‘नासेर निरपराध, त्याची अटक हे षड्यंत्र’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित नासेरबीन चाऊस याला अटक झाल्यानंतर त्याच्यासाठी सरसावलेल्या एमआयएमने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईचा निषेध केला. देशात भाजपचे सरकार असल्याने मुस्लीम समाजाला देशद्रोही ठरविले जात आहे. निरापराध मुस्लीम युवकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे, अशी टीका या वेळी करण्यात आली.

शहरातील गाडीवान मोहल्ला भागात नासेरबीन चाऊस (वय ३१) या तरुणास सीरियातील आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्यामुळे नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. नासेर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नासेरचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले. तो सीरियातील फारुख नावाच्या व्यक्तीशी चॅटिंगवर संपर्कात होता. फारुख हा नासेरच्या माध्यमातून भारतात स्फोट घडवून आणण्याच्या बेतात होता. त्यासाठी नासेरला बॉम्ब बनविण्याचे तंत्रही सांगितले होते. तो गेल्या एक वर्षांपासून दहशतवादी कारवाया करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला परवा रात्री पोलिसांनी अटक केली.

एमआयएम पक्षाने दहशतवाद विरोधी पथकाच्या विरोधात नारेबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जावेद कादर यांनी सांगितले की, भाजप सरकारवर हल्लाबोल करीत निरापराध मुस्लीम युवकांना दहशतवादी कारवाईच्या गुन्ह्य़ात अडकवले जात आहे. कुठलाही मुस्लीम हा देशविरोधी नाही. इस्लाम धर्मही कुठल्याही दहशतवादाचे समर्थन करीत नाही. आंदोलनकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या या वेळी अधिक होती. धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एमआयएमच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim agitation in parbhani district
First published on: 16-07-2016 at 01:55 IST