंसेवक महिला रक्षकांचा फोटो १९४७  मध्ये टाइम नियतकालिकाने छापला होता, त्या प्रतिमेचा उल्लेख अनिला बाबर करतात. १९४७ मधील त्या प्रतिमेत दिसणाऱ्या स्वतंत्र बाण्याच्या स्त्रियांपासून ते २००७ मध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्यासाठी शरियतचे कायदे लागू करा अशी मागणी करत आणि त्यासाठी शहीद झालो तरी बेहत्तर अशी भूमिका घेत रस्त्यावर उतरलेल्या स्त्रियांपर्यंत पाकिस्तान कसा पोहोचला, असा वेदनामय प्रश्न त्यांना पडतो. पाकिस्तानी समाजातील या प्रकारची स्थित्यंतरे समजण्यासाठी अलीकडच्या काळात पाकिस्तानी स्त्रियांच्या ज्या विविध प्रतिमा माध्यमातून पुढे आल्या आहेत त्यांच्या गाभ्याशी घडलेल्या प्रक्रियांचा वेध घेणे अनिला बाबर यांना गरजेचे वाटते. माध्यमातील या प्रतिमांमध्ये इस्लामाबादमधील कुप्रसिद्ध लाल मशीद आणि तिच्याशी संलग्न जामिया ह्फ्स आणि जामिया फरीदिया या दोन मदरशांना ताब्यात घ्यायला आलेल्या पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या स्त्रियांची प्रतिमा आहे. मुस्लीम देशातील पहिली महिला पंतप्रधान बेनजीर भुट्टो व त्यांच्याशी निगडित उच्चभ्रू राहणीमानापासून ते भ्रष्टाचारापर्यंतच्या आणि अतिरेकी हल्ल्यात झालेल्या त्यांच्या मृत्यूविषयी माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत. स्त्री स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या स्त्रियांना धर्मविरोधी ठरवावे असा आग्रह धरत अशा स्त्रियांसाठी देहदंडाच्या शिक्षेची तरतूद असावी अशी मागणी करणारी जनरल झिया यांची बहीण आपा निसार फातिमा त्यात आहे. करबलाच्या दर्शनासाठी सच्च्या मनाने जाणार असाल तर पाण्यावरून तरून जाल असा दैवी चमत्काराचा प्रचार करत ३६ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी तरुणी नसीम फातिमा त्यात आहे आणि जगातील प्रस्थापितांच्या भाषेत उदात्त गोष्टी बोलणारी आणि पाकिस्तानात वादग्रस्त ठरलेली मलाला युसूफजाईही यात आहे. या सर्व प्रतिमा व्यामिश्र-गुंतागुंतीच्या आहेत. प्रतिमांच्या या गलबल्यात सामान्य पाकिस्तानी स्त्री कुठे आहे? तिच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे काय झाले? स्त्रियांच्या या परस्परविरोधी आणि गुंतागुंतीच्या प्रतिमा उदयाला येण्यामागे पाकिस्तानच्या राजकारणातील कोणते घटक कारणीभूत आहेत याचा वेध अनिला बाबर यांनी या पुस्तकात घेतला आहे.

स्थानिक संस्कृतीशी देणेघेणे नाही..

