उमरग्याच्या नगराध्यक्षा केवळबाई औरादे यांना अनियमिततेबाबत अपात्र ठरविण्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी काढल्यानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
पालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. औरादे शिवसेनेच्या असल्या, तरी सेनेअंतर्गत वाद होता. शिवसेनेचे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रज्जाक अत्तार व इतर तिघांनी औरादे यांच्याविरुद्ध सर्वसाधारण सभांच्या अनियमिततेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. २२ ऑगस्ट २०१४ नंतर १० महिने एकही सर्वसाधारण सभा औरादे यांनी घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर विभागीय आयुक्तांनी नगरविकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता.
गेल्या ३० नोव्हेंबरला नगरविकास मंत्रालयाने औरादे यांनी केलेल्या अनियमिततेबाबत नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ५५ बमधील तरतुदीनुसार कारणे दाखवा नोटीस बजावून औरादे यांना नगराध्यक्ष पदावरून निरस्त का करू नये, या बाबत १५ दिवसांत लेखी खुलासा करावा, असे कळविण्यात आले. परंतु औरादे यांनी कोणताही लेखी खुलासा केला नाही. त्यानंतर ३१ डिसेंबरला राज्यमंत्री पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. मंत्री पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून नगराध्यक्षा औरादे यांना मंगळवारपासून नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी अपात्र ठरविले, तसेच सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास र्निबध घातले.
यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून ठरल्याप्रमाणे नवीन नगराध्यक्ष भाजपचा होण्याची चिन्हे आहेत.
या निर्णयासंदर्भात तक्रारदार माजी नगराध्यक्ष अत्तार यांनी मंत्र्यांकडे मागणी करताना औरादे यांच्या कारकीर्दीत पालिकेचे झालेले आíथक नुकसान वसूल करावे, असेही म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor aurade ineligible umaraga
First published on: 07-01-2016 at 03:20 IST