तालुक्यातील पारडा येथे रात्री झोपलेल्या पत्नीच्या अंगावर पती गुलाबने कुऱ्हाडीचे १० वार केले, तर आईला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलीवर कुऱ्हाडीचे सात वार करून खून केला. दुसऱ्या मुलीला मारण्याच्या प्रयत्नात तो असताना मुलीने घरातून पळ काढल्याने ती वाचली. आरोपी पत्नीच्या अंगावरील दागिने घेऊन फरार झाला. बासंबा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पारडा येथे बलपोळ्याच्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास सण साजरा करून गुलाब शंकर मस्के (वय ४५), त्याची पत्नी सत्यभामा (वय ४०), ११ वी वर्गात शिक्षण घेणारी मुलगी ऊर्मिला (वय १७), नववी वर्गात शिक्षण घेणारी जखमी मुलगी कविता (वय १४) झोपले असताना निर्दयी गुलाबने पत्नी सत्यभामाच्या डोक्यात, मानेवर, हाता-पायावर कुऱ्हाडीचे दहा वार केले. दरम्यान त्याची मुलगी ऊर्मिला आईला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना निर्दयी बाबाने मुलीच्या मानेवर, अंगावर कुऱ्हाडीचे सात वार करून दोघींचा निर्दयीपणे खून केला.
दरम्यान दुसरी मुलगी कविता हिलासुद्धा तो मारण्याच्या प्रयत्नात असताना ती घरातून बाहेर पडली. तिच्या अंगावरही कुऱ्हाड फेकली, मात्र कुऱ्हाड तिला लागली नाही. मात्र खाली पडल्याने तिच्या पायाला मार लागला व जखमी झाली. ती घाबरलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांना सांगत सुटली. इकडे गुलाबने पत्नीच्या अंगावरील दागिने काढून घरातून पोबारा केला.
घराशेजारील लोकांसोबतच गावातील मंडळी घटनास्थळी जमली. गावातील एकाने तत्काळ बासंबा पोलिसात या घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक सुधाकर आडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. आरोपी गुलाब मस्के फरार झाल्याने पोलिसांनी तत्काळ त्या परिसरात नाकेबंदी करून त्याचा शोध घेतला. मात्र आरोपी त्यांना सापडला नाही. अवधूत मस्के यांच्या फिर्यादीवरून आरोपी गुलाब शंकर मस्के याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of wife and daughter
First published on: 14-09-2015 at 01:40 IST