पाकिस्तानी समाजजीवन विस्कळीत करण्यात धर्माच्या आधारे होत असलेले राजकारण सर्वाधिक जबाबदार असल्याचे इतर अनेक अभ्यासकांप्रमाणेच अनिला यांचेही निरीक्षण आहे. भारतासारखी भाषिक, सांस्कृतिक, वांशिक, पांथिक विविधता आणि आर्थिक विषमता पाकिस्तानातही आहे. मात्र पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारे झाली असल्यामुळे पाकिस्तानला एक राष्ट्र म्हणून एकसंध ठेवण्यासाठी पाकिस्तानी राज्यसंस्थेला धर्माची मदत घ्यावी लागते. पाकिस्तानी समाजाला अल्लाहवरील निष्ठा आणि त्याचे सर्वश्रेष्ठत्व याची वारंवार आठवण करून दिली नाही तर पाकिस्तानातील वैविध्य एकत्र कसे बांधायचे हा पेच पाकिस्तानपुढे आहे. भाषिक वेगळेपण जपण्यासाठी पूर्व पाकिस्तान अर्थात आत्ताचा बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाल्यानंतर तर पाकिस्तानला एकसंध ठेवण्याचा सर्व भार धर्मावर येऊन पडला. पाकिस्तानातील इस्लाम हा धर्म म्हणून लोकांच्या श्रद्धेचा विषय न राहता राजकीय स्वरूपात समाजजीवनात वावरत राहतो. राजकीय स्वरूपात अवतरणारा पाकिस्तानातील इस्लाम तिथल्या स्थानिक सांस्कृतिक इस्लामी परंपरांशी फारकत घेतो आणि अरबी चेहरा घेऊन वावरतो ही अनिला यांच्या दृष्टीने मोठी समस्या आहे. पाकिस्तानात आणि एकूणच दक्षिण आशियातील मुसलमानांच्या आयुष्यात मशीद केंद्रस्थानी येण्यामागे वहाबी इस्लामचा वाढता प्रभाव जबाबदार असल्याचे अनिला यांचे मत आहे. त्या लिहितात, ‘आम्ही आमचे दक्षिण आशियाई भौगोलिक वास्तव आणि सांस्कृतिकदृष्टय़ा संमिश्र असलेल्या इस्लामशी असलेली आमची आंतरिक नाळ विसरून पश्चिम आशियाई- अरब चेहरामोहरा आत्मसात करणे म्हणजे पाकिस्तानी होणे हे आमच्यावर वारंवार बिंबवले जाते.. ‘स्थानिक संस्कृतीशी काहीच देणेघेणे नसलेला पाकिस्तान घडविण्याची प्रक्रिया इस्लामाबाद आणि रावळिपडी या दोन्ही शहरांच्या जडणघडणीतूनही दिसतो. इस्लामाबाद आणि रावळिपडी यांना जुळी शहरे म्हटले जाते. एका शहरातून दुसऱ्यात जाण्यासाठी जेमतेम तासाभराचा वेळ लागतो, मात्र त्यांच्या चेहऱ्यामोहऱ्यात जमीन-आसमानाचे अंतर आहे. रावळिपडीमध्ये पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असल्याने सरकारी वावर आहे आणि तरीही त्या शहराचा चेहरामोहरा देशी आणि स्थानिक संस्कृतीशी नाते सांगणारा आहे. या उलट इस्लामाबादला वांशिक देशी चेहरा नाही. खरे तर देशी ओळखीला इस्लामाबादमध्ये काही स्थानच नाही आणि इस्लामाबादेत ते नाही म्हणून पाकिस्तानच्या व्याख्येतही ते नाही’ असे त्या खेदाने नोंदवतात.  दक्षिण-आशियाई वांशिक ओळख नाकारत अरबी इस्लामी ओळख लादण्याचा पाकिस्तानी समाजजीवनावर कोणता परिणाम होतो हे दाखवताना अनिला बाबर यांनी पाकिस्तानातील स्त्रीशिक्षणविषयक धोरण, हिजाब किंवा बुरखा वापरासंबंधीच्या चालीरीती आणि पाकिस्तानी सन्यासंबंधीचे चर्चाविश्व या तीन घटकांचे जे विश्लेषण केले आहे ते आवर्जून वाचावे असे आहे.

