भारतात नेमके कोणते साहित्य वाचले जाते याचा जर कुणाला अंदाज घ्यायचा असेल तर त्यासाठी दिल्लीचा ‘विश्व पुस्तक मेळा’ (वर्ल्ड बुक फेअर) व  जयपूरचा साहित्य उत्सव (लिटफेस्ट) महत्त्वाचे ठरतात. यापैकी पुस्तक मेळा आजपासून १७ जानेवारीपर्यंत प्रगती मैदानाच्या आठ मोठय़ा दालनांत भरत आहे. देश-विदेशांतील प्रकाशक, प्रकाशन व्यवसायातील सामाजिक संस्था आणि विक्रेते अशांचे तब्बल दोन हजारांहून अधिक छोटेमोठे स्टॉल इथे असतात. या मेळ्यात अ‍ॅमॅझॉनसारख्या कंपन्याही मोठमोठे स्टॉल लावतात. ई-बुक्समुळे प्रकाशन व्यवसायातील स्पर्धा कमालीची वाढली आहे. प्रख्यात लेखिका झुंपा लाहिरी यांनी एका मुलाखतीत असे सांगितले होते की, साहित्य व लोकप्रिय साहित्य असा फरक आता वाचक करीत नाहीत. इंग्रजी पुस्तक व त्याचे भाषांतर यातला फरकही त्यांना महत्त्वाचा वाटत नाही, त्यांना जी गोष्ट वाचावीशी वाटेल ते पुस्तक ते खरेदी करतात इतका साधा निकष सध्या दिसतो आहे. तरुण वाचकांनी अभिरुचीचे मार्ग बदलले आहेत. भारतीय मुले वाचत नाहीत हे खरे नाही १८-३० वयोगटातील २५ टक्केमुले आनंद व मनावरचा ताण हलका करण्यासाठी वाचतात. फार तर गंभीर स्वरूपाचे वाचन कमी आहे, एवढे म्हणता येईल. या मेळय़ात तरी हिंदूी, इंग्रजी पुस्तकांना त्यांची पसंती असते, असे मेळय़ाचे आयोजक असलेल्या नॅशनल बुक ट्रस्टच्या पाहणीतून दिसून आले आहे. मराठी प्रकाशक एक स्टॉल एकत्रितपणे उभारतात, तर एकेकटय़ा प्रकाशकांचे फार तर चार-पाच स्टॉल असतात. साधारण १० लाख लोक या मेळ्याला भेट देतात, या वर्षीही तसाच प्रतिसाद असणार आहे. यंदा तर, मेळ्याची तिकिटे दिल्ली मेट्रोच्या ४७ स्थानकांवरही विक्रीस आहेत.

पुस्तकांच्या माध्यमातूनही दोन देशांत संबंधांना उजाळा मिळतो. इजिप्त, जर्मनी, पाकिस्तान, मलेशिया, पोलंड, सर्बिया, नेपाळ, स्पेन आदी ३०देशांतून किमान एक तरी स्टॉलमेळय़ात असणार आहेत. चीन हा यंदा या मेळय़ाचा ‘पाहुणा देश’ असल्याने चीनची ८१ प्रकाशने येत असून ९ लेखक व २५५ प्रतिनिधी आणि एकंदर पाच हजार चिनी (चीनमध्ये प्रकाशित झालेली, इंग्रजीसुद्धा) पुस्तके, असा पसारा चीनचा असेल. रवींद्रनाथ टागोर यांच्या स्ट्रे बर्ड्स या पुस्तकाचे काहीसे अश्लीलतेकडे झुकणारे भाषांतर करणारे चिनी कादंबरीकार फेंग टँग यांची पुस्तके  मात्र भारतातठेवलेली नाहीत. चिनी लेखक माइ जिया यांचे डीकोडेड हे पुस्तक पेंग्विन प्रकाशनाने सादर केले आहे, ते या वेळी भाषांतरित रूपात लिउ झेनयून यांनी सादर केले आहे. चिनी चहावरचे अधिकारी लेखक वँग झूफेंग, कवी झी शुआन हे या मेळय़ास उपस्थित राहतील.

याखेरीज मेळय़ाच्या मुख्य ‘प्रदर्शन दालना’त  चिनी कलाकारांच्या २४ पारितोषिक विजेत्या कलाकृती असतील, चीन-भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंधांना दीडशे छायाचित्रातून उजाळा मिळणार आहे. सध्याचा चीन जाणून घेण्यासाठी तेथील आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे दर्शन घडवणारी १५० विशेष पुस्तके अभ्यासकांसाठी संग्राह्य़ ठरणार आहेत. चीननेही भारताला बीजिंग पुस्तक मेळ्यात २०१० मध्ये ‘पाहुण्या देशा’चे मानाचे स्थान दिले होते.

loksatta@expressindia.com