विश्व मराठी साहित्यसंमेलनाच्या आयोजनासाठी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या झोळीत मोठे दान पडले. पण या दानातील बहुतांश रक्कम निमंत्रित वक्ते, कलाकार, महामंडळ पदाधिकारी तसेच स्वागताध्यक्षांच्या पाहुण्यांच्या सरबराईवर खर्ची पडली. जमा-खर्चातील काही बाबी संशय निर्माण करणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एका सदस्याने यास दुजोरा दिला.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या ५०व्या स्मृतिवर्षांचे औचित्य साधत अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर नगरीत भरविण्यात आलेले हे संमेलन आधी प्रतिनिधी शुल्क सक्ती व नंतर संमेलनाध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांच्या भाषणाने गाजले. आता संमेलनानिमित्त जमा झालेल्या भरीव निधीच्या विनियोगाची काही माहिती समोर आली आहे. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी ऑफबीट डेस्टिनेशन्स (पुणे) या प्रवासी संस्थेसह पोर्ट ब्लेअरच्या महाराष्ट्र मंडळावर टाकली होती. स्थानिक व्यवस्थेची जबाबदारी या मंडळाने अत्यंत चोख व अत्यल्प खर्चात पार पाडली. ‘ऑफबीट’ने निमंत्रित मान्यवर व संमेलनाशी संबंधितांसह साहित्यप्रेमींच्या प्रवास-निवास आणि इतर व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली. संमेलनास येणाऱ्या प्रत्येक साहित्यप्रेमी उपस्थितांकडून प्रतिनिधी शुल्क म्हणून प्रत्येकी ३ हजार रुपये वसूल करण्याचा घाट महामंडळ आणि ‘ऑफबीट’ या दोघांनी संयुक्तपणे घातला होता, पण मसाप नांदेड शाखा व शाखेचे कार्यवाह प्रभाकर कानडखेडकर यांनी तो हाणून पाडला.
प्रतिनिधी शुल्काची बाब निश्चित झाली तेव्हा संमेलनाच्या आयोजनासाठी कोणत्याही माध्यमातून अर्थसाहाय्य झाले नव्हते. पण नंतर मुंबई महापालिकेसह अन्य व्यक्ती-संस्थांनी केलेली मदत ४० लाखांवर गेली. ही रक्कम प्राप्त झाल्यावरही महामंडळ, तसेच ‘ऑफ बीट’ने त्यांच्या निमंत्रितांखेरीज इतरांकडून एक वेळच्या भोजनासाठी ५०० रुपये आकारले. महामंडळाच्या एका सदस्याला ही बाब खटकली. त्यामुळेच पुढील महिन्यात होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत या अन्य मुद्यांवर ‘गरम’ चर्चा होण्याची शक्यता आहे.
संमेलनाला पाच-सहाशे साहित्यप्रेमी आपापल्या खर्चाने आले खरे, पण त्यांना नि:शुल्क भोजन देण्याचे औदार्य भरीव अर्थसाहाय्य मिळाल्यावर दाखवले गेले नाही. संमेलनास मिळालेला बराचसा निधी पोर्ट ब्लेअर येथील युनियन बँकेच्या खात्यात जमा झाला. नेमकी किती रक्कम या खात्यात जमा झाली ते कळाले नाही, पण ही सर्व रक्कम ‘ऑफबीट’च्या नितीन शास्त्री यांच्याकडे पाठविण्यास आमची हरकत नाही, असे पत्र महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी ३१ ऑगस्टला पोर्टब्लेअरच्या महाराष्ट्र मंडळाला दिले. या पत्राची प्रत नांदेडच्या प्रभाकर कानडखेडकर यांनी मिळवली. महामंडळ व ऑफबीट यांच्या दरम्यानचा आर्थिक व्यवहार खुला करण्याची मागणी त्यांनी केली.
आणखी एक संशय निर्माण करणारे पत्रही बाहेर आले. ‘ऑफबीट’च्या नितीन शास्त्री यांनी २ सप्टेंबरला महाराष्ट्र मंडळाच्या सचिवांना लिहिलेल्या या पत्रात पोर्ट ब्लेअर येथील बँक खात्यात जमा झालेले ५ लाख रुपये मुंबईच्या ग्रँड व्हॅकेशन्स प्रा. लि.च्या खात्यात वर्ग करा, असा आदेशच दिला होता. ही रक्कम स्वागताध्यक्ष खासदार राहुल शेवाळे यांच्या पाहुण्यांच्या हवाई प्रवासाच्या तिकिटांवर खर्च झाल्याचे दिसते, पण हे ५ लाख रुपये कोणी दिले होते, ते महामंडळालाही ठाऊक नाही, पण हे पत्र पाहून महामंडळाचा एक सदस्य चकित झाला. त्याच वेळी आर्थिक बाबी संशयास्पद असल्याचे निदान या सदस्याने केले.
