डॅन ब्राऊन यांची ओळख आहे ती थरारकादंबऱ्यांचे लेखक अशी. २००० साली ‘अँजल्स अ‍ॅण्ड डेमॉन्स’ ही त्यांची ‘रॉबर्ट लँगडन’ मालिकेतील पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि पुढे ‘द दा विन्सी कोड’, ‘द लॉस्ट सिम्बॉल’ ते ‘इन्फर्नो’ आणि अलीकडची ‘ओरिजिन’ या कादंबऱ्यांनी त्यांची वाचकप्रियता क्रमाने वाढतच गेली. आता या मालिकेतील पुढची कादंबरी ते लिहिताहेत, अशी चर्चा होतीच. मात्र, नुकतीच आलेली त्यांच्या नव्या पुस्तकाबद्दलची बातमी ब्राऊन यांच्या भलत्याच पुस्तकाची निघाली. ते पुस्तक कादंबरी नाही; त्यात गोष्टच सांगितली आहे, पण तो कथासंग्रहही नाही. मग ते पुस्तक आहे तरी काय? ब्राऊन यांच्या नव्या पुस्तकाबद्दलच्या बातम्यांत वर्णन केल्याप्रमाणे ते आहे ‘पिक्चर बुक’! पण नुसते चित्रांचे पुस्तक नव्हे, तर ब्राऊनीयन शैलीतली गोष्टही त्यात आहे. एक उंदीर आणि त्याचे जंगलातील सवंगडी यांची ही गोष्ट ‘वाइल्ड सिंफनी’ या शीर्षकाच्या या पुस्तकात वाचायला, पाहायला मिळणार आहेच, पण ती ऐकताही येणार आहे. होय, यातल्या पात्रांभोवती गुंफलेल्या गाण्यांचा अल्बमही या पुस्तकाबरोबर प्रसिद्ध होणार आहे. पण या ब्राऊनीयन बालचित्रवाणीचा अनुभव घेण्यासाठी १ सप्टेंबपर्यंत वाट पाहावी लागणार!