शिवसेनेला सत्तेतही सहभाग हवा आहे आणि विरोधकांमधील जागाही हवी आहे. सत्तेत सहभागी असताना दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कशाला, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आता पंतप्रधानांनी आमचे नाही तरी त्यांचे तरी ऐकावे, असे म्हणत कर्जमाफी ही गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. इंटक राज्यस्तरीय अधिवेशनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दुष्काळप्रश्नी राज्यपालांची भेट घेऊन विशेष अधिवेशनाची मागणी केली आहेच. त्याचबरोबर या भागाचा पंतप्रधानांनी दौरा करावा, असेही ते म्हणाले. अशोकराव म्हणाले की, सत्तेत राहून मागण्या करायच्या नसतात. त्यांना सरकारचे लाभही हवे आहेत आणि विरोधकांची स्पेसही पाहिजे, असे कसे चालेल? सध्या ज्या पद्धतीने भाजप-सेनेतील मंडळी वागत आहे, त्यावरून त्यांचा संसार चालणार कसा, असा प्रश्न पडतो आहे, असे म्हणत त्यांनी सरकार अंमलबजावणीत कमी पडत असल्याचे सांगितले. निर्णय वेळेवर होत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. बाळासाहेब विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेच्या अनुषंगाने बोलणे टाळले. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मतांविषयी त्यांनाच बोलणे चांगले असे म्हणत त्यांनी या प्रश्नी बोलणे टाळले.
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाचे संकेत
येत्या काही दिवसात काँग्रेसच्या कार्यकारिणीत बदल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. काही जणांना वेळ मिळत नाही. त्यांना थांबवून काही नवे चेहरे काही जिल्ह्य़ात घ्यावे लागतील. तसे बदल लवकरच हाती घेऊ, असेही ते म्हणाले.