अल्पसंख्याक समाजासाठी इस्लामिक केंद्र, उर्दू घर, अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृहे, कौशल्य विकासासाठी विशेष योजना यासह विविध घोषणांची जंत्री महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे जाहीर केली. मात्र, अल्पसंख्याक विभागाच्या या कार्यक्रमास राज्यपालांची विशेष उपस्थिती असतानाही राजशिष्टाचारास फाटा देऊन शिवसेनेचे नेते-पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास दांडी मारली!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य अल्पसंख्याक विभागाच्या वतीने औरंगाबाद शहरात मुलींसाठी दोन वसतिगृहे मंजूर करण्यात आली. यातील १७५ क्षमतेच्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सेनेचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे यांनी दांडी मारली. खासदार खैरे दिल्लीत बैठकीस गेले होते, तर पालकमंत्री कदम यांनी गणपतीमुळे येणे शक्य नसल्याचे कळविले होते, असे खडसे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
अल्पसंख्याक समाजासाठीच्या विविध योजनांचा खडसे यांनी कार्यक्रमात आवर्जून उल्लेख केला. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व काही केले जाईल, असे सांगत त्यांनी इस्लामिक रीसर्च सेंटरसाठी ५ एकर जागा आवश्यक आहे. जागा मिळाल्यास केंद्र लवकरच सुरू केले जाईल, असे सांगितले. उर्दू साहित्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमास ४ कोटी रुपयांचे केंद्र मराठवाडय़ात उघडले जाईल. मात्र, त्याची जागा अजून निश्चित झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी जाहिर केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमात अल्पसंख्याकांसाठी कशाप्रकारे उपाययोजना आहेत, याची माहिती त्यांनी या वेळी दिली. अल्पसंख्याक मुलींसाठी वार्षिक १५ हजार रुपये शिष्यवृत्ती, ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज आदी योजनाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लीम समुदायात आयएएस आणि आयपीएस झालेल्यांची संख्या कमी आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून विशेष योजनाही असल्याचे त्यांनी सांगितले.
शोएबुल्ला खान यांची आठवण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी १९४८ पूर्वी निजामाविरुद्ध वर्तमानपत्रातून आवाज उठविणाऱ्या शोएबुल्ला खान या पत्रकाराची आठवण सांगितली. मराठवाडय़ाच्या ८ जिल्ह्य़ांसह तेलंगणा, कर्नाटकातील जिल्हे स्वतंत्र झाले. तत्पूर्वी निजामाच्या विरोधात लिहिणाऱ्या पत्रकाराचे हात कापले गेले होते. देशप्रेम वाढविणाऱ्या या पत्रकाराविषयी नंतरही फारसे कोणी लिहिले नाही, त्यांची आठवण ठेवायला हवी. नव्याने हज हाऊस, उर्दू सेंटर किंवा इस्लामिक रीसर्च सेंटर सुरू करू, तेव्हा शोएबुल्ला खान यांचे नाव त्या इमारतीस दिले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याक समाजातील तरुणांनी आता उद्योजक व्हावे, अशी स्थिती निर्माण करण्याची गरज आहे. केंद्राच्या मौलाना आझाद कौशल्य विकास कार्यक्रमातून ती होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.