स्वमग्न आणि गतिमंद मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘आरंभ’ ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहे. स्वमग्न मुलांना त्यांच्या दैनंदिन गरजा स्वत: पूर्ण करता याव्यात, समाजाने त्यांना सहजपणे स्वीकारावे यासाठी ही संस्था काम करते. इमारत बांधणीसाठी संस्थेला दानशूरांकडून आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वमग्नता हा आजार कोणत्याही औषधाने बरा होत नाही. या आजारासह जगणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एका दिव्यातून जावे लागते. या मुलांसाठी शाळा सुरू करणाऱ्या अंबिका टाकळकर म्हणाल्या, ‘माझे मूलही स्वमग्न आहे. या मुलांवर उपचार करण्यासाठी होणारी फरफट अनुभवली आहे. अशी अनेक पालकांची स्थिती असेल असे जाणवल्यानंतर या मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेतून आतापर्यंत ६०० मुले शिकली. सध्या ६७ मुले शिक्षण घेत आहेत.’

मूल आणि पालक असा दोन्ही घटकांचा विचार केल्याशिवाय ही शाळा पूर्ण होत नाही. येथे येणारे प्रत्येक मूल विशेष असते. प्रत्येकाची तऱ्हा निराळी असते. ही मुले एकच एक काम करायला कंटाळत नाहीत. पण, त्यांना शिकवणारा माणूस कंटाळतो. त्यातून होणारी पालकांची मानसिक गुंतागुंत हाताळावी लागते. यासाठी अध्यापन करणारा माणूस प्रशिक्षित करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आता प्रशिक्षित व्यक्तींमार्फत सुरू असणारी ही शाळा पालकांना आणि मुलांनाही दिलासा देणारी ठरू लागली आहे.

या मुलांना घरात बसवून ठेवता येत नाही.  फिरणे ही त्यांची गरज असते. करोनाकाळ तर या मुलांसाठी अधिक अवघड होता. या काळात अनेक मुले हिंसक बनल्याच्याही तक्रारी आल्या. पण, समुपदेशन करून त्याही तक्रारी हाताळल्याचे अनुभव येथील शिक्षक सांगतात. पण, या मुलांची शाळा सुरू करणे हे एक आव्हान होते ते आरंभ संस्थेने हाती घेतले. गेली दहा वर्षे ही शाळा भाडय़ाच्या इमारतीमध्ये सुरू आहे. त्यासाठी समाजाचे सहकार्य मिळते आहे. बजाज फाउंडेशनकडूनही मदत झाली. मात्र, संस्थेच्या दरमहा खर्चातील मोठा वाटा इमारत भाडय़ात जातो. महिन्याला साधारणत: दीड लाख रुपये खर्चाचा डोलारा ओढताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे संस्थेला स्वत:च्या मालकीच्या इमारतीसाठी दानशूरांच्या मदतीची गरज आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarambh needs meaning for the defense of rights abn
First published on: 28-08-2020 at 00:01 IST