एस. टी. बस आणि ऊसतोडणी कामगारांना घेऊन येणारी मालमोटार यांची समोरासमोर धडक होऊन २२ जण गंभीर जखमी झाले. औरंगाबाद-बीड महामार्गावर जालना जिल्ह्य़ातील अंबड तालुक्यात महाकाळ फाटय़ाजवळ बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना बीड, अंबड, जालना व औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
बीड आगाराची बीडहून औरंगाबादकडे जाणारी बस (एमएच २० बीएल ११००) व अंबडच्या समर्थ सहकारी साखर कारखान्यात ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातानंतर मालमोटार उलटली. जखमींमध्ये बसचालक गोपीनाथ जाधव (वय ३६, गेवराई), विजया बांगर (वय ४०, बीड) या दोन जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून औरंगाबादला हलविण्यात आले. सय्यदाबी शेख गनी (वय ४०), नारायण रोटे (वय ६९), उमाकांत देवळे (वय ६१), बाळू पवार (वय २०, सर्व औरंगाबाद), सय्यद इरफान इब्राहिम (वय २५), पल्लवी खडके (वय २८), प्रेमलता खडके (वय ५५, बीड), शारदा पांचाळ (वय ५२, धारूर) यांच्यावर अंबडला प्राथमिक उपचार करण्यात आले.
मालमोटारीतील संजय राठोड व जखमींना बीड येथे हलविण्यात आले. त्यांची नावे कळू शकली नाहीत. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक तब्बल दीड तासानंतर सुरळीत करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2015 रोजी प्रकाशित
बस-मालमोटारीची धडक; २२ जखमी
एस. टी. बस आणि ऊसतोडणी कामगारांना घेऊन येणारी मालमोटार यांची समोरासमोर धडक होऊन २२ जण गंभीर जखमी झाले.
Written by बबन मिंडे

First published on: 05-11-2015 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus motor accident 22 injured