२१० फूट झेंडय़ासाठी तुमचाही सहभाग हवा

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकाजवळ उभारलेला काळा चबुतरा १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक. अलीकडे दुर्लक्षित आणि अवतीभोवती घाण असणारा हा परिसर आता नव्याने विकसित होणार आहे. २१० फूट उंचीचा तिरंगा येथे उभारला जाणार आहे. ध्वजस्तंभाच्या उभारणीसाठी पूर्वी केवळ उद्योजकांकडून निधी संकलन केले जाणार होते, मात्र सर्वसामान्यांचाही त्या उभारणीत वाटा असावा, यासाठी आता १०० ते १ हजार रुपयांपर्यंतची देणगी पत्रे कोणालाही घेता येऊ शकते. तिरंगा उभारणीत सर्वसामान्यांचा सहभाग असावा, यासाठी नवीन पद्धती अवलंबत असल्याचे सोमवारी पत्रकार बैठकीत सांगण्यात आले. हैदराबाद मुक्ती लढा दिनादिवशी म्हणजे १७ सप्टेंबरला सर्वात उंच तिरंगा असावा, अशी कल्पना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मांडली. त्यास मराठवाडय़ातील प्रशासन आणि विविध संघटनांनी साथ देण्याचे ठरविले. यासाठी २ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. हा निधी उद्योजकांकडून सहजपणे उभा करता येऊ शकेल. मात्र, त्यात सर्वसामान्यांचाही वाटा असल्यास अधिक चांगले होईल, असा विचार करून लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ध्वजस्तंभाभोवती स्वातंत्र्यसंग्राम व हैदराबाद मुक्ती संग्रामाचा संक्षिप्त इतिहास शिलालेखाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. ध्वजस्तंभ सतत उजेडात राहावा यासाठी एलईडी लाइटिंगची व्यवस्थाही केली जाणार आहे.