औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार. प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट हे शहरातून निवडून आले, तर प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत यांनी ग्रामीण भागातून यश मिळविले. पण शहरातील नियोजनाचे वाट्टोळे झाल्यानंतर त्याला न सावरता किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करणे शहरातील आमदारांना भोवले. परिणामी एक निष्ठावान शिवसैनिक अशी ओळख बनवत पाच वेळा निवडून आलेल्या संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असणारे अब्दुल सत्तार शेवटी शिवसेनेत स्थिरावले. निवडून आल्यावर भगवा गमछा वर्षांनुवर्षे गळ्यात असल्यागत त्यांनी शिवसेनेची बाजू दूरचित्रवाहिन्यांवर मांडली आणि अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. पैठण आणि सिल्लोड मतदारसंघात त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र, पाच वेळा आमदार म्हणून निवडून आल्याने संदीपान भुमरे यांची या पदासाठी वर्णी लागली. आमदार म्हणून संदीपान भुमरे यांनी केलेले काम यावर फारशी चर्चा कधी झाली नाही. पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्यावर प्रश्नचिन्ह लावले जाते. निष्ठावान म्हणून संदीपान भुमरे यांची वर्णी लागल्याचा दावा शिवसेनेतील नेतेमंडळी आता करू लागली आहेत, पण त्यांच्या कार्यकाळात पैठण मतदारसंघाचा फारसा विकास यावर सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकच चर्चा अधिक होते. त्यामुळे त्यांना कोणते खाते मिळते आणि ते कशाप्रकारे काम करतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे दत्ता गोर्डे म्हणाले, ‘त्यांना संधी मिळाली असल्याने अपेक्षा आहेत. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम आता पूर्ण करतील, असे गृहीत धरायला काय हरकत आहे. पण त्यांचे प्रशासकीय कौशल्य आता वाढेल.’

काँग्रेसवर नाराज असणारे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपमार्गे शिवसेनेत  प्रवेश मिळविला. युतीमध्ये असताना भाजपची जागा शिवसेनेला सोडवून घेतली. ते शिवसैनिक झाले. शिवबंधन बांधल्यानंतर सेनेची बाजू ते दूरचित्रवाहिन्यांवर हिरीरिने मांडू लागले. त्यामुळे शिवसेनेतील एक गट कमालीचा नाराज होता. मात्र, पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपद मिळविले. एकेकाळी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले अब्दुल सत्तार यांची निवड शिवसेनेमध्ये नव्या घडामोडीला कारणीभूत ठरू शकते, असे सांगण्यात येत आहे.

आज पहाटे संदीपान भुमरे यांना मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, असा दूरध्वनी आल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. रविवारी रात्रीपर्यंत संजय शिरसाट यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होते. मात्र, सकाळी आलेला दूरध्वनी आणि थेट कॅबिनेटपद मिळाल्यामुळे भुमरे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

परिचय

या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा १४ हजार १३९ मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय वाघचौरे यांचा पराभव केला. २००९ मध्ये ते पराभूत झाले होते. २००४ मध्ये त्यांनी अपक्ष सुनील शिंदे यांचा पराभव केला होता. १९९९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुल्यबळ उमेदवारांमध्ये भुमरे यांनी ४८ हजार २६६ मते मिळविली होती. पाच वेळा निवडून आलेल्या भुमरे यांच्या नावावर शिवसेनेकडून सोमवारी शिक्कमोर्तब करण्यात आले.

परिचय

सिल्लोड मतदारसंघातून प्रभाकर पालोदकर यांचा २४ हजार ४६५ मतांनी पराभव केला. काँग्रेस पक्षावर नाराज असणारे सत्तार यांचे भाजपबरोबर घनिष्ठ संबंध होते. या पक्षात घ्यावे यावे यासाठी त्यांनी खासे प्रयत्न केले. मात्र, त्यांना विरोध करण्यात आल्याने शिवसेनेमध्ये गेलेल्या  सत्तार यांची पुन्हा एकदा लॉटरी लागल्याची चर्चा आहे. २०१९, २०१४, २००४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तार विजयी झाले होते.