मराठवाडय़ातील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या मातबर नेत्यांनी ‘कमळ’ चिन्ह टाळले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना नगरपालिकेत उमेदवारच दिला नाही. परिणामी, पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे जालन्याच्या निवडणुकीतून कमळ गायब आहे. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी परतूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांनीही कमळ टाळले आहे. त्या ‘हाताचा पंखा’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कमळ चिन्ह मिळावे म्हणून उमेदवारांमध्ये चढाओढ असे. नगरपालिका निवडणुकीत मात्र कमळ टाळणेच नेत्यांनी पसंत केले.
नगरपालिका निवडणुकीत दलित आणि मुस्लीम मतदार भाजपच्या बाजूने येणार नाहीत. त्यामुळे कमळाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणणे जवळपास अशक्य असल्याचे सांगत या तडजोडी ‘पद्धतशीर’पणे केल्या गेल्या. माजलगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आर. टी. देशमुख निवडून आले. आमदार झाल्यानंतर याच मतदारसंघात दलित आणि मुस्लीम मते मिळतील का, याची शंका त्यांना वाटू लागली आणि राष्ट्रवादी बंडखोर अशी ओळख असणाऱ्या साहल चाऊस यांना भाजपने पुरस्कृत केले. नगरपालिका निवडणुकीत पुरस्कृत आघाडीच पुढे करून निवडणूक लढवली जात आहे. प्रदेशाध्यक्षांपासून ते आमदारांपर्यंत अनेकांनी कमळ टाळल्याचे दिसून आले. यात भाजपचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. परंडा येथील नगरपालिका निवडणुकीत ते कमळ चिन्हावर उमेदवार उतरवतील, असे वाटत होते. मात्र, मुकुल लक्ष्मीकांत देशमुख यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले. त्यांना ‘रोडरोलर’ हे चिन्ह मिळाले आहे. भाजपतील काही कट्टर कार्यकर्त्यांना कमळ चिन्हाला टाळणे फारसे आवडलेले नाही. विशेषत: ‘परिवारा’च्या जवळ असणाऱ्या अनेक नेत्यांनी कमळाला केलेला ‘टाटा’ आवर्जून दाखवला जात आहे.