मुख्यमंत्र्यासह प्रतिमा झळकविण्यावर टीका

आपले काम दिसावे म्हणून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी केलेल्या कामगिरीची माहिती देणारे फलक शहरात शनिवारी झळकवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी स्वातंत्र्य संग्राम स्मारकाच्या कार्यक्रमाला येणार असल्याचे पूर्वी जाहीर करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर त्यांनी लावलेले हे फलक लक्ष वेधून घेणारे होते. मुख्यमंत्री या कार्यक्रमास आले नाहीत. मात्र राज्यपालांचा अधिकृत दौरा जाहीर झाल्यानंतर स्वागताचे फलक लावत पोलीस आयुक्तांनी स्वत:ची प्रतिमा झळकावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजकीय कार्यकर्ते सर्वसाधारणपणे बॅनरबाजी करतात. मात्र, थेट पोलीस आयुक्तांनी केलेल्या या कृतीमुळे नवाच पायंडा पडण्याची शक्यता आहे.

गावात कोणी नेता येणार असेल, तर त्याचे फलक लावण्याची पद्धत राजकीय कार्यकर्ते मनापासून करतात. ज्यांना एखादे पद हवे असते, किंवा तशी लालसा असणारे कार्यकर्ते बॅनरबाजी करतात. एखाद्या नेत्याचा समर्थक म्हणून ज्या कार्यकर्त्यांला तशी प्रतिमा घडवायची असते, त्याच्या छायाचित्रांचा जोर असतो. पण औरंगाबादमध्ये थेट पोलीस आयुक्तांनीच लोखंडी अँगलच्या होल्डिंगवर स्वागताचे बॅनर लावले आहे. यामध्ये पोलीस दलाने केलेल्या कामाचा उल्लेखही करण्यात आला आहे. ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेरे असणारी चित्रे या बॅनर दिसत असून पोलीस दलाच्या कामगिरीमुळे अपराध कसे कमी झाले आहेत व आरोपींना शिक्षा होण्याचा दर कसा वाढला आहे, हे नोंदविण्यात आले आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे काम पोलीस आयुक्तच करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हा प्रकार ‘जी- हुजूर’चा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या अनुषंगाने बोलताना काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे म्हणाले, ‘खरे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिष्टाचार सोडून वागू नये. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी असले प्रयत्न चुकीचे आहेत.

प्रशासकीय अधिकारी जनतेचा सेवक असतो. मुख्यमंत्र्याचे स्वागत करीत स्वत:चे छायचित्र लावणे राजकीय कार्यकर्ते होण्यासारखे आहे.’