सर्वसामान्य माणसे हतबल असतात. जो चांगले काम करतो आहे, त्याला सगळे काही सांगतात. तो प्रत्येक समस्या सोडवेल असेच त्यांना वाटत असते. असेच काहीसे औरंगाबादमधील एका युथ फाऊंडेशनच्या तरुणांना वाटले आणि त्यांनी एका रेडय़ाची तक्रार थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली.
शहरातील गोगाबाबा टेकडीवर वर्षभरापासून २ हजार झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रयास युथ फाऊंडेशनची ही तक्रार पोलीस सोडवतील की नाही, हे माहीत नाही, पण रेडय़ाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला तरी सांगू शकतील, या शक्यतेतून या फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी चौधरी यांनी रेडय़ाची तक्रार पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली आहे.
गोगाबाबा टेकडीवर कोणाच्या वाढदिवसाला किंवा जवळच्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ एक झाड लावण्याचा उपक्रम तरुणांनी सुरू केला. दोन वर्षांपासून सुरू असणाऱ्या या उपक्रमात वड, िपपळ, उंबर अशी अनेक सावली देणारी झाडे त्यांनी लावली. त्यासाठी आंध्रप्रदेशातून जराशी मोठे रोपे आणली. पहिल्या वर्षांत झाडे जगत नसल्याचे दिसून आल्यावर मातीचा पोत आणि कोणते झाड जगू शकेल याचे नियोजन केले. या वर्षांत २ हजार झाडांपकी १९०० झाडे त्यांनी जगवली. या गोगाबाबा टेकडीवरील मंदिराला कोणीतरी एक रेडा दान केलेला. हा देवाचा रेडा आता ही झाडे खराब करतो आहे. त्याची तक्रार तरुणांनी महंताकडे केली. हा महंत वामाचारी पंथाचा असल्याने त्याने काही लक्ष दिले नाही. रेडय़ाला मारले तर महंताचा राग सहन करावा लागेल. तो पुन्हा झाडे लावू देणार नाही, या भीतीपोटी युथ फाऊंडेशनच्या तरुणांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना गाठले. त्यांच्याकडे रेडय़ाच्या बंदोबस्ताची लेखी तक्रार दिली. त्यांनीही हे काम वनविभागाचे आहे, त्यांना आपण सांगू, असे सांगत तरुणांची समजूत घातली.
या घटनाक्रमात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रतिमेचा मोठा वाटा आहे. गावातील सर्वसामान्यांच्या समस्यांवर उपाय काढण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात, अशी त्यांची प्रतिमा आहे. सरकारी रुग्णालयापासून ते महापालिकेतील करारापर्यंतच्या सर्व तक्रारी त्यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. त्यावर त्यांनी तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला. आता मात्र थेट रेडय़ाला पोलिसी खाक्या दाखवा, अशी मागणी झाली आहे. या अनुषंगाने बोलताना प्रयास युथ फाऊंडेशनचे रवी चौधरी म्हणाले, पोलीस आयुक्तांकडे इतर विभागाची तक्रार केल्यास ती सोडवू शकतात किंवा ती सोडविण्यासाठी मदत होते, असा अनुभव असल्याने ही तक्रार केली.