औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज ‘वंदे मातरम’ म्हणण्यावरुन प्रचंड गोंधळ झाला. ‘वंदे मातरम’ने कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, यावेळी एमआयएमचे नगरसेवक जागेवरच बसून राहिल्याने शिवसेनेने त्यांच्यावर आक्षेप घेतला. नगरसेवकांच्या गोंधळामुळे सभा सुरु झाल्यानंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. यादरम्यान, सभागृहात माईकची तोडफोड आणि नगरसेवकांचा एकमेकांना धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. दरम्यान, एमआयएम आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्यांदा सभागृहाच्या तहकुबीनंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र, सर्व नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा कायम होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात ‘वंदेमातरम’ म्हणून होते. मात्र, आज ‘वंदे मातरम’ सुरु असताना एमआयएमचे दोन नगरसेवक जागेवर बसून होते. यावर शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. ‘इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा’ अशी घोषणाबाजी करीत शिवसेना, भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते. त्यामुळे जागेवर बसून राहणाऱ्या एमआयएमच्या दोन नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर सभागृहात गोंधळचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सुरुवातीला दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

दहा मिनिटांनंतर पुन्हा कामकाज सुरु झाले. मात्र, नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा कायम होता. निलंबित नगरसेवकांना सभागृहात बसू देऊ नका यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी वेलमध्ये येऊन ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ अशी घोषणाबाजी केली. तर, एमआयएम नगरसेवक महापौर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांचा गोंधळ थांबत नसल्याने पुन्हा महापौर यांनी सभागृह तहकूब केले.

मात्र, या तहकुबीदरम्यान शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, शिवसेना सभागृह नेते गजानन मनगटे यांनी सभागृहात भगव्या शाली फडकावल्या. तर एमआयएमच्या नगरसेवकांनी हातात माईक आणि पंखे घेत तोडफोडही केली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक अब्दुल मतीन आणि काँग्रेसचे नगरसेवक सोहेल शेख यांना निलंबित करण्यात आले होते. सभागृहातील हा प्रचंड गोंधळात शेवटी पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

आतापर्यंत सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदेमातरम’ ने होत होती. मात्र, आजच एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप का घेतला, हे कळले नाही. मात्र, वंदे मातरम म्हणायचेच नसेल तर सभागृहाबाहेर बसा अशी विनंती आम्ही त्यांना केली. यावेळी त्यांनी आम्हाला धक्का दिला, असे भाजपचे सभागृह नेते प्रमोद राठोड यांनी सांगितले.

दरम्यान, या अभुतपूर्व गोंधळामुळे महापालिकेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad municipality huddle with vande mataram shiv sena and mim corporators abut each other
First published on: 19-08-2017 at 12:55 IST