महाराष्ट्रात पावसाचा पत्ता नाही, पण घोषणांचा पाऊस आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर टक्का द्यावा लागतो. दुष्काळाने पिचलेला शेतकरी कोठून देणार, शेतकऱ्यांसाठी योजना खूप असल्या तरी त्याचा फायदा होत नसेल तर उपयोग काय, अशा शब्दात सरकारच्या कारभारावर हल्ला करून ‘आमची बांधिलकी सत्तेसाठी, नाही तर गोरगरिबांसाठी’ आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. नोव्हेंबरपासून मराठवाडय़ात दौरा करू व गर्दीचे विक्रम मोडणाऱ्या सभांमधून बोलेन, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे यांनी भाजपविरुद्ध रणिशग फुंकल्याचीच चर्चा बीडच्या कार्यक्रमानंतर होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून सुरू असणाऱ्या मानपान नाटय़ाचा भाग म्हणून उद्धव ठाकरे बीड येथे आले. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील एक हजार गरीब शेतकरी कुटुंबांना एक कोटीच्या मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सर्व नेते झाडून उपस्थित होते. यात सुभाष देसाई, रामदास कदम, विजय शिवतारे, दादा भुसे, खासदार चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे, लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख अनिल जगताप व बाळासाहेब िपगळे आदी उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीलाच पाऊस सुरू झाल्याचे सांगत ते म्हणाले, ‘मनात चांगली भावना असेल तर निसर्गही साथ देतो’. मागच्या वर्षी विरोधी पक्षात असताना मराठवाडय़ाचा दुष्काळी दौरा करून सरकापर्यंत आवाज पोहोचवला होता. यावेळी सरकारमध्ये असल्याने जबाबदारी वाढल्याने इतर नेत्यांप्रमाणे मोकळ्या हाताने नाही तर मदत घेऊन आलो आहे. असे सांगून २००६ च्या शासन अध्यादेशानुसार जेवढे कर्ज तेवढेच व्याज वसूल करावे, असे असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांसाठी योजना खूप आहेत, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. यापुढे सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसनिक पूर्ण करणार आहेत. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून जात असल्याने आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी, अशी भूमिका स्पष्ट केली. मराठवाडय़ात १ नोव्हेंबरपासून होणाऱ्या दौऱ्यात जाहीर सभांचे नियोजन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सोपवल्याचे त्यांनी जाहीर केले.
लातूर-नांदेड दोन्ही जिल्ह्य़ात आयुक्तालय हवे
लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यामधील विभागीय आयुक्त कार्यालयावरून सुरू असलेल्या खेचाखेचीचा उल्लेख करत दोन्ही ठिकाणी कार्यालय झाले पाहिजे, असे सांगत अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या जुन्या मागणीस पूर्ण पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रशासन लोकांच्या दारी जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे, असे ते म्हणाले. बीड हा दुष्काळी जिल्हा आहे. बीड जिल्हा हा शिवसेनेसाठीही दुष्काळीच असल्याचे सांगत भरघोस मतदान केले असते, तर शिवसेनेचे सरकार आले असते आणि शेतकऱ्यांना भरभरून मदत केली असती, असे ते म्हणाले.
बाबासाहेबांवर बेगडी प्रेम
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ‘साहेब’ या विषयी बोलणार नाहीत असा उल्लेख करून मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमिपूजन कार्यक्रम भाजपचा आहे की शासनाचा, असा सवाल करत बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेगडी प्रेम दाखवत असल्याचा आरोप केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी पाठिंबा दिला होता. तो आजही कायम असल्याचा उल्लेख करून कदम यांनी भाजप नेत्यांचा नामोल्लेख टाळून जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या दुखात शिवसेना सहभागी असून राजकारण करण्यासाठी हा कार्यक्रम नसल्याचे स्पष्टीकरण आमदार नीलम गोऱ्हे यांनी दिले. मुंबईत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे. डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर असल्याचे सांगून शिवसेना सत्तेसाठी कोणाची गुलाम नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcements rain uddhav thackeray
First published on: 12-10-2015 at 01:56 IST