सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद: अमेरिका, ब्रिटन व कॅनडा येथून भारतात येणाऱ्या पर्यटकास  प्रवेश परवान्याच्या (व्हिसा) किचकट प्रक्रियेमुळे त्यांचे प्रवास नियोजन रद्द करावे लागत असल्याचा फटका या वर्षी औरंगाबादच्या पर्यटनास अधिक बसत आहे. या तीन देशांत व्हिसा मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते आणि अशी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष व्हिसा कार्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेकांनी प्रवासाचे बेत रद्द केले आहेत. तर काहींना व्हिसा मिळविण्यासाठी घेतलेली पूर्व नियोजित भेट आठ ते दहा आठवडे उशिराची मिळत असल्याने विदेशी पर्यटकांकडून प्रवास बेत रद्द केल्याचे संदेश प्रवास व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना येत आहेत. या प्रश्नी वारंवार निवेदने देऊनही फारसा उपयोग न झाल्याने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घालावे अशी विनंती टूर ऑपरेटर्सच्या वतीने त्यांना करण्यात आली आहे.

करोनानंतर जगप्रसिद्ध वेरुळ व अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटक येतील असा अंदाज आहे. मात्र, काही देशांनी भारतात ‘व्हिसा’ देण्यास निर्बंध लादले आहेत. औरंगाबाद टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे जसवंत सिंग म्हणाले, ‘या वर्षी पर्यटन वाढेल असे वाटले होते. पण ‘व्हिसा’ची गुंतागुंत वाढल्याने या वर्षांतील विदेशी पर्यटकांची संख्या मर्यादितच राहील. औरंगाबादच्या पर्यटनाचे तर वेगळेच प्रश्न आहेत. ऑक्टोबरनंतर आता हवाई वाहतुकीचे वेळापत्रकी बदलणार आहे. रात्रीची विमान उड्डाणे आता असणार नाहीत. दोन महिन्यापूर्वी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ‘फ्लाय बीग’ ही  विमान कंपनी औरंगाबादहून बेंगळुरू, तिरुपतीसह विविध शहरामध्ये विमान सेवा देईल असे आवर्जून सांगितले होते. १४ शहरांमध्ये विमान प्रवास सुरू करण्याचा खास कार्यक्रमही गाजावाजा करुन झाला. आता हैदराबाद वगळता एकही विमान उड्डाण सुरू झालेले नाही. त्यामुळे पर्यटक आलेच तर ते केवळ भारतातील असतील, असे मानले जात आहे.

 दरम्यान विदेशी पर्यटक वाढावेत यासाठी झालेला गुंता सोडविण्यासाठी पंतप्रधानांकडे मागणी टूर ऑपरेटर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.                                         

‘‘कालच्या दिवसभरात पाच पर्यटकांनी त्यांचे प्रवास बेत रद्द केल्याचे संदेश पाठविले आहेत. ज्या वेगात प्रवास बेत रद्द होताहेत त्यावरून हा पर्यटन हंगामही वाया जाईल अशी भीती वाटते आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये औरंगाबादच्या पर्यटनामध्ये वाढ होत असते. करोनामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. या वर्षी त्यातून सावरण्याची संधी  तशीच राहील असे सध्याचे वातावरण आहे.

जसवंत सिंग, औरंगाबाद टूर अ‍ॅण्ड ट्रव्हल्सचे असोसिएशन