सुहास सरदेशमुख

वाहन उद्योगात येत्या काळात म्हणजे २०२३ पर्यंत एक कोटी सात लाख प्रशिक्षकांची आवश्यकता भासणार असल्याने कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विशेषत: आधुनिक वेल्डिंग, यंत्राच्या आधारे त्यातील कौशल्य वृद्धिंगत करणारी प्रशिक्षणे देणे गरजेचे आहे. येत्या काळात वाहन उद्योग मोहिमेतील कौशल्यवृद्धीचा भाग म्हणून औरंगाबाद येथील मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए) या औद्योगिक संघटेनच्या वतीने सुरू असणाऱ्या मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये पहिले कौशल्य प्रशिक्षण केंद्र प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. कौशल्य विकासाचा ‘संकल्प’ ची (स्किल एक्विजिशन अँड नॉलेज अवरनेस फॉर लाव्हलीहुड प्रमोशन) व्याप्ती महाराष्ट्रासह नऊ ठिकाणी केली जाणार आहे. उत्पादनातील दर्जा राखता यावा म्हणून लागणारी कुशलता वाढविण्यासाठी प्रशिक्षक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सर्वसाधारणपणे कोणत्याही कारखान्यात देखरेख करणारी व्यक्ती अनुभवाच्या आधारे अधिक कुशलता मिळविणारा असतो.

मात्र, त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत. विद्याापीठामधून आखलेले अभ्यासक्रमही उपयोगी पडत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे होते. त्यामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे बनले होते. त्याचा एक भाग म्हणून मराठवाडा ऑटो क्लस्टर बरोबरच अलीकडेच एक करार झाला असून १५ जानेवारीच्या या करारानुसार वेल्डिंग आणि रोबोटिक्स या क्षेत्रात आता मनुष्यबळ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. औरंगाबाद येथील औद्योगिक संघटनांनी यासाठी तीन महिन्यांचा अभ्यासक्रम विकसित केला असून या तीन महिन्यांनंतर प्रशिक्षणार्थीचे मूल्यमापन केले जाणार आहे. विविध कंपन्यांच्या कामात कुशलता आणता यावी या साठी ‘संकल्प’ची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.

औरंगाबादमधील कौशल्य विकासाच्या नव्या अभ्यासक्रमाचे उद्योग विभागाकडूनही कौतुक होत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने बोलताना आशीष गर्दे म्हणाले, ‘येत्या काळात मनुष्यबळ विकासाची मोठी गरज भासणार आहे. त्यासाठी असे प्रकल्प अधिक उपयोगी पडत आहेत.’ प्रशिक्षणाची ही गरज लक्षात घेता अलीकडेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही कौशल्य विकासाचे कार्यक्रम कोणत्या क्षेत्रात वाढवावे लागतील याचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही केले आहे.

कारागृहे, बचत गट, गतिमंद क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज आणि हातमाग या क्षेत्रात वाव असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात ‘संकल्प’च्या आधारे कुशल मनुष्यबळ वाढविण्याचा संकल्प हाती घेतला जात आहे.

किमान कौशल्य कार्यक्रमालाही गती

येत्या काळात जिल्ह्य़ात किमान कौशल्य कार्यक्रमालाही गती देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २०२०-२१ या वर्षांत १२ क्षेत्रातील ११७० प्रशिक्षणे प्रस्तावित होती. नव्या आर्थिक वर्षांत दोन हजार ७६० जणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी लागणारा निधीही आता चार कोटी ५० लाखांहून अधिक झाला आहे. किमान कौशल्य प्रशिक्षणास गती देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.