गिरीश कुबेर यांचे मत

औरंगाबाद : व्यवस्थेला प्रश्न विचारणारा वारसा लोकमान्यांनी दिल्याचा आपला देदीप्यमान इतिहास असताना आज मात्र माध्यमांचा रस फोलपटांमध्ये निर्माण झाला आहे. माध्यमांचे असे मनोरंजनीकरण हे एक आव्हान बनले असून एक ठोस भूमिका घेऊन व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची क्षमता बाणवली आणि वाचकांच्या मेंदूला चालना देणारी पत्रकारिता केली तरच माध्यमांचे भविष्य उज्ज्वल असेल, असे स्पष्ट मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडले.

बातमी देणे, हे वृत्तपत्राचे काम नाही. ट्रम्प काय बोलले हे आता मोबाइलवरही पाहता येईल. पण हे आत्ताच का आणि त्याचे पुढे काय, या दोन घटकांची माहिती बातमीत समाविष्ट करावी लागणार आहे. माध्यमांना सत्य मांडायचे असेल, तर ‘नि:पक्ष’ हा ‘गुण’ बाजूला ठेवावा लागणार आहे. दोन्ही बाजू देणे ही पत्रकारिता नव्हे. तर पत्रकारानेही स्वत: पाहून नोंदवलेले मत देणे ही पत्रकारिता आहे. अध्यात ना मध्यात, यापुढील विचार माध्यमांना करावा लागेल. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातले ढवळलेपणाचे उद्योग माध्यमांनी करायला हवेत, असेही कुबेर म्हणाले.

येथील विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत गिरीश कुबेर बोलत होते. कै. पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या व्याख्यानमालेत ‘समकालीन प्रसार माध्यमे : मूल्ये, आव्हाने आणि भवितव्य’ या विषयावर पहिले पुष्प त्यांनी गुरुवारी सायंकाळी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अक्षय शिसोदे होते. व्यासपीठावर श्रीमंतराव शिसोदे, प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ यांची उपस्थिती होती.

गिरीश कुबेर म्हणाले, ‘आपल्याकडे बाळशास्त्री जांभेकर, सुधारक गोपाळ गणेश आगरकर अशी बौद्धिक उंचीची माणसे होऊन गेली. बाळशास्त्री जांभेकरांची ओळख केवळ ‘दर्पण’चे संपादक एवढी मर्यादित नाही तर ते समाज सुधारणेतील राजा राममोहन रॉय यांच्यानंतरचे प्रमुख नाव आहे. दादाभाई नौरोजी यांनी जांभेकर यांच्याकडून दीक्षा घेतली होती. एवढी वैचारिक परंपरा वृत्तपत्र क्षेत्राला लाभलेली आहे. या काळाशी सुसंगत होण्यासाठी माध्यमांनी प्रश्न विचारायला हवेत. प्रश्न न विचारण्याची अवस्था असावी, असे राज्यकर्त्यांना वाटते. तेव्हा निर्बुद्ध परंपरेला छेद देण्याचे काम माध्यमांचे आहे. विचारतरंग समाजाच्या मनात उमटले जाणार नसतील तर काय उपयोग’, असा प्रश्नही कुबेर यांनी उपस्थित केला.

माध्यमेही माहिती अधिकार कक्षेत हवीत

माध्यमे ही राजकीय पक्षांच्या मालकीची आहेत का, याची माहिती आपण देतो आहोत का, असा प्रश्न उपस्थित करून कुबेर यांनी माध्यमांनाही माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणायला हवे, अशी भूमिका मांडली. विकसित देशांत माध्यमे माहिती अधिकाराच्या कक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले.