शिवसेना विरुद्ध भाजपतील संघर्षांचा पुन्हा एक अंक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना विरुद्ध भाजप, असा संघर्ष गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. पाणीपुरवठा विभागाकडून गावनिहाय पुरवण्यात येत असलेल्या टँकरच्या फेऱ्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करताना भाजप सदस्य आक्रमक झाले. एका सदस्याने तर मला बोलू द्या, अन्यथा तुमच्या कारभाराची पोलखोल करेल म्हणत बराच वेळ गोंधळ घातला. अखेर टँकर घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांच्याकडून मिळाल्यानंतर सदस्य शांत झाले.

भाजपचे सदस्य एल. जी. गायकवाड यांनी टँकर पुरवठय़ात घोटाळा झाल्याचा आरोप केला. टँकरच्या ग्रामपंचायत स्तरावरील नोंदी, लॉगबुक, पाणीपुरवठा विभागातील नोंदीत मोठी तफावत आहे. काही ठिकाणी ७०० टँकर दाखवले असून प्रत्यक्षात टँकरच्या ३०० फेऱ्या झाल्याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले. टँकरवर जीपीएस प्रणालीही बसवण्यात आलेली नव्हती, तसेच अनेक टँकरला गळती लागलेली होती. त्यामुळे प्रत्यक्षात मंजूरपेक्षा कमीच पाणी ग्रामस्थांना मिळाले, असेही गायकवाड यांनी सभागृहात सांगितले. कार्यकारी अभियंता अशोक घुगे यांनी कुठलाही घोटाळा झाला नसल्याचे सांगितले. त्यावर २५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठय़ाच्या घोटाळ्याची अजूनही चौकशी झालेली नाही, याकडे लक्षही गायकवाड यांनी वेधले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी कोणत्या गावाला पाणीपुरवठा झाला नाही, याचे स्पष्टीकरण सदस्यांना मागितले. मात्र त्याचे थेट स्पष्टीकरण देता आले नाही. ठेकेदारावर होत असलेल्या आरोपाबाबत उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी, जिल्हाधिकारी आणि सरकारच ठेकेदार नियुक्त करत असल्याचे सांगितले. सदस्य सुरेश सोनवणे यांनी मला बोलू द्या, असा आग्रह धरला. मात्र अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी विषय पत्रिकेवरील इतर विषयावर बोलता येणार नाही म्हणताच सोनवणे यांनी संताप व्यक्त करून गोंधळ घातला. आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या कारभाराचे अनेक वादग्रस्त मुद्दे असून मला बोलायला दिले नाही तर आपण पोलखोल करू, असे थेट अध्यक्षांनाच उद्देशून बोलल्यामुळे सभागृहात बराच वेळ गोंधळ सुरू होता.

जिल्हा परिषदेचा ५६ कोटी सात लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. बांधकाम विभागासाठी १० कोटी ७२ लाख, शिक्षणासाठी पाच कोटी ५० लाख, महिला व बालकल्याणसाठी एक कोटी ५९ लाख, सामाजिक न्यायसाठी सात कोटी ९० लाख, दिव्यांगांसाठी एक कोटी ९० लाख, पशुसंवर्धनसाठी तीन कोटी १२ लाख, सिंचनासाठी सात कोटी, कृषीसाठी तीन कोटी सहा हजार रुपये, असा ५६ कोटी सात लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

पाच एकर जागेवर अतिक्रमण

हडकोतील अपंग बालगृहाची जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची असून ५० कोटी रुपये किंमत असलेल्या या पाच एकरवर अतिक्रमण करून प्रार्थना स्थळ बांधण्यात आल्याचा मुद्दा सदस्य रमेश गायकवाड यांनी उपस्थित केला. शाळांमधील गॅस जोडणीसाठीचे ८२ लाख, महापुरुषांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठीच्या २५ लाखांचा निधी पडून असल्याकडेही गायकवाड यांनी लक्ष वेधले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp member aggressive over tanker scam in zilla parishad meeting zws
First published on: 12-07-2019 at 03:41 IST