राजकीय इस्लामच्या वावराने स्त्री शिक्षणाच्या धोरणावर झालेला परिणाम तपासण्यासाठी अनिला बाबर यांनी वायव्य सरहद्द प्रांत (आत्ताचे खैबर पख्तूनख्वा) आणि पंजाब या दोन प्रांतांच्या सीमेवरील खैराबाद भागातील मदरशांचा अभ्यास केला. नोकरीसाठी मदरशांमधून मिळालेली पदवी ही इहवादी शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांनी दिलेल्या पदवीच्या समकक्ष समजण्यात यावी असा निर्णय जनरल झिया-उल-हकयांच्या काळात घेण्यात आला होता. त्यामुळे मदरशांच्या अभ्यासक्रमाचे प्रमाणीकरण करण्याचे प्रयत्न झाले. मुशर्रफ सरकारनेही मदरशांच्या सुधारणेसाठी अनेक प्रयत्न केले. शासनाकडे नोंदणी करणे मदरशांना बंधनकारक करण्यात आले. पाकिस्तान सरकारने तयार केलेला पाठय़क्रम शिकवणे अनिवार्य झाले. गेल्या काही वर्षांत धार्मिक आणि इहवादी दोन्ही प्रकारच्या शिक्षण पद्धतींचा सुवर्णमध्य गाठल्याचा दावा करणाऱ्या ‘हायब्रीड’ शैक्षणिक संस्थांचेही मोठे पेव फुटले आहे. अशा शाळा, महाविद्यालयात आपल्या मुला-मुलींना पाठवणे पाकिस्तानी मध्यमवर्गाला अधिक हिताचे वाटत आहे. कारण हाफ़िज कुराण (कुराण मुखोद्गत) असणाऱ्यांसाठी मेडिकल व इंजिनीअिरग कॉलेजांत काही जागा राखीव असतात. धार्मिक शिक्षणाचा व्यावहारिक फायदा मिळविण्यासाठी अनेकदा पालक आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये पाठवतात. या शैक्षणिक संस्थांचा पाठय़क्रम, अध्ययन-अध्यापन पद्धती यांचा अभ्यास लेखिकेने केला. अशा संस्थांमधील शैक्षणिक पर्यावरण हे मदरशांसारखे नसते. ते अधिक मोकळे असते. वर्ग शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक बनवलेला असतो. अभ्यासक्रमात मात्र कुराणाच्या अभ्यासावरच अधिक भर असतो. आपल्याकडे ज्या प्रकारे स्त्रियांना पौरोहित्य शिकवण्याची ‘आधुनिकता’ दाखवली जात आहे त्याचप्रकारे या संस्था स्त्रीला धार्मिक शिक्षण देऊन आपण आधुनिक असल्याचा दावा करतात. उर्दूला पाकिस्तानची राजभाषा म्हणून स्वीकारल्याने या शाळांचे व्यवहार उर्दू किंवा इंग्रजीतून चालतात. सिंधी, पंजाबी, पुश्तू या प्रादेशिक भाषांची मात्र या शाळांत उपेक्षा होते. या भाषा शिकवल्या तर भारत आणि अफगाणिस्तान या ‘शत्रू’राष्ट्रांबरोबर असलेले पाकिस्तानचे सांस्कृतिक नाते मुलांना सांगावे लागेल या भीतीपोटी उर्दूखेरीज इतर प्रादेशिक भाषा शिक्षण व्यवहारातून हद्दपार केल्या जातात. अशा प्रक्रियांमधून एका बाजूला पाकिस्तानचे बहुसांस्कृतिक वास्तव नाकारत नागरिकावर एकजिनसी धर्मकेंद्री मुखवटा चढवला जातो तर दुसरीकडे स्त्री-जीवनात आधुनिकतेच्या आवरणाखाली पुरुषसत्ताक मूल्यव्यवस्थेचीच पदास होत राहते.

आधुनिकता आणि परंपरेविषयीची हीच गुंतागुंत बुरख्याच्यासंदर्भातही अनिला यांना आढळली. पाश्चात्त्य माध्यमांनी बुरख्याला मुस्लीम स्त्रीच्या गुलामीचे प्रतीक म्हणून रंगवले. पाकिस्तानी स्त्रिया बुरख्याकडे गुलामगिरीचे प्रतीक म्हणून पाहत नाहीत. अमेरिकेची दादागिरी आणि पाश्चिमात्य समाजाचा सांस्कृतिक वसाहतवाद याच्या विरोधातील प्रतीकात्मक लढाईचे बुरखा हे त्यांच्या दृष्टीने एक हत्यार आहे. ती त्यांची सांस्कृतिक ओळख आहे. सार्वजनिक क्षेत्रात मोकळेपणाने वावरण्याचे आणि आत्मविश्वासाने आपले मत मांडण्याचे बळ त्यांना बुरख्याने मिळते. बुरखा वापरणे हे प्रतिष्ठित स्त्रीत्व प्राप्त करण्यासारखे त्यांना वाटते. असे असूनही हिजाब वापरण्याची सक्ती असू नये असेही त्या मानतात. जनरल झिया-उल-हक यांच्या काळात झालेल्या इस्लामीकरणाच्या प्रक्रियेत बुरखा वापरण्याचे आदेश स्त्रियांना देण्यात आले. मात्र सरसकट सर्वच स्त्रियांनी काही ते आदेश पाळले नाहीत. ज्यांच्या वर्गीय हितसंबंधांना बुरखा वापरण्याने काहीच बाधा येत नव्हती, त्या उच्चभ्रू स्त्रियांनी बुरखा वापरला. मात्र सर्व स्त्रियांनी काही बुरखा स्वीकारला नाही. नवाज शरीफ यांच्या काळात पंजाब प्रांतातील सरकारने हिजाब वापरणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षेत पाच अतिरिक्त गुण देण्याची घोषणा केली, तेव्हा त्याला स्त्रियांनी जोरदार विरोध केला. शैक्षणिक गुणवत्ता केवळ शैक्षणिक कामगिरीच्या आधारेच मोजली जावी त्यात इतर गोष्टींना स्थान नसावे अशी भूमिकाही पाकिस्तानी स्त्रियांनी आग्रहाने मांडली.

ओळख पुसणारा अरबी बुरखा!

