उजनी धरणातून उस्मानाबादपर्यंत आलेल्या जलवाहिनीतून लातूरला पाणी देण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी शिफारस विभागीय आयुक्तांनी मंगळवारी शासनाकडे केली आहे. ४० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव मंजूर करावा व जलवाहिनीतून टँकरसाठीही पाणी देण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.
लातूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई येत्या काही महिन्यात जाणवू लागेल. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तीन महिन्याचा प्रश्न मिटला होता. मात्र, उन्हाची तीव्रता वाढली, की पाणी संपेल, अशी शक्यता असल्याने उस्मानाबादहून लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पूर्वी या प्रस्तावाला उस्मानाबादकर सकारात्मक होते. मात्र, आजच्या बैठकीत उस्मानाबाद नगरपालिकेने पाणी देण्यास विरोध असल्याचे विभागीय आयुक्तांना सांगितले. मात्र, पिण्यासाठी पाण्याचा प्रस्ताव असल्याने उस्मानाबाद नगरपालिकेचे आक्षेप फेटाळून लावण्यात आले. सुमारे ४२ किलोमीटरची जलवाहिनी नव्याने टाकावी लागणार आहे. उस्मानाबादजवळील वेगवेगळी गावे तहानलेली आहेत. तुळजापूर शहरालाही पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला विरोध केल्याचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले.