|| डॉ. मनोज पाथरकर

ब्रिटिश लेखक एच. जी. वेल्सने आधुनिक जगाची कल्पना रंगविणारे विपुल साहित्य लिहिले. मात्र फॅसिझमच्या रूपात इतिहासाने घेतलेल्या प्रतिगामी वळणाचा अर्थ समजून घेण्यात तो कसा कमी पडला, हे जॉर्ज ऑर्वेल १९४१ सालच्या ‘वेल्स, हिटलर अ‍ॅण्ड द वर्ल्ड स्टेट’ या लेखात दाखवून देतो.. त्या लेखाचे हे भाषांतर!

वर्षांनुवर्षे आपण अथकपणे मांडलेली जागतिक राज्यव्यवस्थेची कल्पना कुणाच्याच डोक्यात शिरत नाही याचे एच. जी. वेल्सला आश्चर्य वाटते आणि रागही येतो. परंतु जगातल्या पाच बडय़ा लष्करी सत्तांपैकी कुणीही जर ‘जागतिक सरकार’सारख्या कल्पना मान्य करणार नसेल तर पुन:पुन्हा त्या उगाळण्यात काय अर्थ आहे?

वेल्सची एकूणच मांडणी बहुतांश सुज्ञ जनांना मान्य आहे, याबद्दल वाद नाही. परंतु आज सुज्ञांच्या हातात कोणतीही सत्ता नाही. त्यातच, कसलाही त्याग करण्याची त्यांची तयारी नाही. हिटलर माथेफिरू गुन्हेगार असेलही; पण त्याच्यासाठी लाखोंची फौज, हजारो विमाने आणि रणगाडे सज्ज आहेत. त्याच्या शब्दाखातर एक राष्ट्र आपल्या आवाक्यापल्याडचे प्रयत्न करतेय. याउलट वेल्सचा दृष्टिकोन पटणारा आणि सर्वाच्या सुखाची हमी देणारा असूनही त्यासाठी रक्त सांडायला कुणीही तयार नाही.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन जर्मनीविरुद्ध टिकाव धरून आहे; कारण त्यांना आशा आहे, की युद्धोत्तर जग अधिक चांगले असेल. मात्र, त्यांना खरे बळ मिळतेय ते देशभक्तीच्या आदिम भावनेतून! तिकडे रशियन नागरिक समाजवादी राज्याच्या कल्पनेसाठी आणि पितृभूमीच्या रक्षणासाठी वाघासारखे लढत आहेत. जगाला प्रत्यक्ष आकार देणारी ऊर्जा बऱ्याचदा अभिमान, नेतृत्वपूजा किंवा श्रद्धा यांच्यातून निर्माण होत असते.

या सगळ्या पाश्र्वभूमीवर उदयाला आलेल्या राजकीय साहित्याचे बहुतांश निर्माते ब्रिटनबाहेरील आहेत- ट्रॉट्स्की, रॉश्निंग, रोझेनबर्ग, बोर्केनॉ, कोस्लर. त्यांच्यापैकी बहुतेकांनी जहाल पक्षांचे राजकारण, हुकूमशाही, हद्दपारी आणि छळ यांचा जवळून अनुभव घेतलेला आहे. फक्त इंग्रज भाषक लोकांमध्येच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेपर्यंत हिटलरला ‘क्षुल्लक’ माथेफिरू समजण्याचा प्रघात होता. एच. जी. वेल्सलाही तसेच वाटते.