बुरख्याच्या वापरावर हल्ली अरेबिक प्रभाव वाढू लागल्याचे अनिला यांना आढळले. बुरखा, स्कार्फ, हिजाब आणि चादर अशा चार प्रकारांचा वापर पाकिस्तानी स्त्रिया करतात. बुरखा आणि चादर अंगभर पायघोळ असतात तर स्कार्फ आणि हिजाब केवळ डोके झाकतात. आपल्या आवडीनुसार फॅशनप्रमाणे हिजाब/ बुरखा वापरावा असा तरुण मुलींचा कल असतो, मात्र आपल्याकडील बाबा-बुवा-मातांसारखे तिकडेही बोकाळलेले हाय-टेक गुरू ‘आपल्या परंपरेचे पालन करा आणि सच्चे मुसलमान बना’ अशी प्रवचने देत अरबी पद्धतीच्या बुरख्याचे समर्थन करतात. पाकिस्तानी स्त्री ही एकाच वेळी मुस्लीम, आशियाई, दक्षिण आशियाई, पाकिस्तानी आणि पाकिस्तानातील विशिष्ट वांशिक/ भाषिक पाश्र्वभूमी अशा अनेक ओळखीची वाहक असते. संदर्भानुसार तिची ओळख बदलते मात्र पाकिस्तानातील नवधर्म संप्रदाय आणि त्यांचे हायटेक गुरू/ माता पाकिस्तानी स्त्रीची बहुआयामी ओळख पुसून टाकू पाहतात.

पाकिस्तानी लष्कराचा नागरी जीवनातील वावरही स्त्रीच्या दुय्यमीकरणाला खतपाणी घालणारा असल्याचे अनिला यांना आढळले. भारतीय लष्करात स्त्रियांचा समावेश झाल्यानंतर पाकिस्तानात स्त्रीला सन्यात भरती करावे की नाही यावर जी चर्चा झाली, त्यात ‘स्त्रीचे पावित्र्य राखण्यासाठी तिच्यावर बंधने ठेवणे आवश्यक’ असल्याचे वारंवार म्हटले गेले. भारताने पोखरणला अणुचाचणी केल्यानंतर तर ज्या प्रकारची विधाने पाकिस्तानी माध्यमांत प्रसिद्ध झाली त्यात राष्ट्रवाद आणि मर्दानगी यांची सांगड घातल्याचे अनिला यांना आढळून आले. ‘भारताला स्वत:च्या मर्दानगीविषयी शंका होती म्हणून अणुचाचणी केली, पाकिस्तानला स्वत:च्या मर्दानगीबद्दल शंका नाही मात्र भारताने आत्मसन्मान डिवचला असल्याने शांतताप्रिय पाकिस्तान अणुचाचणी करत आहे’- अशी, पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि राजकारण्यांची वक्तव्ये होती. त्या वेळी काही भारतीय राजकारणीही मर्दानगीच्याच भाषेत बोलत होते याचीही नोंद अनिला करतात. देश कोणताही असो, युद्धखोरीची भाषा नेहमीच स्त्रियांची शालीनता आणि पुरुषांची मर्दानगी यांची साक्ष काढत आक्रमक राष्ट्रवाद पोसत असते याची आठवण अनिला करून देतात.

धर्माच्या आधारे राष्ट्रबांधणी करण्यातून राष्ट्र बळकट होते असा एक भाबडा समज आपल्या देशातही अनेक जण बाळगून आहेत. त्यांना विविधता राष्ट्रवादासाठी घातक वाटते तर एकजिनसीपणा पोषक वाटतो. अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी उदाहरणे या पुस्तकातून पुढे येतात. पाकिस्तानी समाजात धर्माच्या नावाने होत असलेले एकजिनसीकरणाचे प्रयत्नच तिथे स्थर्य निर्माण करण्यात अडथळा बनत आहेत हे या पुस्तकातून स्पष्ट होते. वैविध्याबद्दल संकोच न बाळगता त्याला खुल्या दिलाने कवेत घेणे हे भारतीय राष्ट्राचे बलस्थान आहे हे विसरून जर भारतालाही एकजिनसी चेहरामोहरा देण्याचा प्रयत्न झाला तर आपलाही पाकिस्तान झाल्यावाचून राहणार नाही याची जाणीव हे पुस्तक करून देते.

‘वी आर ऑल रिव्होल्यूशनरीज हिअर – मिलिटॅरिझम्, पॉलिटिकल इस्लाम अ‍ॅण्ड जेन्डर इन पाकिस्तान’

लेखिका : अनीला झेब बाबर

प्रकाशक : सेज पब्लिकेशन / योदा प्रेस

पृष्ठे : १८०, किंमत : ६९५ रुपये

First Published on September 23, 2017 1:53 am

Web Title: we are all revolutionaries here militarism political islam and gender in pakistan