महामंडळ पदाधिकारी व सदस्यांवर पूर्वी ‘फुकटे’ असा शिक्का बसला होता. या पाश्र्वभूमीवर यंदा आम्ही आमच्या खिशातून साडेसात हजार रुपये प्रवासखर्चासाठी भरल्याची माहिती या सदस्याने दिली. निमंत्रित वक्ते व अन्य पाहुण्यांची संख्या ३०-४०च्या दरम्यान होती. त्यांच्या प्रवास-निवास व भोजनखर्चाचा भार महामंडळ-आयोजकांनी उचलला. अर्थात, हा खर्च मिळालेल्या अर्थसाहाय्यातून भागविण्यात आला. त्यानंतरही बरीच रक्कम शिल्लक राहते, असे सांगण्यात आले.
स्वागताध्यक्षांच्या शाही पाहुण्यांवर एकीकडे ५ लाख रुपये खर्च केले जात असताना, स्थानिक पातळीवरील खर्चात काटकसर व बचत करण्याचे काम पोर्ट ब्लेअरच्या महाराष्ट्र मंडळाचे सचिव अरविंद पाटील यांनी मोठय़ा खुबीने केले. हे दोनदिवसीय संमेलन जेथे झाले, त्या सभागृहाच्या भाडय़ात घसघशीत सवलत मिळाली. एरवी संपूर्ण दोन दिवसांच्या वापरासाठी ८० हजार रुपये आकारणी झाली असती, पण महाराष्ट्र मंडळाच्या शिष्टाईमुळे दोन दिवसांसाठी केवळ १० हजार रुपये स्थानिक प्रशासनाने आकारले. सभागृह भाडय़ासह स्थानिक पातळीवर (भोजन-नाश्ता वगळून) झालेला खर्च एक ते दीड लाखांपर्यंत आहे, असे पाटील यांनी सांगितले.
विश्व साहित्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्र मंडळास भरीव देणग्या मिळतील अशी पाटील व सहकाऱ्यांची अपेक्षा होती. पण महाराष्ट्र मंडळाच्या कार्यालयात भेट देणाऱ्या साहित्यप्रेमींकडून ४० ते ५० हजार आणि ‘ऑफ बीट’कडून १ लाख रुपये त्यांना मिळाले. या संस्थेने तर आधी २५ हजारांवर बोळवण केली, पण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप ताणल्यानंतर १ लाख रुपये मिळवले, असे समजले. महाराष्ट्र मंडळाने पोर्ट ब्लेअरला येणाऱ्या मराठी बांधवांच्या निवासासाठी २५ खोल्या बांधण्याचा आराखडा तयार करून स्थानिक प्रशासनाची त्यास मंजुरीही घेतली. त्यासाठी काही कोटी रुपये जमवावे लागणार असले, तरी विश्व मराठी साहित्यसंमेलनाने त्यांच्या पदरी केवळ दीड लाखाचे दान टाकले.
विश्व साहित्यसंमेलनानिमित्त अंदमान येथील युनियन बँक शाखेत उघडण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यात मुंबई महापालिकेने दिलेल्या २५ लाखांसह एकूण ४० लाख रुपये जमा झाले होते. ही सर्व रक्कम मराठी साहित्य महामंडळाच्या लेखी सूचनेनुसार ऑफबीट डेस्टिनेशन्स यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.
– अरविंद पाटील
(कार्यवाह, महाराष्ट्र मंडळ, पोर्ट ब्लेअर)
संग्रहित लेख, दिनांक 25th Sep 2015 रोजी प्रकाशित
महामंडळाला मोठे दान; फुकटय़ांचीच केवळ शान!
विश्व मराठी साहित्यसंमेलनाच्या आयोजनासाठी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या झोळीत मोठे दान पडले.
Written by बबन मिंडे
First published on: 25-09-2015 at 01:30 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donate to vishwa sahitya sammelan