चार्ल्स डिकन्सप्रमाणे वेल्स लष्करी परंपरा नसलेल्या नागरी मध्यमवर्गाचा सदस्य आहे. लढाई, शिकार आणि एकूणच जीवनाच्या साहसी अंगांचा त्याला तिटकारा आहे. त्याच्या ‘आऊटलाइन ऑफ हिस्ट्री’ या पुस्तकातील मुख्य खलनायक आहे- साहसी योद्धा नेपोलियन! वेल्सने लिहिलेल्या सर्वच साहित्यकृतींमध्ये एकच संघर्ष पुन:पुन्हा अवतरताना दिसतो : सुनियोजित राज्यव्यवस्थेकडे नेणारा ‘प्रागतिक’ विरुद्ध भूतकाळातील अंदाधुंदीकडे नेणारा ‘प्रतिगामी’. एका बाजूला आहेत विज्ञान, सुव्यवस्था, प्रगती, आरोग्य, आंतरराष्ट्रीयता, विमाने आणि पोलाद, तर दुसऱ्या बाजूला आहेत धर्म, राष्ट्रवाद, युद्ध, राजेशाही, घोडे, कवी आणि ग्रीक भाषेचे प्राध्यापक! वेल्सच्या दृष्टीने इतिहास म्हणजे अद्भुतरम्यतेत रमणाऱ्या मानवावर वैज्ञानिक दृष्टीच्या मानवाने उत्तरोत्तर केलेली मात. त्याला विश्वास वाटतो, की भविष्यात कधी तरी संतुलित आणि विवेकी विचार करणाऱ्या मानवाची सुनियोजित समाजव्यवस्था अस्तित्वात येईल.

वेल्सची ही गृहीतके मान्य करायला काहीच हरकत नाही. परंतु अशी व्यवस्था पुढच्या वळणावरच आपल्यासमोर उभी आहे, हे पटण्यासारखे नाही. वेल्सला हिटलर युद्धपिपासू नेता आणि चेटूक करणारा सरदार यांची संमिश्र आवृत्ती वाटतो. म्हणूनच तो हिटलरला तात्पुरता त्रास देणारे निर्थक भूत समजतो.

वेल्सचे आणि आपलेही दुर्दैव असे की, विज्ञान आणि सर्वसामान्य समज (कॉमन सेन्स) हातात हात घालून वावरत नाहीत. नाझी जर्मनी ब्रिटनपेक्षा जास्त ‘शास्त्रीय पद्धती’ वापरतो आहे, पण तो ब्रिटनपेक्षा जास्त रानटीदेखील आहे. वेल्सने कल्पिलेल्या बहुतेक गोष्टी- सुव्यवस्था, नियोजन, विज्ञानाला सरकारी उत्तेजन आदी- जर्मनीत प्रत्यक्षात अवतरलेल्या आहेत. फरक एवढाच की, हे सगळे अश्मयुगात शोभल्या असत्या अशा कल्पनांसाठी राबवले जात आहे. एका अर्थी विज्ञान अंधश्रद्धेच्या बाजूने लढते आहे. हे स्वीकारणे वेल्सला अर्थातच शक्य नाही. त्याच्या पुस्तकांमधील जगात युद्धखोर नेते व मांत्रिक पराभूत होतात आणि विवेकनिष्ठ जागतिक राज्यव्यवस्था विजयी ठरते. या गृहीतकामुळे वेल्सला हिटलर फारसा धोकादायक वाटत नाही.

विसाव्या शतकातील पहिल्या पिढीच्या विचारशक्तीला वेल्सनेच आकार दिला. केवळ एक लेखकमात्र, त्यातही लोकप्रिय लेखक समाजावर किती प्रभाव पाडू शकतो, हे सांगणे तसे कठीणच. मात्र, आमच्या पिढीवर वेल्सचाच प्रभाव सर्वात जास्त होता हे नि:संशय. तो नसता तर आमचे विचार आणि आमची भोवतालच्या जगाची जाणीव कुठल्या तरी वेगळ्याच पातळीवर राहिली असती. विचारांची ठाम दिशा आणि त्या विचारांना अनुकूल कल्पना विकसित करण्याची त्याची प्रतिभा यांनी वेल्सला एडवर्डीयन काळात (गतशतकाचे पहिले दशक) नव्या जगाचा प्रेषित बनवले. परंतु नेमक्या याच गोष्टींमुळे तो आजची परिस्थिती समजण्यास असमर्थ ठरला आहे.

