छत्रपती संभाजीनगर : नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सोमवारपासून ( दि.१०) सुरुवात झाली आहे. उमेदवार आपल्या भाग्यात विजयाचा गुलाल आहे की शत्रुबळ पुरती वाट लावणार याचा ‘भविष्य’वेध जाणून घेण्यासाठी ज्योतिष अभ्यासकांकडे गर्दी करत असून, अर्ज भरण्याच्या मुहूर्तापासून ते निवडणुकीच्या काळात कोणती उपासना शत्रुबळावर भारी पडेल, याचा पत्रिका दाखवून अंदाज घेत आहेत.
ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून राज्यात भविष्य पाहणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी वाढली आहे. त्यातही दोन प्रकार आहेत. खासगी संस्थांकडून चालवले जाणारे अभ्यासक्रम आणि रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील (केकेएसयू) ज्योतिर्विज्ञानसारखा विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत चालवण्यात येणारा अभ्यासक्रम, असे दोन प्रकार आहेत. खासगी संस्थांचे किंवा ऑनलाइन चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांमध्ये निवृत्तांची संख्या अधिक आहे. अभ्यासक्रम शिकलेले काही ठरावीक शहरांमध्ये २०० च्या आसपास संख्येने आहेत. तर पारंपरिक पद्धतीने भविष्य सांगणारे प्रत्येक शहरात १५-२० जण असतात, असे येथील ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात.
या संदर्भाने रामकृष्ण बारहाते सांगतात की, राज्यात आणि देशातही सध्या हिंदुत्वाचा गजर होत असून, या संस्कृतीनुसार कोणतेही शुभ काम करण्यासाठी मुहूर्त पाहिला जाण्याची एक परंपराही रूढ आहे. साधारणपणे भविष्य हे जन्मपत्रिका पाहून पाहिले जाते. त्यात प्रथम चंद्र, रविबळ व गुरूबळ पाहिले जाते. गुरूसह शनीचे पाठबळही ग्रहदशेत लक्षात घेतले जाते. शिवाय शत्रुबळ किती प्रबळ आहे, हे पाहून ते कमी करण्यासाठी अनुष्ठान पद्धतही सांगितली जाते. कलियुगात गणपती व देवी लवकर प्रसन्न होणाऱ्या देवता मानल्या जातात. त्यानुसार ‘कालिचण्डी विनायको’ असा शब्द परिचित असून, महादेवाचीही उपासना सांगितली जाते. भविष्य विद्येवर श्रद्धा व भक्तीही आहे.
अलीकडच्या काळात निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी मुहूर्त आणि कुंडलीतील ग्रहदशा स्थितीचा ज्योतिषशास्र अभ्यासकांकडून अंदाज घेतला आहे. जवळपास सर्वच पक्षातील उमेदवार पत्रिका आणि त्यातील शत्रुबळ, गुरुबळ पाहून अर्ज भरण्यापूर्वी ज्योतिषांकडे संपर्क साधतात. – रामकृष्ण बारहाते, ज्योतिष अभ्यासक
ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला महत्त्व आहे. ११ नोव्हेंबरला पुष्यनक्षत्र आहे. नक्षत्र स्थिर तर ग्रह बदलत असतात, असे ज्योतिषशास्त्र मानते. चालू नावापेक्षा जन्म नावाची कुंडली पाहून भविष्य सांगितले जाते. पत्रिकेतील राहू काळ, अंत:र्दशा, महादशा याचा सर्व धांडोळा ज्योतिर्विज्ञानात येतो. सूर्यसिद्धांत, वराहमीर व मुहूर्त मार्तंड हे तीन प्रमुख ग्रंथ मुहूर्ताशी संबंधित आहेत. उमेदवारांकडून मुहूर्त विचारला जात आहे. – उमेश जोशी, एम. ए. ज्योतिर्विज्ञान, केकेएसयू
ज्योतिर्विज्ञान अभ्यासक्रम कुठे चालतात?
विद्यापीठ अनुदान आयोगाअंतर्गत येत असलेलेही ज्योतिर्विज्ञानचे अभ्याक्रम देशातील काही विद्यापीठांमध्ये चालवण्यात येतात. त्यामध्ये काशी-वाराणसीत स्वरूपानंद, उज्जैनला महर्षी पाणिनी, दिल्लीच्या लालबहादूर शास्त्री मुक्त विद्यापीठात, गुजरात, हिमाचल प्रदेशासह महाराष्ट्रात रामटेकचे कवी कालिदास विश्व विद्यालय विद्यापीठामध्ये ज्योतिर्विज्ञान अभ्यासक्रमाचे पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण दिले जाते. आचार्यही पदवी यामध्ये आहे. संस्कृतमधून शिक्षण घेतलेल्यांसाठी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम अधिक सोपा जातो. शंभरवर काही खासगी संस्थांकडूनही हा अभ्यासक्रम शिकवला जातो, अशी माहिती उमेश जोशी यांनी दिली.
