प्रतिपिंड वाढल्याच्या चाचणीतून करोनाबाधितांचे भाकीत

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. ही संख्या तेरा हजारांच्या घरात पोहचली आहे. अनेकांना लागण होऊन गेल्याची शक्यता असल्याने रक्तातील प्रतिपिंड (अ‍ॅन्टीबॉडीज्) वाढलेल्या असू शकतात. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ एजन्सी निवडून काम केले जाईल, असे महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडये यांनी सांगितले. रुग्णवाढ रोखण्यासाठी शहरात ‘दिल्ली पॅटर्न’ राबविण्याची सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी केली होती. शनिवारी या पथकाने शहरातील विविध प्रतिबंधित क्षेत्राला भेटी दिल्या. त्यानंतर ‘सिरो’ सर्वेक्षण करण्याची तयारी असल्याचे आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

दिल्लीत करोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिरो सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आणता आली आहे. सिरो सर्वेक्षण हे निवडणुकीनंतरच्या निवडणूक पूर्व निकालाप्रमाणे असते. लोकसंख्येच्या प्रमाणात काही जणांचे सर्वेक्षण केले जाते. ‘सिरो’ सर्वेक्षणामध्ये रक्तचाचणी केली जाते. यादृच्छिकीकरण पद्धतीनुसार रक्ततपासणीमध्ये  किती प्रतिपिंड तयार झाले असतील यावरून साथरोगा विरोधात लढणारी शक्ती तयार झाली आहे का, याची तपासणी केली जाते.  दिल्लीच्या दोन कोटी लोकसंख्येसाठी  २३ हजार लोकांचे ‘ सिरो सर्वेक्षण’ करण्यात आले. त्या सर्वेक्षणानुसार  प्रत्येक चार व्यक्तींच्या मागे एका व्यक्तीला करोना होऊ शकतो असे मानले गेले आहे. तसेच सर्वेक्षण औरंगाबादमध्ये केले जाणाार आहे.

आणखी एक लाख अँटिजेन किटची खरेदी

शहरातील करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून काढण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याच्या उद्देशाने महापालिकेने दोन टप्प्यात एक लाख अँटिजेन टेस्ट खरेदी केल्या होत्या. येत्या काळात हे प्रमाण वाढविता यावे म्हणून आणखी एक लाख चाचणी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

जालन्यात करोनाचे रुग्ण अठराशेपार

जालना जिल्ह्य़ात रविवारी दुपापर्यंत करोनाबाधितांची संख्या १ हजार ८५० झाली होती. तर एक हजार १५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होण्याची टक्केवारी ६२ एवढी आहे. ८ हजार ८५८ नमुन्यांची चाचणी नकारात्मक आली आहे. आतापर्यंत एकूण ५९ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या जिल्ह्य़ात संस्थात्मक अलगीकरणात ८९२ व्यक्ती आहेत.

लातुरात ६५ नवे करोनाचे रुग्ण

लातूर जिल्ह्य़ात रविवारी दुपापर्यंत ६५ नव्या करोनाबाधित रुग्णांची भर पडली. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची एकूण आकडेवारी ही १ हजार ५१३ एवढी झाली आहे. तर ८८६ एवढे रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्य़ात सध्या उपचार घेत असलेल्या करोनाच्या रुग्णांची संख्या ५३४ एवढी असून आतापर्यंत ७३ बाधितांचा मृत्यू झाला.