समाजाचे काही देणे लागते म्हणून काही व्यक्ती समाजाची सतत काळजी घेतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी पशाच्या मागे न धावता सेवाधर्म राखला. समाजासाठी झटणाऱ्या डॉ. काब्दे यांचा आदर्श इतर डॉक्टरांनी घ्यावा, असे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी सांगितले.
डॉ. व्यंकटेश काब्दे अमृतमहोत्सव गौरव समितीच्या वतीने डॉ. काब्दे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. वाघमारे बोलत होते. वसमत येथील सरस्वती विद्यामंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व सर्वोदय नेते गंगाप्रसाद अग्रवाल, माजी आमदार पंडितराव देशमुख, जयप्रकाश दांडेगावकर, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा आदींची उपस्थिती होती. डॉ. काब्दे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गौरव समितीच्या वतीने डॉ. काब्दे यांना ७५ हजार रुपयांची थली व सन्मानचिन्ह देण्यात आले. ७५ हजार रुपयांत ५ हजार रुपयांची भर टाकून डॉ. काब्दे यांनी ८० हजार रुपये सामाजिक कार्यासाठी समितीला परत केले. डॉ. काब्दे यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमानिमित्त ‘एकविसाव्या शतकातील भारत’ या विषयावर डॉ. वाघमारे यांचे व्याख्यान झाले. एकविसाव्या शतकात भारतासमोर असलेला दहशतवाद, शेतकरी आत्महत्या, पाणीटंचाई, जातीयवाद अशी गंभीर स्वरूपाची आव्हाने देशासमोर असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. काब्दे यांनी, समाजाच्या उन्नतीसाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा. संघटन करून संघर्ष करा, त्यातूनच विकास साध्य होऊ शकतो, असे सांगितले. सर्वोदय नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांनीही डॉ. काब्दे यांच्या कार्याचे कौतुक करून समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान वसमतकरांनी केला, असे सांगितले व काब्दे यांना दीर्घायुषी होण्याच्या सदिच्छा दिल्या.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2015 रोजी प्रकाशित
डॉ. व्यंकटेश काब्देंचा आदर्श डॉक्टरांनी घ्यावा – डॉ. वाघमारे
डॉ. व्यंकटेश काब्दे अमृतमहोत्सव गौरव समितीच्या वतीने डॉ. काब्दे यांचा सत्कार करण्यात आला.
Written by दया ठोंबरे

First published on: 14-10-2015 at 01:53 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr venkatesh kabde honour