पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता नसल्याने टँकरद्वारे पाणी देऊन फळबागा वाचवा असे आदेश पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने टँकरसाठीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला. मात्र, त्यास अजून मंजुरी मिळाली नाही. मात्र, पाण्याअभावी जिल्ह्यातील फळबागांच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सेनगाव तालुक्यातील कहाकर बु. येथील ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्यांना टँकरद्वारे पाणी मिळत नाही. इतरही अनेक गावांची अशीच अवस्था आहे. जिल्ह्यातील तीन प्रादेशिक पाणीयोजनांची अवस्था यापेक्षा बिकट आहे. या तीन प्रादेशिक योजनांतून किमान ६८ गावांना पाणी मिळणे अपेक्षित असताना केवळ २७ गावांनाच पाणीपुरवठा होऊन ४१ गावे अजूनही तहानलेली आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी न मिळणाऱ्या गावांना टँकर अथवा इतर सुविधा मिळत नसल्याने त्यांची अवस्था ‘आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईना’ अशीच झाल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाने फळबागांना टँकरने पाणी देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. त्यास मंजुरी येईल तेव्हा येवो. मात्र, आत्ताच जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर असताना पाण्याअभावी फळबागांची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत आहे. गेल्या आठवडय़ात तालुक्यातील भांडेगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या फळबागा तोडल्या. सुमारे २० ते २५ एकरांतील फळबागांच्या झाडांची कत्तल झाली. अशीच अवस्था तालुक्यातील सवंड येथील फळबागांची आहे. या गावातील शेतकऱ्यांनीही फळबागांची कत्तल करून त्याचा उपयोग इंधनासाठी सुरू केला आहे.
सेनगाव तालुक्यातही मोठय़ा प्रमाणात फळबागा आहेत. सेनगाव शहरासह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना शेतकऱ्यांसमोर फळबागा वाचविण्याचे संकट उभे आहे. काही शेतकरी जिवाचे रान करून कोसोदूर अंतरावरून पाणी आणून फळबागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिनगीनागा येथील शेतकरी नागोराव इंगळे यांच्या एक हेक्टर जमिनीवर संत्र्याची बाग होती. विहिरीतील पाणी आटले, तर शेतातील बोअर कोरडेठाक पडल्याने त्यांच्या शेतातील अडीचशेवर संत्र्याची झाडे पाण्याअभावी वाळून गेल्याने त्यांना झाडे तोडण्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता. परिणामी त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horticulture water ax
First published on: 26-04-2016 at 03:33 IST