सध्या फेसबुकचा जमाना असून सगळे जण त्यातच गुंतले आहेत. खरे तर फेसबुकपेक्षा बुकफेस महत्त्वाचे. तंत्रज्ञानाला विरोध नाही. खिडकीतून आकाश दिसते, पण खिडकी म्हणजेच आकाश नव्हे याचे भान आपल्याला असायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश वाचनालय व अक्षरप्रतिष्ठा यांच्या वतीने डॉ. ना.गो. नांदापूरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दवणे यांचे व्याख्यान झाले. माहिती व दळणवळणाची साधने कितीही प्रगत झाली तरीही छापील अक्षरांचे महत्त्व कमी होणार नाही. शब्दांचे धन आपल्याला समृद्ध करते, असे सांगून दवणे यांनी आपला साहित्यिक प्रवास उलगडला. सुरुवातीला विद्यार्थी दशेत पाठय़पुस्तकांमधून भेटणारे लेखक, पुढे अनेक मान्यवरांची भाषणे आणि विचार ऐकून व्यक्तिमत्त्वाला आलेली झळाळी, बालपणीच एका चित्रकाराच्या व्यथेने सुचलेले काव्य, चित्रपट गीतांचा प्रवास, कथा व ललितगद्य लेखनातील बारकावे असे अनेक पलू दवणे यांनी उलगडले.

मुक्तछंद म्हणजे स्वैर लिहिणे नव्हे, तर मुक्तछंदालाही स्वत:ची आंतरिक लय असते, असे सांगून त्यांनी या वेळी काही कविता सादर केल्या. लेखन- प्रवासादरम्यान आलेले अनुभवही त्यांनी सांगितले. जीवनाचा समरसून आनंद घेणे महत्त्वाचे. जीवनात अतिशय रुक्षपणे जीवन जगणारी माणसे भौतिक आयुष्यात कितीही उंची जीवन जगली तरीही या जगण्यात अर्थपूर्णता नसते, असेही त्यांनी या वेळी सांगितले. यश आणि अपयश असे काही नसतेच. त्याला परीक्षेचे परिमाण लावू नये. परिश्रमातला आनंदच सर्वश्रेष्ठ असतो. केवळ गुणांच्या टक्केवारीत यश मोजता येत नाही. त्यामुळे गुण कमी मिळाले म्हणून खचून जाण्यातही अर्थ नाही. खरा आनंद हा अथक अशा प्रवासातच असतो, असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रा. रविशंकर िझगरे यांनी केला. अर्चना डावरे यांनी सूत्रसंचालन केले.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookface is important than facebook
First published on: 01-07-2016 at 01:49 IST