निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडय़ाला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना जिल्हाभरात गुरुवारी मानवंदना देण्यात आली. मात्र, मुक्तिसंग्रामदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दांडी मारली. आमदार राणाजगजितसिंह वगळता अन्य एकही लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नव्हता. याबाबत स्वातंत्र्यसनिकांसह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. ध्वजवंदनाचा मान पालकमंत्री डॉ. सावंत यांना होता. जिल्हा प्रशासनाच्या निमंत्रणपत्रिकेत पालकमंत्र्यांचे नाव नेहमीप्रमाणे ठळक अक्षरात छापण्यात आले. मात्र, त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली. शिवसेना, भाजप तसेच अन्य पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील मात्र उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्याच उपस्थितीत सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आदींनी हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाने तीन फैरी झाडून मानवंदना दिली. ध्वजवंदन होताच पोलीस दलाने राष्ट्रध्वजास सलामी दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसनिक, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, पत्रकारांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.