आयुष्यात अनेक अडचणींचे प्रसंग येतात. त्यावर आत्महत्या हा नक्कीच उपाय नाही. खरे तर आयुष्याची खरी गंमत झगडण्यातच आहे. छत्रपती शिवरायांनी किती संघर्षांला तोंड दिले होते ते सर्वानी आठवले पाहिजे, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी बिकट परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना धीर दिला.
अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या वतीने लातूर-उस्मानाबाद जिल्हय़ांतील ११३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. लातूर वकील संघाकडून दीड लाख, छुपे रुस्तुम वॉट्सअप ग्रुपचे १ लाख ८० हजार, अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे १ लाख या प्रकारे मदतीचे धनादेशही या वेळी देण्यात आले. विलास चामे, राजाभाऊ शेळके, अशोक चिंचोले, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले आदी उपस्थित होते.
नाना पाटेकर यांनी सांगितले की, प्रत्येकामध्ये एक अणुबॉम्ब दडला आहे. त्याचा वापर करायला प्रत्येकाने शिकले पाहिजे. आम्ही आपल्याला देत असलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, इतकेच आम्हाला सांगायचे आहे. मदत देऊन पंगू बनवण्याची अजिबात इच्छा नाही. आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. कुराणामध्ये यासंबंधी स्पष्ट उपदेश असल्यामुळे मुस्लिम समाजात आत्महत्येचे प्रमाण कमी आहे, असे सांगून आत्महत्या करून देवाशी प्रतारणा करू नका, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या ११५ वर्षांत राज्यात सर्वाधिक भीषण दुष्काळाचे सध्या सावट आहे. अशा वेळी राज्यकर्त्यांनी आपसात उणीदुणी न काढता सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र दौरे काढून या संकटावर मात केली पाहिजे. एकमेकांवर चिखलफेक करण्यास निवडणुकीचा काळ आहेच. एकमेकांची बखोटी न धरता हात धरण्याची ही वेळ असल्याचा सल्ला त्यांनी दिला.
मकरंद अनासपुरे यांनी बेडकाच्या अंगावर पाय पडला तरी ते जीव वाचवण्यास उसळी मारते. आज तिशीतील तरुण आत्महत्या करायला का प्रवृत्त होतो याचा समाजाने विचार करण्याची गरज आहे, असे सांगितले. देशात इंडिया व भारत असे शहरी व ग्रामीण दोन भाग आहेत. शहरी भागात पाण्याचा बेफिकिरीने वापर होतो. ग्रामीण भागात लोकांचे प्रश्न समजून घेण्याबद्दल कोणी आस्था दाखवत नाही. शेतकऱ्यांच्या पत्नीला लक्ष्मी म्हटले जात होते. आज या लक्ष्मीची अवस्था आपण कशी करून ठेवली आहे? आम्ही आयुष्यात कितीही संपत्ती कमवली तरी सोबत काय नेणार आहोत? शेजारच्या माणसाचा भुकेचा आक्रोश आपल्याला कळत नसेल तर आपण माणूस म्हणून जगण्यास लायक आहोत का? याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. शिकलेल्याला सुशिक्षित करणे ही समाजासमोरील आजची खरी समस्या आहे. आमची चळवळ राजकीय नसून केवळ माणुसकीची आहे. समाजातील आणखी काही लोकांना सोबत घेऊन एक संस्था काढून शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यापुढेही मदत केली जाईल. शहरी भागातील लोकांनी मदतीचा हात देऊन या कुटुंबीयांना स्वतच्या पायावर उभे करण्यास सहकार्य करावे. समाजात त्यागाच्या कथा भरपूर आहेत. व्यक्तिगत कथांपेक्षा समाज हेच एक कुटुंब आहे, या आत्मीयतेने सर्वानी सहभाग देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी पोले यांनी शेतकऱ्यांनी पीकपद्धती बदलण्याची गरज व्यक्त केली. भूगर्भातील ८० फुटांत ८० टक्के पाणी असते. त्यानंतर ३०० फुटांपर्यंत १५ टक्के व त्यापुढे केवळ ५ टक्के पाणी असते. पाण्याचा जुगार खेळणे बंद करून उसासारखे अतिपाणी लागणारे पीक घेणे बंद केले पाहिजे. लातूर जिल्हय़ात १२ हजार हेक्टरवर ऊस आहे. एवढे पाणी संपूर्ण जिल्हय़ास ४ वष्रे पिण्यास पुरेल तेव्हा पाण्याचा वापर कसा करायचा? हे सर्वानी लक्षात घ्यावे, असे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help to 113 suicide affected farmers by nana patekar makrand anaspure
First published on: 06-09-2015 at 01:10 IST