बिपीन देशपांडे

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील गहू काढणीवर जाणवू लागला आहे. ‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी होत असलेल्या ठिकाणी चालकच उपलब्ध होत नसून, दर वर्षी दोन हजारांच्या संख्येने येणारे चालक आतापर्यंत ३०० ते ४०० च्या आसपासच दाखल झालेले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक हार्वेस्टरमालकांचे अग्रणी रक्कम म्हणून दिलेले पैसेही पंजाबमधील चालकांकडे अडकून पडले असून चालकांपुढेही दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि नाकाबंदीची परिस्थिती पार करत येणे अडचणीचे ठरत आहे.

हेही वाचा >>>निवडणुकीदरम्यान चलन वाहतुकीवर नियंत्रण,अधिकृत वाहतुकीला ‘क्यूआर कोड’; काळय़ा पैशांचा छडा लावणे सोपे

महाराष्ट्रात नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या पेरणीतील गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. १५ फेब्रुवारीपासून गहूकाढणीच्या कामाला वेग आला असून, अलीकडच्या काळात शेतीत मजुरांची टंचाई, त्यांची वाढलेली मजुरी किंवा अधिकच्या संख्येने मजूर लावून काम करून घेताना होणारा खर्च पाहता शेतकरीवर्ग हार्वेस्टरद्वारे गहूकाढणीला पसंती देत आहे. परिणामी हार्वेस्टरमालकांचीही संख्याही वाढली आहे. मराठवाडय़ासह शेजारच्या नगर जिल्ह्यात मागील तीन वर्षांत ३०० च्या आसपास हार्वेस्टरची विक्री झाल्याची माहिती आहे. हार्वेस्टरने एका दिवसात पाच ते दहा एकरवरील गहूकाढणी होते.

मराठवाडय़ात हार्वेस्टरची संख्या वाढत असली, तरी ते अनेकांना चालवणारे मात्र, पंजाबमधून आणावे लागतात. छत्रपती संभाजीनगरजवळच्या आडगाव येथील हार्वेस्टरमालक, विक्रेते किशोर नागरे यांनी सांगितले, की गावात तीन हार्वेस्टर आहेत. पण चालक दर वर्षी पंजाबमधून येतो. आपल्या भागात हार्वेस्टर तंत्र पाहता ते हाताळण्याचे कौशल्य असलेल्या चालकांची वानवा आहे. यंदाही दोन चालकांना ५० हजार रुपये दिले. मात्र, नंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अधिक माहिती घेतली असता दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे अग्रणी रक्कम घेतलेले चालक येऊ शकत नसल्याचे कळले. इकडे यायलाही कोणी तयार नाही. जुने संबंध असलेले गुरुदेससिंग हे बेलूर येथून कसे-बसे आले आहेत. महाराष्ट्रात सध्या ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. अशा वातावरणात गव्हाची वेगाने काढणी करण्यासाठी अधिकांश शेतकरी अलीकडच्या काळात हार्वेस्टरलाच पसंती देत आहेत. शिवाय हार्वेस्टरद्वारे होणारी गहूकाढणी शेतकऱ्यांना परवडणारी असून, एकरी अडीच हजार रुपये काढणीचा दर घेतला जात असल्याचे नागरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>छत्रपती संभाजीनगर: पत्नीचा खून करून पती ठाण्यात हजर; चौघांवर गुन्हा दाखल

पंजाबमधील मोघा जिल्ह्यातील बेलूर गाव व परिसरातून दर वर्षी दोन हजारच्या आसपास हार्वेस्टरचालक महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील गुणा, जबलपूर आदी भागात येतात. यंदा केवळ ३०० ते ४०० जण आले असण्याची शक्यता आहे. दिल्लीतील आंदोलनामुळे नाकाबंदी झालेली असून, येण्यात अडचणी तयार झालेल्या आहेत. – गुरुदेससिंग, हार्वेस्टरचालक

हार्वेस्टरचालक अपेक्षेप्रमाणे उपलब्ध होऊ शकत नसल्याचा परिणाम गहूकाढणी आणि  व्यवसायावरही होत आहे. दर वर्षी साधारणपणे एक हार्वेस्टरचालक गहूकाढणीच्या हंगामातील महिना ते दीड महिन्याच्या कालावधीत पाच लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवतो. यंदा आतापर्यंत एक लाख रुपयांपर्यंतच व्यवसाय झाला आहे. सुमारे ४० ते ५० हजार रुपये महिन्याने पंजाबातील चालकांना येथे आणतो.- किशोर नागरे, हार्वेस्टर वितरक, मालक