वेल्स विशीत असताना विज्ञान आणि प्रतिगामित्व या परस्परविरोधी गोष्टी आहेत याबद्दल संशय नव्हता. कसलाही विधिनिषेध नसलेले व्यावसायिक, निर्बुद्ध छोटे जमीनदार आणि धर्मसंस्थेतील उच्चपदस्थ यांचा भरणा असलेला सत्ताधारी वर्ग संकुचित वृत्तीचा आणि कुतूहलशून्य होता. रोमन वचने उद्धृत करणाऱ्या या राजकारण्यांनी ‘बीजगणित’ हा शब्दही ऐकलेला नव्हता. त्यांच्या लेखी विज्ञान काहीसे बदनामच होते. परंपरावाद, दांभिकता, स्वदेशपूजन, अंधश्रद्धा आणि युद्धखोरपणा एकाच कंपूत (प्रतिगामी) होते. अशा परिस्थितीत या सगळ्याला विरोध करणाऱ्या संकल्पनांची नितांत आवश्यकता होती.

विसावे शतक सुरू होताना तारुण्यात पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाला वेल्सचा शोध लागणे ही एक पर्वणीच होती. या तरुणांभोवती पुस्तकी पंडित, धर्मगुरू वा गोल्फच्या चाहत्यांचा वेढा होता. शाळामास्तरांचा भर तेव्हा लॅटिन व्याकरणातील बारकावे समजावून सांगण्यावर होता. अशा वेळी वेल्ससारखा लेखक परग्रहांवरील रहिवासी किंवा समुद्राच्या तळाशी असलेल्या जगाबद्दल काही तरी अद्भुत सांगू लागला. त्या काळातील ‘सन्माननीय’ नागरिकांच्या कल्पनेपेक्षा भविष्याचे अगदी वेगळे चित्र तो रंगवू लागला. मानवाचे विमानोड्डाण यशस्वी होण्याच्या दहा-वीस वर्षे आधीच वेल्सला कळले होते की, माणूस लवकरच उडू शकणार आहे. १९१४ पर्यंत वेल्स खरोखरच एक प्रेषित होता. त्याची नव्या जगाची कल्पना आश्चर्यकारकरीत्या प्रत्यक्षात अवतरत होती!

पण शेवटी वेल्स नागरिक होता लष्करी परंपरा नसलेल्या वर्गाचा (आणि राष्ट्राचा). त्यामुळे ‘जुन्या’ जगातील कल्पनांच्या चिवट सामर्थ्यांचा त्याला अंदाजच आला नाही. राष्ट्रवाद, धार्मिक कट्टरता आणि सरंजामी निष्ठा या गोष्टी मानवी सुबुद्धतेपेक्षा किती तरी शक्तिशाली आहेत, हे त्याच्या आकलनापल्याड होते. आज अंधारयुगातील भुते आधुनिक वर्तमानावर चाल करून आलेली आहेत. कोणता तरी जबरदस्त मंत्र वापरल्याशिवाय ती आपला पिच्छा सोडणार नाहीत.

फॅसिझमचे भूत समजून घेणे एक तर त्याचे बळी ठरलेल्यांना अथवा स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात फॅसिस्ट वृत्ती दडलेल्यांनाच जमलेले आहे. जॅक लंडनची  ‘द आयर्न हील’ वेल्सच्या ‘द शेप ऑफ थिंग्ज टू कम’पेक्षा भविष्याचा अचूक वेध घेते. वेल्सच्या आकलनातून निसटलेल्या गोष्टी लक्षात आणून देणारा त्याच्याच पिढीतील ब्रिटिश लेखक म्हणजे रुडयार्ड किपलिंग (१८६५-१९३६). सत्ता आणि लष्करी दिमाख माणसातील दुष्ट प्रवृत्तींना कशी साद घालतात, याची किपलिंगला पूर्ण जाणीव होती. त्याला हिटलर किंवा स्टालिनची जादू नक्कीच कळली असती. आधुनिक जग समजून घेण्यात वेल्स कमी पडतो, कारण तो जरा जास्तच ‘सुज्ञ’ आहे! त्याची सर्वोत्कृष्ट साहित्यिक कामगिरी असलेल्या निम्न मध्यमवर्गीय वातावरणातील कादंबऱ्या पहिल्या महायुद्धापूर्वीच लिहिल्या गेल्या. युद्धोत्तर काळात त्याने आपली प्रतिभा कागदी राक्षसांचा मुकाबला करण्यातच उधळून टाकली.

पण अशी उधळून टाकण्याजोगी प्रतिभा लाभलेली असणे ही काय छोटी गोष्ट झाली?

manojrm074@gmail.com