शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिपीन देशपांडे

औरंगाबाद : करोनाने कोणाची आई तर कोणाचे वडील हिरावले. कोणाचे तर आई आणि वडील दोघेही गेले. अशा घरातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या पाल्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. होमिओपॅथी शाखेचे शिक्षण घेत असलेल्या तुषार शिंदेला स्वत डॉक्टर व्हायचे स्वप्न पूर्ण करायचे की बहिणीचे दंतचिकित्सेचे अंतिम टप्प्यातील शिक्षण तडीस न्यायचे, असा प्रश्न सध्या सतावतो आहे. ही भावंडे करोनाने मृत्यू पावलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याची मुले आहेत. असाच प्रश्न केजच्या अजिंक्य साखरेपुढेही उभा आहे. त्याचे आई आणि वडील दोघेही गेले.  पालकांच्या मृत्यूने शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनेक मुला-मुलींची अशी अवस्था आहे.

बीडच्या केज तालुक्यातील होळ गावचा रहिवासी असलेला तुषार सतीश शिंदे हा हिंगोलीत होमिओपॅथीच्या दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेत आहे. तर बहीण डॉ. प्रियंका शिंदे पुण्यातील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दंतचिकित्सेच्या अंतिम वर्षांत शिकत आहे. तिचे केवळ सहा महिन्यांचे शिक्षण पूर्ण व्हायचे बाकी आहे. तुषार व प्रियंकाचे वडील सतीश शिंदे यांचा ४ मे २०२१ रोजी करोनाने मृत्यू झाला. दोघांच्याही शिक्षण व इतर गरजांसाठी मिळून महिना किमान २५ हजार रुपये खर्च येतो. हा खर्च आता कुठून आणि कसा भागवायचा, असा प्रश्न तुषारला पडला आहे. तुषार सांगतो, ‘‘वडील तीन एकर शेतात पीक काढून आम्हाला पैसे पाठवायचे. त्यांच्यानंतर आम्हा भावंडांच्या शिक्षणासाठी आता मामाचा एकमेव आधार वाटतो. पण मामाही अल्पभूधारक शेतकरी आहे. तो तरी कसा काय तजवीज करणार? त्यामुळे आपल्यापेक्षा प्रियंकाचे अंतिम वर्षांचे सहा महिन्यांचे शिक्षण पूर्ण करण्याला सध्या प्राधान्य दिले आहे. तिचे तरी डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे आहे.’’

धारूर तालुक्यातील तांदूळवाडीतील मूळ रहिवासी आणि केज येथे राहणारा अजिंक्य साखरे हाही युवक वैद्यकीय शिक्षणासाठीची तयारी करतो आहे. त्याची बहीण स्नेहा साखरे तर नाशिकला आयुर्वेदिक शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. लहान भाऊ दहावीत आहे. या तिन्ही भावंडांचे आई-वडील अलीकडेच करोनाने गेले आणि त्यांचे पुढील वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी सापडले. अजिंक्यचे वडील अशोक साखरे हे बीडला नोकरी करत होते. त्यांनाही तीन एकपर्यंतची शेती आहे.

तुषार व प्रियंका शिंदे, अजिंक्य-स्नेहा साखरे या भावंडांसारख्या अनेक मुलांचे करोनाकाळात आई-वडील किंवा दोघांपैकी कोणा एकाचा मृत्यू झाल्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी झाले आहे.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शिक्षण घेत असलेल्या तीन ते चार जणांचेही आई किंवा वडील यांचे करोनाने निधन झाले आहे. अनेक विद्यार्थी शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत.

-डॉ. अक्षय क्षीरसागर, मराठवाडा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना-मार्ड

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona went to her parents now how to be a doctor ssh
First published on: 03-06-2021 at 03:11 IST