भाजपकडून जुन्याच मुद्दय़ांची चर्चा ; आठ दिवस पत्रकार परिषदा व आंदोलनातून सरकारच्या विरोधात संघर्ष

एका बाजूला भाजपकडून आरोपीची तड लावली असली तरी त्याला शिवसेना नेते त्यावर फारसे बोलत नाहीत.

औरंगाबाद: आज पडेल, उद्या पडेल असे स्वपक्षातील आमदारांना सांगत भाजप नेत्यांनी दोन वर्षे आमदारांना धरून ठेवले. मात्र, आता विरोधी पक्षाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडतो आहोत असा संदेश पक्षांतर्गत आणि सर्वसामांन्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपकडून सरकारच्या अपयशाचे ढोल-ताशे वाजविण्यासाठी सात दिवस आधीपासून आंदोलन आणि पत्रकार बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेती, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महिला, करोना अपयश, अनुसूचित जाती- जमाती, भ्रष्टाचार आदी विषयांवर माध्यमांसमोर बोलत राहण्यासाठी राज्यभरात ७४ नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या कार्यक्रमात फडणवीस यांचे कौतुक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याची संधी सोडायची नाही, असे ठरवून सारे नेते आता मैदान उतरविण्यात आले आहेत.

दररोज एक पत्रकार बैठक आणि रोज एक आंदोलन असे कार्यक्रम आखल्यानंतर भाजप नेते जुन्या मुद्दय़ांना फोडणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. औरंगाबाद येथे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्न आवर्जून सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडताना ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाचा अहवाल दाखल करताना कागदपत्रे हरविल्याचाही दावा केला.

सध्याचे सत्ताधारी वाईट आणि भाजपचे नेते चांगले अशी मराठा आरक्षणावरची मांडणी करत लोणीकर यांना भाजपची मुस्लीम आरक्षणाविषयीची भूमिका कोणती असे विचारले असता त्यांच्यातील मागास जातींनाही आरक्षण मागण्याचा हक्क आहे. पण त्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असे सांगायला ते वसरले नाहीत. लोणीकरांपूर्वी भ्रष्टाचार आणि कुशासन यावर किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला. खरे तर जालना साखर कारखान्याचे हे प्रकरण कॉ. माणिक जाधव यांनी उचलून धरले होते. त्यांनी राज्यातील विक्री झालेल्या ५६ कारखान्यांच्या विक्री बाबत तक्रार केली होती. त्यातील सगळी कागदपत्रे गोळा केल्यानंतर रमाबाई आंबेडकरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. पण तेव्हा त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या संघर्षांत माणिक जाधव यांच्याबरोबर मेधा पाटकर, अण्णा हजारे यांचीही साथ होती. पुढे मेधा पाटकर या आंदोलनातून काहीशा दूर झाल्या. अण्णा हजारे यांनी तक्रार केली. पण पोलिसांनी तपास काही केला नाही. मग या प्रश्नी न्यायालयात धाव घेण्यात आली.

पुढे कंटाळलेल्या जाधव यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रार केली त्यानंतर या प्रकरणी अलीकडेच छापे टाकले. अंमलबजावणी संचालनालयाचे छापे पडले आणि अर्जुन खोतकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले. तक्रार कोणाचीही असो अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई झाली की भाजप नेत्यांचा आवाज उंचावतो. या वेळीही असेच घडले. येत्या चार दिवसात नवे नेते आणि नवे आरोप असे नियोजन ठरलेले असल्याने प्रत्येक नेता आता आवाज वाढवू लागला आहे.

एका बाजूला भाजपकडून आरोपीची तड लावली असली तरी त्याला शिवसेना नेते त्यावर फारसे बोलत नाहीत. सत्ताधारी शिवसेना सध्या संघटन बांधणीवर भर देत असल्याचे दिसून येत आहे. घरावर भगवे ध्वज लावणे, वार्डातील रस्त्यांची कामे मंजूर करणे, त्याची भूमिपूजन करण्यासाठी मंत्र्यांना निमंत्रित करणे आदी कामांमध्ये सेनेचे आमदार दिसत आहेत. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एखादा मोठा होतो काय, याची चाचपणी भाजपकडून केली जात आहे.

७४ जणांची नियुक्ती

शेती, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महिला, करोना अपयश, अनुसूचित जाती- जमाती, भ्रष्टाचार आदी विषयांवर माध्यमांसमोर बोलत राहण्यासाठी राज्यभरात ७४ नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. दररोज एक पत्रकार बैठक आणि रोज एक आंदोलन असे कार्यक्रम आखल्यानंतर भाजप नेते जुन्या मुद्दय़ांना फोडणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp struggle against the mva government through agitation over various issue zws

Next Story
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी सेनेचे सर्व मंत्री मराठवाडय़ात
ताज्या बातम्या